सेवानिवृत्तीसाठीचे नियोजन

सुधाकर कुलकर्णी 
सोमवार, 19 एप्रिल 2021

अर्थविशेष

मागील लेखात प्रत्येकाने निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करणे का आवश्यक आहे याची आपण माहिती आपण घेतली. या लेखात रीटायरमेंट कॉर्पस किती असावा व तो कसा करावा याची माहिती घेऊ.

मागील लेखातील पाटील हे आयटी कंपनीत काम करीत असून त्यांचा पगार दरमहा ७५ हजार रुपये इतका आहे. सध्या त्यांना घरखर्चासाठी दरमहा ४० हजार रुपये लागत आहेत असे आपण गृहीत धरू. त्यांचे सध्याचे वय ३० असल्याने त्यांच्या निवृत्तीसाठी अजून ३० वर्षे इतका कालावधी आहे. ते निवृत्तीनंतर २० वर्षे हयात असतील असे गृहीत धरल्यास त्यांना उभयतांना वयाच्या ६० पासून ते ८० पर्यंत पुरेल एवढा रीटायरमेंट कॉर्पस वयाच्या ६०पर्यंत जमा करावा लागणार आहे. तो अंदाजे किती असावा हे आता आपण पाहू. 

त्यांना आज घरखर्चासाठी दरमहा ४० हजार रुपये लागत आहेत व त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये (जीवनशैली) फारसा बदल होणार नाही असे गृहीत धरल्यास त्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर आजच्या मूल्याचे ४० हजार रुपये दरमहा, पुढील २० वर्षे लागणार आहेत. सध्याच्या महागाई वाढीचे प्रमाण पाच टक्के असेच राहील हे गृहीत धरून त्यांना निवृत्तीनंतर पहिल्या वर्षी दरमहा अंदाजे १,७५,००० रुपये लागतील. यात दरवर्षी महागाईमुळे पाच टक्के इतकी वाढ होत राहील असे गृहीत धरल्यास निवृत्त होताना त्यांच्याकडे सुमारे चार कोटी इतका कॉर्पस असणे आवश्यक आहे. सध्या त्यांची असणारी गुंतवणूक पुढीलप्रमाणे आहे, (त्यात नियमित गुंतवणूक होईल असे गृहीत धरल्यास)

  • बँक एफडी ३,००,००० व्याज @ ६ टक्के व दरमहा २,००० रुपये यापुढे 
  • शेअर्स व म्युच्युअल फंड २,००,००० रिटर्न @१२ टक्के व दरमहा २,००० रुपये यापुढे 
  • पीपीएफ २,५०,००० व्याज @ ६ टक्के व दरमहा २,००० रुपये यापुढे 
  • आरोग्य विमा ५ लाख रुपये कव्हर असणारी एंडोव्हमेंट पॉलिसी (वार्षिक प्रीमियम २५,००० रुपये) 
  • यातून मुलांच्या शिक्षणाचा/लग्नाचा खर्च तसेच अन्य प्रासंगिक खर्च भागू शकतील व त्यांचा सध्याचा पगार व घरखर्च विचारता घेता दरमहा ८,००० रुपये वरीलप्रमाणे गुंतवणूक करणे शक्य आहे.
  • आता पाटील यांना रीटायरमेंट प्लॅनिंगच्या उद्देशाने सुमारे चार कोटी रुपये इतका रीटायरमेंट कॉर्पस करण्यासाठी पुढील पर्याय आहेत -
  • निवृत्त होताना पीएफ, ग्रॅच्युइटी व लीव्ह एन्कॅशमेंट यातून किती रक्कम मिळू शकेल याचा अंदाज करणे. समजा पाटील यांना या तिन्हीतून अंदाजे १.५ कोटी रुपये मिळणार असतील तर त्यांना आणखी २.५ कोटी रुपये इतका रीटायरमेंट कॉर्पस पुढील ३० वर्षांत जमा करावयाचा आहे.
  • दरमहा ५,००० रुपये इक्विटी म्युच्युअल फंडात एसआयपी पद्धतीने पुढील ३० वर्षे गुंतविल्यास उर्वरित २.५ कोटी रुपये जमा होऊ शकतील. या ठिकाणी गुंतवणुकीवर सरासरी १२ ते १२.५ टक्के इतका रिटर्न गृहीत धरला आहे. (शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर एवढा रिटर्न मिळत असल्याचे दिसून येते.)
  • एनपीएसमध्ये दरमहा १२०० रुपये सुरुवातीस व त्यात दरवर्षी १० टक्के इतकी वाढ केल्यास (पहिल्या वर्षी १२००, दुसऱ्या वर्षी १४४०, तर तिसऱ्या वर्षी १५८४ याप्रमाणे) पुढील ३० वर्षे (वयाच्या ६० पर्यंत) गुंतवणूक केल्यास सुमारे २.२५ कोटी एवढी रक्कम जमू शकेल व यातून पेन्शनसाठीचे जे तीन-चार पर्याय आहेत त्यातील योग्य पर्याय निवडून पेन्शन घेता येईल.
  • विमा कंपनीच्या अॅन्युटी योजनेमध्येसुद्धा नियमित गुंतवणूक करून मुदतीनंतर योग्य पर्याय निवडून पेन्शन घेता येईल.

