सीमोल्लंघन आणि लक्ष्मणरेषा!

माधव मुकुंद गोखले
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

संपादकीय

तापाने फणफणलेल्या बीमार माणसाला घाम फुटून किंचित हुशारी यावी, आणि कपाळावर पट्ट्या ठेवून उशाशी जागरणे करणाऱ्या ‘आपल्या’ माणसाकडे बघून त्याने म्लान स्मित करावे,  तसे काहीसे सृष्टीचे झाले आहे. अचानक उद्भवलेल्या ज्वराने अंथरुणाला खिळलेले चराचर आत्ता कुठे कण्हत बिछान्यात उठून बसू पाहाते आहे. ताप उतरतो आहे, औषधाची मात्रा लागू पडते आहे, पण अजूनही कुडीत अशक्तपणा भारी आहे. अशा काहीशा अवस्थेतच यंदाचा दसरा उजाडतो आहे. 

आश्विनातल्या शुद्ध पक्षातली ही दशमी खरे तर साडेतीन मुहूर्तांपैकी. कुंतीच्या पराक्रमी पुत्रांनी अज्ञातवास सोडून शमीवृक्षाच्या ढोलीत दडवलेली शस्त्रे या दिवशीच पुन्हा खांद्यावर घेतली. प्रभू श्रीरामांनी याच दिवशी  दशानन रावणाचा वध केला. आधी हातातल्या कार्याची यथासांग सांगता करून नवी मोहीम हाती घेण्याचा हा दिवस. नव्या उपक्रमाचा शुभारंभ करायचा, हेच तर दसऱ्याचे खरेखुरे सोने! थोडा विचार केला तर लक्षात येते की दसऱ्यासारखी सुरेख पहाट दुसरी नसेल. रात्रीचा काळोख मागे टाकून उदयाद्रीवर ‘उद्या’चा सूर्यनारायण उगवणार, आणि सारे जगत पुन्हा एकवार ज्योतिर्मय होऊन जाणार, हा आशावाद देतो तो दसऱ्याचाच ‌दिवस. हा नवदुर्गांचाही सण आहे. खळांची व्यंकटी सांडून स्वधर्म सूर्याची उगवतीला प्रतिष्ठापना करणाऱ्या मातृशक्तीचा हा दिवस. 

गतकाळात ज्यांनी जगण्याची उमेद दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाही हा शुभमुहूर्त आहे. आपल्या भारताची तर कृषकांची संस्कृती. पर्जन्यकाळात खांदेमोड काम करून शेतकऱ्याचं शिवार हिरवेगार होईल, एवढी मेहनत करणाऱ्या वृषभांचे कोडकौतुकही या दिवशी होते. त्यांचे साग्रसंगीत पूजन होते, त्यांना नवे अलंकार मिळतात. हळदकुंकू वाहून बैलांची खांदेमळणी करण्याची अतिशय सुंदर परंपरा आपल्या कृषिसंस्कृतीत आहे. ज्या खांद्यांनी वर्षभर धन्याच्या समृध्दीसाठी जू पेलले, अपार कष्ट घेतले, त्या वृषभांच्या खांद्यांना तेल चोळण्याची परंपरा किती हृद्य आहे नाही? आश्विनात शेतशिवार ऐन भरात आलेले असते. कामांना थोडा इस्वाटा मिळालेला असतो. लवकरच घरात येणारी लक्ष्मी धान्याच्या रूपानं तिथे शिवारात डोलत असते. दिवाळीचे वेध लागलेले असतात. अशा परिस्थितीत दसरा दारात येऊन तोरणासारखा लटकतो. शहरगावातही सणासुदीच्या दिवसांचे वेध लागलेले असतात. दसरा-दिवाळीचे दिवस म्हणजे वर्षातला सगळ्यात आनंदाचा काळ. एकमेकांना कडकडून भेटण्याचा हंगाम. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे…कडकडून भेटणे दुरापास्त झाले आहे.

एरवीची विजयादशमी असती तर चित्र काहीसे वेगळे असते. दुकाने, महादुकाने विक्रीच्या विविध चीजवस्तूंनी भरून गेलेली पाहायला मिळाली असती. गिऱ्हाइकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलून गेल्या असत्या.  

शहरगावच्या चाकरमानी समुदायात बोनस-बिनसच्या चर्चा झडू लागल्या असत्या. सणासुदीच्या खरेदीच्या बेतांचे, दिवाळीच्या सुटीतील पर्यटन सहलींची तिकिटे, आरक्षणे करून घेण्याचे दिवसही हेच. नव्या खर्चाचे रंगीन बेत रंगवण्याचा हा मोठ्या उमेदीचा काळ असतो. पण यावेळी तसे काही घडणार नाहीये.

दसऱ्याच्या शिलंगणाला यंदा मर्यादा पडल्या आहेत. कोरोना नावाच्या असुराने थैमान घातल्याने घराभोवतालची लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही, असे आरोग्य यंत्रणांनी बजावले आहे. लक्ष्मणरेषा न ओलांडता शिलंगण करायचे तरी कसे? प्रश्नच आहे.

गेले निम्म्याहून अधिक वर्ष लॉकडाउनच्या काचातच गेले. घराबाहेर दबा धरुन बसलेल्या कोरोनासुराने आपल्यातील अनेकांना झडप  घालून नेले. अवघी मानवजात विव्हल झाली. अजूनही संकट टळलेले नाही. घरात बंदिस्त राहून भुकेने खंगायचे की जपून पावले टाकत थोडे थोडे बाहेर पडून कामाला लागायचे? या पर्यायातला कुठला निवडायचा? या महासाथीला आटोक्यात आणणारे जालीम औषध अजून तरी सापडलेले नसले तरी सर्वतोपरी सावधानतेची लक्ष्मणरेषा पाळून जगण्याला पुन्हा प्रारंभ करायलाच हवा. ते कोणाला चुकले आहे? ‘या विषाणूला सोबत घेऊन स्वतःची आणि भवतालातल्या सगळ्यांचीच सगळी काळजी घेत जगायला शिका’ हा संस्कार स्वत:वर बिंबवणे, हेच खरे यंदाचे सीमोल्लंघन म्हणायचे.

मानवतेचा मास्क, सहवेदनेचा सॅनिटायझर आणि जिव्हाळ्याच्या धाग्याने बांधलेले ‘शारीर अंतर’ या तीन अस्त्रांनिशी आपल्याला आणखी काही काळ लढायचे आहे. काळ सणासुदीचा असला तरी कसोटीचाही आहेच. त्या कसोटीत आपल्याला उत्तीर्ण होण्यावाचून पर्याय तरी काय आहे? अर्थात, विज्ञानाचे शस्त्र मानवाने कधी खाली ठेवलेलेच नाही. मानवी जीवनेच्छेचे स्पंदन कधी थांबलेले नाही. जगण्याची ही जिद्द माणसाला गुहेतल्या आदिम दिवसांपासून इथवर  घेऊन आली आहे. त्यापुढे एक विषाणू काहीच नाही. लाखो माणसांचे प्राण घेणाऱ्या या घातक विषाणूचे नेस्तनाबुतीकरण होणार, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रश्न आहे तो आपल्या संयमाचा. ती लक्ष्मणरेषा मात्र पाळायला हवी.

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छांसह...

संबंधित बातम्या