निवृत्तीनंतर पैसे ठेवा सुरक्षित

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 3 मे 2021

अर्थविशेष

कार्यरत असताना निवृत्तीसाठीचे नियोजन करणे का आवश्यक आहे व ते कसे करावे याबाबत मागील दोन लेखात आपण माहिती घेतली. आज आपण प्रत्यक्ष सेवानिवृत्त झाल्यावर एकमुठी मिळणारी रक्कम जास्तीत जास्त सुरक्षित कशी ठेवावी व त्यातून उर्वरित काळासाठी एक नियमित उत्पन्न, व्याज तसेच लाभांशाद्वारे कसे मिळवावे हे पाहू. त्याचबरोबर कोणत्या चुका टाळाव्यात हेही पाहू.

सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय नोकरदारास आजच्या काळात सेवानिवृत्त होताना पीएफ, ग्रॅच्युइटी, लीव्ह एन्कॅशमेंट मिळून सुमारे ७५ लाख ते १ कोटी रुपये एवढी रक्कम मिळत असल्याचे दिसून येते. (ही रक्कम संबंधित व्यक्तीचा पगार, नोकरीचा कालावधी यानुसार कमी अधिक असू शकेल. तसेच संबंधित व्यक्तीस पेन्शन सुविधा नाही असे गृहीत धरले आहे.)

समजा गोखले जून २०२१ अखेरीस खासगी कंपनीतून वयाची ६० वर्षे पूर्ण होणार असल्याने सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचा सध्याचा दरमहा पगार १ लाख ३० हजार रुपये इतका असून प्रत्यक्ष हातात ८५ हजार रुपये मिळत आहेत. त्यांचा दरमहाचा घरखर्च ५० ते ५५ हजार रुपये इतका आहे. सेवानिवृत्तीनंतर दरमहा खर्च १० टक्के कमी होऊ शकतो, हे विचारात घेता त्यांना सुरुवातीस दरमहा ४५ हजार रुपये मिळणे आवश्यक आहे. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी व लीव्ह एन्कॅशमेंट मिळून सुमारे १ कोटी २५ लाख मिळणार आहेत. त्यांची सध्या असणारी गुंतवणूक (पीपीएफ, शेअर्स, म्युच्युअल फंड, बँक व पोस्ट यातील) सुमारे ५० लाख रुपये असेल, तर त्यांनी कशी गुंतवणूक करावी, जेणेकरून त्यांचा दरमहाच्या सध्याच्या व पुढे महागाईमुळे सतत वाढत जाणाऱ्या घरखर्चाची तरतूद होऊ शकेल. त्याचबरोबर आजारपण किंवा काही आकस्मिक खर्च येणाऱ्या खर्चासाठी तरतूद करणेही आवश्यक आहे.

  • गोखले यांचे नियोजन करताना पुढील बाबी गृहीत धरल्या आहेत.
  •     महागाई वाढीचा दर पुढील २० वर्षे ६ टक्के
  •     दरमहाचा सुरुवातीचा खर्च ४५ हजार रुपये
  •     गुंतवणुकीवर मिळणारा सरासरी परतावा (रिटर्न) ८ टक्के (सुमारे २० ते २५ टक्के इतकी गुंतवणूक इक्विटीमध्ये केल्यास)
  •     उभयतांचे आयुर्मान ८० वर्षे 
  •     त्यांच्यावर मुलांची किंवा अन्य तत्सम कौटुंबिक जबाबदारी नाही, तसेच कुठलेही कर्ज नाही.

वरील बाबी गृहीत धरल्यास सुरुवातीस (म्हणजे ६१व्या वर्षी) दरमहा ४५ हजार रुपये लागणार आहेत. वयाच्या सत्तराव्या वर्षी सुमारे ८० हजार रुपये, तर ७५व्या वर्षी १ लाख रुपये व ८०व्या वर्षी दीड लाख रुपये लागणार आहेत (६ टक्के महागाई वाढीचा दर गृहीत धरून). अशी वेळोवेळी वाढत जाणारी रक्कम मिळण्यासाठी त्यांना सुमारे १ कोटी गुंतविणे गरजेचे आहे. अशी गुंतवणूक करताना किमान ७५ ते ८० टक्के गुंतवणूक पोस्ट, राष्ट्रीयकृत बँक, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना यांसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतविणे आवश्यक आहे. मात्र यातून सरासरी ६ ते ६.५ टक्के इतकाच रिटर्न मिळू शकेल व भविष्यात हा रिटर्न कमी अधिक होऊ शकेल. उर्वरित २० ते २५ टक्के रक्कम शेअर्स अथवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतविल्यास यातून १२ ते १४ टक्के इतका रिटर्न मिळू शकेल. या एकूण गुंतवणुकीचा एकत्रित रिटर्न ८ टक्क्यांच्या जवळपास असू शकेल. अशा पद्धतीने गुंतवणूक केल्यास किमान पुढील २० वर्षे आपल्या दरमहाच्या खर्चाची तरतूद होऊ शकेल (गुंतवणूक असेपर्यंतच).

