फराळ... फराळ...!

माधव मुकुंद गोखले
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

संपादकीय

युगांकडून युगांकडे झालेल्या प्रवासात माणूस जसा स्थिरावत गेला तसा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलत गेल्या. माणसाच्या खाद्यसंस्कृतीच्या स्थित्यंतरांकडे एक नजर टाकली तरी निव्वळ उदरभरणाच्या प्राथमिक गरजेपासून ते खाद्यसंस्कृतीपर्यंत झालेला हा बदलांचा प्रवास सहज लक्षात येतो. आपल्याला हवं तेव्हा अग्निदेवतेला आपल्या मदतीला बोलावण्याची कला माणसाला साधली आणि माणसाच्या खाद्ययात्रेला एक नवंच परिमाण मिळालं. निसर्गातून मिळणाऱ्या खाण्यालायक पदार्थांवर भाजणे, उकडणे, शिजवणे अशा प्रक्रिया करण्यातून खाद्ययात्रा अधिक चवदार होत गेली. काळाच्या ओघात या चवींना भावनिक पदर जोडले गेले. आहाराचंही शास्त्र निर्माण झालं. जगभरात भरभराटीला आलेल्या सगळ्या संस्कृतींमध्ये सणवार, सोहळे, समारंभ इतकंच काय पण सुखदुःखाचे क्षणही आवर्जून खायच्या किंवा आवर्जून टाळायच्या पदार्थांशी जोडल्या गेले. पुरणाच्या पोळ्यांच्या नैवेद्याशिवाय होळी साजरी होत नाही आणि श्रीखंडाशिवाय पाडवा. दिवाळी म्हटल्यावर अशीच एक यादी डोळ्यांसमोर उभी राहाते. यादीच्या शीर्षस्थानी असणाऱ्या ‘श्री’काराखालच्या पदार्थांचं नातं असंच दीपोत्सवाशी जोडलं गेलं आहे.

‘हमने सौ लोगोंसे पूछा.....’च्या धर्तीवर एक प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. ‘दिवाळीचा सणाच्या उल्लेखाबरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या पाच गोष्टी प्राधान्याने उभ्या राहतात,’ असा प्रश्न शंभर लोकांना विचारला तर त्यातल्या ऐंशी जणांच्या उत्तरांमध्ये दिवाळीचा फराळ पहिल्या पाचात असतोच असतो. 

दीपोत्सवाची परंपरा पुराणकालापासून चालत आली आहे. ‘भविष्योत्तर पुराण’, ‘विष्णुपुराण’, ‘वर्षक्रियाकौमुदी’ अशा ग्रंथांमध्ये दीपावलीच्या परंपरेचे उल्लेख आहेत. दीपोत्सवाच्या काळात अभ्यंगस्नानानंतर ‘पक्वान्नांसारख्या पदार्थांचा अल्पाहार करितात’ असा उल्लेख ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या उत्तरार्धात आढळतो. मात्र या परंपरेचा त्या काळापासून ते आजपर्यंतचा प्रवास निश्चित स्वरूपात उलगडत नाही.  

आपल्या अन्य सणांप्रमाणे दीपोत्सवही कृषीसंस्कृतीशी जोडलेला असल्याने, धान्याच्या संपन्नतेच्या काळात साजय होणारा हा सण आप्तेष्टांबरोबर गोडाधोडाच्या पदार्थांसह साजरा करण्याच्या प्रथेमध्ये काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भर पडत गेली असणार.

