जैवविविधतेचा विचार हवा

माधव मुकुंद गोखले
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

संपादकीय

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात सर्व काही ठप्प झालेले असताना जगभरातल्या अनेकांना त्यांच्या अंगणा-परसात नांदणाऱ्या जैवविविधतेचा अचानकच नव्याने परिचय झाल्याच्या़; पुणे-मुंबई-दिल्ली-चंदिगड- कोझीकोडे पासून ते पाचही खंडांमधल्या अनेक नगरामधून आलेल्या बातम्या आपण सगळ्यांनीच वाचल्या असतील. शहरवासियांच्या दिवसातल्या आठही प्रहरांवर आक्रमण करणारे गाड्यांचे, हॉर्नचे, आगगाड्यांचे, विमानांचे, यंत्रांचे असे सगळे आवाज, सगळा कोलाहल, गजबज थांबून गेली होती. अस्वस्थ करणाऱ्या बदलांची नांदी घेऊन आलेल्या अशांत शांततेने लपेटलेल्या त्या दिवसांमध्ये निसर्गावर माणसांच्या बरोबरीने हक्क असणाऱ्या, पण माणसाबरोबरच्या शर्यतीत माणसाच्या मागे पडलेल्या, हरलेल्या प्राण्यापक्ष्यांचे, सरिसृपांचे, किड्यामुंग्यांचे अस्तित्व माणसाला पुन्हा नव्याने जाणवत होते. 

सिमेंटच्या जंगलामध्ये जीव मुठीत धरून कशीबशी उभी असणारी, महानगरांमधल्या रस्त्यांच्या कडेला दिवसभर वाहनांच्या गजबजाटात, धुरांच्या लोटात गुदमरून जाणारी आणि सूर्य कलल्यानंतर विजेच्या अंगावर चालून येणाऱ्या प्रकाशात हरवून गेलेल्या झाडांच्या साथीने आणखीही काही जीव जगत असतात याची जाणीव त्या काळात नव्याने होत होती. एरवी कानावर पडले तरी ऐकू न येणारे आवाज, आपल्याच विवंचनांमध्ये घड्याळाच्या काट्यांना बांधून घेऊन धावणाऱ्या माणसाच्या नजरेत न आलेली जीवसृष्टी पुन्हा नव्याने दिसायला लागली होती. 

मुंबईतल्या एरवी सगळ्यात गजबजलेल्या रस्त्यांवर, पुण्यातल्या कोरेगाव पार्क किंवा औंध परिसरात दिसलेले मोर, नॉईडावासियांना दर्शन देऊन गेलेली निलगाय, नॅशनल पार्कमधल्या सुनसान रस्त्यांवर फिरणारी हरणे, मलबार हिल किंवा मरीन ड्राईव्हच्या समुद्रात दिसलेले डॉल्फिन, कोझिकोडे शहरातल्या एका चौकात दिसलेले मलबार फर्न स्पॉटेड सिव्हेट (जैवविविधता तज्ज्ञांच्या मते फक्त पश्‍चिम घाटांच्या रांगात आढणारी सिव्हेटसची ही प्रजाती आता लुप्त होते आहे. एका अंदाजानुसार पृथ्वीच्या पाठीवर आता फक्त काहीशे मलबार फर्न स्पॉटेड सिव्हेट उरली असावीत) हे सगळे बातम्यांचे विषय झाले. शहरांपासून लांब असणाऱ्या भागांमध्येही वन्यप्राण्यांचा वावर अधिक सहज झाल्याची निरिक्षणेही या काळात नोंदली गेली. 

लॉकडाउनच्या काळात प्रदूषणाचे प्रमाण घटल्याने जवळपास नऊ दशकांनंतर जालंदरमधून दिसलेल्या हिमालयाच्या शिखरांची किंवा बारामती परिसरातून घेतलेली थेट शिखर-शिंगणापूरच्या शंभूमहादेवाच्या मंदिराच्या शिखराची छायाचित्रेही कदाचित आपल्या पहाण्यात आली असतील. हवेतले प्रदूषण कमी झाल्याचे ते एक निदर्शक होते. 

