स्वच्छ मोकळी हवा

संपादक
सोमवार, 14 डिसेंबर 2020

संपादकीय

बावधन हे पुण्याच्या पश्चिमेकडचं एक उपनगर. काही दशकांपूर्वीपर्यंत बावधन पुण्यापासून लांब होतं; इतकं की बावधनला जाऊन आलो हे वाक्य लांब कुठेतरी प्रवास करून आल्यासारखं उच्चारलं जायचं. टेकड्यांनी वेढलेलं बावधन आता राहण्यासाठी पुण्यातलं वन ऑफ द मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन झालं आहे. कधीतरी टुमदार बंगल्यांचं गाव असणारं बावधन आता टेकड्यांच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या इमारतींनी भरून जातंय. बावधनची आठवण येण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात बावधन हा बातमीचा विषय होता, आणि त्याला कारण होतं काही सजग बावधनकरांनी एकत्र येऊन घेतलेला एक निर्णय.

गर्दी, धूळ, वाहनांची कोंडी, माणसाला धोकादायक ठरणारी इमिशन्स ही आता वाढत्या नागरीकरणाची व्यवच्छेदक लक्षणं झाली आहेत. महानगरं तर सोडाच पण हवेचं प्रदूषण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या हे आता वाढीच्या रस्त्यावर पावलं टाकणाऱ्या कोणत्याही गावाच्या कपाळावर लिहिलेलं अटळ सत्य होतं आहे. या पार्श्वभूमीवर बावधनकरांनी महिन्यातून एकदा ‘नो व्हेइकल डे’ पाळण्याचं ठरवलं आहे. महिन्यातल्या एका रविवारी आपलं वाहन वापरायचं नाही. 

लॉकडाउन शिथिल व्हायला लागल्या नंतरच्या काळात प्रकर्षानी लक्षात आलेली बाब म्हणजे, माणसं घराबाहेर पडायला सुरूवात झाल्यानंतर प्रदूषणाच्या पातळ्याही होत्या त्याच उंचीवर परतायला सुरूवात झाली आहे. आयआयटीएम - भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेचे अलीकडचे, विशेषतः दिवाळीनंतरचे, अहवाल या वास्तवाची पुन्हापुन्हा जाणीव करून देत आहेत. ही परिस्थिती केवळ पुण्या-मुंबईतलीच आहे अशातला भाग नाही. देशातल्या बहुतेक सर्व शहरांमधली परिस्थिती अशीच आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅन्ड वेदर फोरकास्टिंग अॅन्ड रिसर्चच्या (सफर) ताज्या अहवालाप्रमाणे दिल्लीने हवेची गुणवत्ता खालावण्याबाबातची धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्या खालोखाल आहे अहमदाबाद. या परिस्थितीत भर पडते आहे लहरी हवामानाची. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू अगदी एका दिवसात अनुभवल्याचा अनुभव फार लांबचा नाहीये. अगदी परवाच्या दिवाळी नंतरही एकाच दिवसात तिन्ही ऋतूंना तोंड देण्याची वेळ आपल्यापैकीही अनेकांवर आली असणार. वातावरणातल्या बदलांबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल आजवर खूप लिहिलं -बोललं गेलं आहे, पण गेल्या काही दिवसांना आणखी एक किनार आहे; ती आहे कोरोना विषाणूच्या फैलावाची. कोरोनाच्या विषाणूला रोखणाऱ्या लसीचे प्रयोग सुरू झाले असले, तरी त्याबाबतची अनिश्चितता अजूनही संपलेली नाही. 

धूळ -धुराचं प्रदूषण किती प्रयलंकारी असू शकतं ते आपण सगळेच दर दिवशी अनुभवतोच आहोत. हे प्रमाण वाढत गेलं तर शहरवासीयांच्या आरोग्याबरोबरच शहरांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतात, हे देखील आपल्याला माहिती आहे. आता या परिस्थितीला कोरोनाची जोड मिळाल्याने तापमानातील बदलांचा आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबाबत वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना चिंता भेडसावत असेल तर ते रास्तच म्हणायला हवे. 

तापमान उतरत जाईल तसा हवेच्या अभिसरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत जाते आणि प्रदूषणात वाढत जाऊन हवेची गुणवत्ता ढासळते. सफरने आपल्या अहवालांमध्ये हवेतले धूलिकणांचे प्रमाण आणि हवेची गुणवत्ता यांविषयी वेळोवेळी इशारे दिले आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याचा विचार करता ही स्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. गेल्या काही महिन्यांपासून हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे, असंही सफरचे अहवाल सांगतात.

प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणा या सगळ्याविषयी काही उपाय योजना करत असणार हे जरी गृहीत धरलं तरी वाहनांचा वापर करण्याची गरज, वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत जाणारी वाहनांची संख्या, हवामानातले- एका अर्थाने तुमच्या, आमच्या हातात नसणारे, आणि एका अर्थाने तुमच्या, आमच्यामुळेच घडणारे - बदल या चक्रात सापडलेल्या प्रत्येकाला या परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे. 

बावधनच्या रहिवाशांनी सुरू केलेला उपक्रम हा या प्रकारचा पहिला नसला तरी बावधनकरांच्या प्रयोगाला आणि इतरत्र होत असलेल्या याच प्रकारच्या अन्य प्रयोगांना कोरोना विषाणूने माणसावर लादलेल्या अनिश्चिततेची पार्श्वभूमी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यानी काय होणार? काही लाख चारचाक्या आणि त्याही पेक्षा जास्त दुचाक्या असणाऱ्या शहरामध्ये काहीशे लोकांनी महिन्यातला एक दिवस त्यांच्या त्यांच्या गाड्या नाही रस्त्यावर आणल्या तर काय फरक पडणारे? असे प्रश्न विचारणं अगदी सोपं आहे. अशा प्रयोगांवर सिम्बॉलिझमचा शिक्का मारणेही सोपे आहे. पण गरज आहे ती, शक्य असेल तेव्हा वाहनं न वापरणं ही आवश्यक सवय म्हणून रुजवण्याच्या आणि रुजण्याच्या मानसिकतेची. बावधनच्या प्रयोगात पहिल्या महिन्यात सामील झालेल्या रहिवाशांपेक्षा दुसऱ्या महिन्यात सामील झालेल्या रहिवाशांची संख्या अधिक होती, ही बाब चांगलीच. 

कोरोनानी समस्त मानवजातीला शिकवलेल्या धड्यांमध्ये आता काही सवयी बदलाव्या लागतील हा धडा महत्त्वाचा आहे, हे समजावून घेतले तर आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आपण काय करू शकतो ते समजावून घेणं आणि करणंही आवश्यक असल्याचे पटायला जड जाणार नाही. मग जवळच्या अंतरासाठी स्वतःची वाहने न वापरण्यापासून, गाडीतून न उतरता खरेदी करण्याची सवय मोडण्यापासून ते कार पूल्ससारखे पर्याय शोधण्यापर्यंत आणि रस्त्यांवरून पायी चालणाऱ्यांसाठी आणि सायकलींचा वापर करणाऱ्यांसाठी प्रत्यक्ष रस्त्यांवर पुरेशा सुविधा असण्यापासून ते सक्षम सार्वजनिक वाहतूक असण्यापर्यंत अनेक बाबींचा आग्रह धरावा लागेल.

संबंधित बातम्या