थोडी जोखीम घ्यायची तयारी असल्यास म्युच्युअल फंडाच्या एसडब्ल्यूपी योजनेत गुंतवणूक करणे निश्चितच फायदेशीर ठरू शकते. तसेच नव्याने बाजारात आलेल्या पीटूपी योजनेत काही रक्कम गुंतवून १२ ते १४ टक्के इतका रिटर्न मिळविता येतो. या दोन्ही पर्यायांचा विचार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मात्र जास्त रिटर्नच्या प्रलोभनाला बळी पडून फसव्या गुंतवणुकीच्या योजनेत पैसे गुंतवू नका. बाजारात अशा फसव्या योजना वरचेवर येत असतात. पोस्ट, राष्ट्रीयकृत बँक, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना याव्यतिरिक्त जर आपण व्याज मिळणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार करणार असाल आणि यातून मिळणारे व्याज राष्ट्रीयकृत बँकेच्या तीन वर्षांसाठी मिळणाऱ्या व्याजाच्या २ ते २.५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर अशी गुंतवणूक कटाक्षाने टाळावी. सध्या राष्ट्रीयकृत बँकांचा ३ वर्षे मुदतीच्या ठेवीवरील व्याज दर ५.७५ ते ६.०० टक्के इतका आहे. त्यानुसार ७.५ ते ८ टक्के व्याज देणाऱ्या कंपन्यांचा विचार करण्यास हरकत नाही (रेटिंग पाहूनच). थोडक्यात, ज्या गुंतवणुकीतून १२ ते १४ टक्के व्याज मिळेल असे भासविले जाते, अशी गुंतवणूक न करणेच योग्य राहील.

उभयतांच्या हॉस्पिटलायझेशन खर्चाच्या तरतुदीसाठी किमान ५ लाख रुपये कव्हर असणारी फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी व ती दरवर्षी मुदत संपण्याच्या आत रिन्यू करावी. याच बरोबर किमान १० लाख रुपये कव्हर असणारी टॉप अप पॉलिसी घ्यावी. या दोन मेडिक्लेम पॉलिसींमुळे आपल्या हॉस्पिटलायझेशन खर्चाची पुरेशी तरतूद होईल. उतार वयात विविध आजारांची शक्यता विचारात घेता मेडिक्लेम पॉलिसी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आजारपणाचा खर्च आपल्याकडे असणाऱ्या रकमेतून करावा लागेल व यामुळे आपल्या दैनंदिन खर्चास रक्कम पुरणार नाही.

दैनंदिन खर्चाची पुरेशी तरतूद व मेडिक्लेम या दोन बाबी झाल्यावरच उर्वरित पैशांतून नवीन गाडी, देश विदेशातील सहली, आपले छंद किंवा तत्सम बाबी यासाठी खर्च करावा.

सर्व गुंतवणुकीस योग्य नॉमिनेशन करावे. तसेच आपले मृत्युपत्र करून ठेवावे, त्यात गरज पडल्यास बदलही करावा. असे केल्याने आपल्या पश्‍चात वारसांना क्लेम मिळणे सोपे होईल.

आपल्याला निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळणार आहे, याची माहिती आपले नातेवाईक, मित्र तसेच अन्य परिचितांना असते. यातील कोणी आपणास व्यवसाय वाढीसाठी व्याजाने पैसे मागतील, तर मुले  घरासाठी/गाडीसाठी रकमेची मागणी करतील. अशा वेळी भिडेखातर कोणालाही रक्कम देऊ नका. जवळच्या माणसाला दिलेली रक्कम परत मागणे अवघड होऊन जाते. प्रसंगी रक्कम मिळत नाही किंवा मिळाली तरी हप्त्याहप्त्याने मिळते व काही बोलता येत नाही. यातून प्रसंगी आपल्या जवळच्या माणसाशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘भीड भिकेची बहीण’ ही म्हण लक्षात घेऊन अशा मागणीस ठामपणे नकार देणेच योग्य असते.

संबंधित बातम्या