    शक्य असल्यास लवकरात लवकर आणखी एक घर/फ्लॅट घेऊन त्याच्या गृहकर्जाची परतफेड १५ ते २० वर्षांत केल्यास यातून येणारे भाडे निवृत्तीनंतरच्या दरमहाच्या खर्चाची तरतूद काही प्रमाणात करू शकेल. तसेच भाड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईमुळे वाढणाऱ्या खर्चाची तरतूदसुद्धा होऊ शकेल. अगदीच गरज पडल्यास हे अतिरिक्त घर विकून एकमुठी रक्कमही मिळू शकेल. मात्र सद्यपरिस्थितीत आणखी एका घराचा पर्याय तितकासा फायदेशीर ठरेल असे वाटत नाही. 

    याशिवाय वयाच्या ६० वर्षांपर्यंत पीपीएफ/व्हीपीएफ यामध्ये ठरावीक रक्कम दरवर्षी गुंतविल्यास यातून एकमुठी रक्कम मिळेल व ही एकमुठी रक्कम योग्य प्रकारे गुंतवून निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळू शकेल.

    वयाच्या ६० वर्षांपर्यंत पोस्टाच्या एनएससीमध्ये ठरावीक रक्कम दरवर्षी गुंतविल्यास व प्रत्येक वेळी सहा वर्षांची मुदत संपल्यावर येणाऱ्या रकमेची पुनर्गुंतवणूक केल्यास ६० नंतर दरवर्षी रक्कम मिळत राहील व ही मिळणारी रक्कम आधीच्या वर्षाच्या रकमेपेक्षा जास्त असल्याने महागाईमुळे वाढणाऱ्या खर्चाची तजवीज होईल. 

    याशिवाय चांगल्या कंपन्यांचे शेअर्स दीर्घकालीन उद्देशाने घेऊन त्यात वेळोवेळी वाढ केल्यास २५-३० वर्षे इतक्या दीर्घ कालावधीत कमी गुंतवणुकीतूनसुद्धा चांगली रक्कम जमा होऊ शकते. (उदा. जर एखाद्याने २००३ साली १२,५०० गुंतवून मारुती कंपनीचे १०० शेअर्स घेतले असतील तर त्यांची आजची किंमत सुमारे ७ लाख इतकी आहे. तर, याच सुमारास ३०,००० रुपये स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये गुंतविले असल्यास आज त्याची किंमत सुमारे ४ लाख रुपये इतकी आहे. तसेच जर १९९५ मध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये एक रुपये गुंतवून १०० शेअर्स घेतले असतील, तर आज त्याची बाजारातील किंमत सुमारे १४ ते १५ लाख रुपये 

इतकी आहे आणि म्हणून 

रीटायरमेंट कॉर्पसच्या दृष्टीने विचार करताना शेअर्समधील गुंतवणुकीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र शेअर्समध्ये गुंतवणूक करताना त्यातील जोखीम समजून घेणे गरजेचे आहे व आपली जोखीम घेण्याची क्षमता विचारता घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक करावी व अशी गुंतवणूक दीर्घकालीन उद्देशाने केली तरच फायदेशीर ठरू शकते.

वरील विविध पर्यायांतून आपल्या सोयीनुसार योग्य तो एक किंवा अनेक पर्याय निवडून शक्य तितक्या लवकर, म्हणजे आपल्या उत्पन्नास सुरुवात झाल्याबरोबर गुंतवणुकीस सुरुवात करावी. त्यात जसे उत्पन्न वाढेल त्या प्रमाणात वाढ करून नियमित गुंतवणूक केल्याने आपला अपेक्षित रीटायरमेंट कॉर्पस जमा करणे सहज शक्य होते.

संबंधित बातम्या