मात्र, आपल्या भवताली वैविध्याने भरलेलं आणखी एवढं जग आहे याची नव्यानी जाणीव होत असताना या जैवविविधतेची काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या दोन घटना गेल्या महिना -तीन आठवड्यांच्या काळात घडल्या. 

त्यातली पहिली म्हणजे विश्व वन्यजीव निधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ‘लिव्हिंग प्लॅनेट २०२०’ हा अहवाल. गेल्या पन्नास वर्षांमध्ये, १९७० ते २०२० या काळात, जगाच्या पातळीवर वन्यजीवांमध्ये ६८ टक्के एवढ्या प्रचंड प्रमाणात घट झाली तर गोड्या पाण्यातली जवळपास ८४ टक्के जैवविविधता नष्ट झाली. ज्याची आपल्याला कल्पना होती असं वास्तव या अहवालानी ताज्या आकडेवारीनिशी पुन्हा आपल्यासमोर ठेवलं. 

पाठोपाठ घडलेली दुसरी घटना म्हणजे पंधराच दिवसांपूर्वी न्यू यॉर्कमध्ये कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी (सीबीडी) या आंतरराष्ट्रीय करारासंबंधी झालेली वार्षिक बैठक. भारतासह १९५ अन्य देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०१० हे वर्ष  आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष म्हणून साजरे केले होते. त्यावर्षी जपानमधल्या टोयोटा मोटर्सचे मुख्यालय असणाऱ्या ऐची या ठिकाणी झालेल्या परिषदेत पुढच्या दहा वर्षात जैवविविधता जपण्यासाठी काही किमान गोष्टी करण्याचे सदस्य राष्ट्रांनी ठरवले होते. दहा वर्षांची मुदत संपल्यावर त्याचा आढावा घेताना ठरवलेल्यापैकी एकही गोष्ट पुरी झालेली नाही असा या बैठकीचा निष्कर्ष आहे. 

सीबीडीच्या कार्यकारी सचिव एलिझाबेथ म्रेमा यांनी कराराच्या मूल्यमापनाची तुलना शाळेतल्या प्रगतीपुस्तकाशी केली. त्यांच्या मते दहा वर्षांपूर्वी जे काही ठरवले होते त्याच्या अंमलबजावणीला गुण द्यायचे म्हटले तर चांगल्यात चांगले गुणही तीस टक्क्यांच्या खालीच आहेत. 

अनेक सदस्य राष्ट्रांनी जैवविविधता आणि मानवाचे कल्याण यांच्यातल्या परस्परसंबंधांकडे दुर्लक्ष केले आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर चालताना पर्यावरणीय भांडवलाचा ऱ्हास होऊ दिला, असे या निमित्ताने मांडल्या गेलेल्या ‘यूएन ग्लोबल बायोडायव्हर्सिटी आऊटलूक ५’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेले असताना झालेल्या या बैठकीत मुख्यत्वे जैवविविधतेचा ऱ्हास आणि प्राणीजन्य रोगजनकांचा प्रसार यांच्यातल्या परस्पर संबंधांवर आणि जगाला विनाशाकडे नेणाऱ्या उद्योग-व्यवसायांना आळा घालण्याबाबत चर्चा झाली.

 फार काही घडलेले नाही हे मान्य करत सीबीडी आता नव्याने सुरुवात करणार आहे. 

जग आता अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. कोरोनाबरोबर लढत असताना अनेकांना अपरिमित नुकसान सोसावे लागले आहे. या परिस्थितीतही पुन्हा भरारी घेण्याची जिद्द बाळगून प्रत्येकचजण भविष्याच्या पुनर्बांधणीला भिडला आहे. कोरोनोत्तर जग पूर्वीसारखे नसणार, ते नेमके कसे असेल याच्या कल्पना अजूनही पुसट आहेत. हे सगळे पुन्हा घडवताना आपल्या भोवताली नांदणारी, अनेक अर्थांनी माणसाला मदत करणारी आणि माणसाच्या जगासोबतच निसर्गाचा अविभाज्य भाग असणाऱ्या जैवविविधतेचाही विचार करत पुढे जाणे आता क्रमप्राप्त आहे.  

संबंधित बातम्या