दिवाळीचा फराळ म्हटल्यावर आज डोळ्यासमोर पदार्थांची जी यादी येते त्या पदार्थांच्या पूर्वजांचे उल्लेख प्राचीन पाकशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये सापडतात. नल-दमयंती आख्यानातल्या नलराजाच्या नावावर असलेल्या ‘नलपाकरहस्य’ ह्या ग्रंथात किंवा भारतीय कलांचा वारसा जपणाऱ्या तंजावरच्या भोसले घराण्यातल्या दीपांबिका राणीसाहेबांनी १७व्या शतकात लिहून घेतलेल्या ‘भोजनकुतूहलम’ या पाकशास्त्रविषयक ग्रंथात, आज दिवाळीतल्या फराळाचे म्हणून माहिती असलेल्या पदार्थांच्या पूर्वजांचे उल्लेख येतात. पण तरीही शालीपूप म्हणजे अनारसे, शंखपाला म्हणजे शंकरपाळी, शष्कुली म्हणजे करंजी यांच्या बरोबरीनेच लाडू, चिवडा, शेव आणि चिरोटे अशा पदार्थांची ‘दिवाळीचा फराळ’ म्हणून मोट कधी, कुठे, कशी बांधली गेली याचा नेमका उल्लेख सापडत नाही. अभ्यासकांच्या मते यातले लाडू आणि चकल्यांसारखे काही पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीच्या प्रवासात सामील झाले तेच मुळी देवाणघेवाणीतून. फराळाच्या पदार्थांमध्ये आज सरसकट वापरला जाणारा मैदा आणि पांढरी स्वच्छ दाणेदार साखर मुळात आपल्याकडे आली ती पंधराव्या शतकापासून व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या किनाऱ्यावर उरलेल्या युरोपातल्या व्यापाऱ्यांच्या बरोबर. आणि या पदार्थांनी आपल्याही खाद्ययात्रेमध्ये स्वतःचं स्थान पटकावलं ते कायमचंच.

फराळाच्या पदार्थांची आणखी एक खासियत म्हणजे यातले बरेचसे पदार्थ निगुतीने करावे लागतात. म्हणजे अनरशाला जाळी नीटच पडायला हवी पण म्हणून अनरसे तुपकटही लागता कामा नयेत किंवा ते ‘हसताही’ कामा नयेत. तळताना अनरसा फसफसला तर अनरसा ‘हसला’ असे म्हणतात. एखादी सुगरण आणखीही चार गोष्टी सांगू शकेल. पुन्हा या पदार्थांमध्येही प्रचंड वैविध्य आहे. ‘महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतीकोश’ नुसता चाळला जरी तरी अनरशांचे नऊ, करंज्यांचे अठ्ठावीस, चकल्यांचे अठरा आणि चिवड्याचे बावीस प्रकार मिळतात.

अजूनही अनेक घरांमध्ये दिवाळीची चाहूलच लागते ती फराळाच्या पदार्थांच्या तयारीने. अजूनही असं म्हणण्याचं कारण म्हणजे दिवाळीच्या फराळाच्या ताटात असणारे पदार्थ गेल्या काही दशकांपासून सहज आणि वर्षातल्या कोणत्याही दिवशी मिळायला लागले आहेत. त्यामुळे महिना महिना आधी सुरू होणारी तयारी आणि लगबग आता फारशी पहायला मिळत नसली तरी आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनातलं फराळाचं आणि दिवाळीचं नातं कणभरही उणावलेलं नाही.

या वर्षीची दिवाळी कोरोना विषाणूने जगभर माजवलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर साजरी होते आहे. गेल्या वर्षीपर्यंत आप्तेष्ट, मित्रमंडळींसह फराळाचा आनंद जसा लुटला तसा आनंद लुटण्यावर या वर्षी मर्यादा आहेत. कोरोनासह वावरताना आरोग्य यंत्रणांनी घातलेली बंधने, त्या मर्यादा डोळ्याआड न करता; आपल्या आरोग्याच्या गरजा, निरोगी राहण्याची गरज आणि जीवनशैलीचा विचार करून आपल्या सर्वांना फराळाचा आनंद घ्यायचा आहे. लॉकडाउनच्या काळात घरात राहण्याच्या सक्तीचा उपयोग करून अनेकांनी आपली आपली स्वयंपाकघरं ‘रिडिस्कव्हर’ केली आहेतच. पाकशास्त्राला नव्याने सामोरे जाण्याचा हा अनुभव अनेकांना विविध अंगाने संपन्न करून गेला असणार. 

‘सकाळ साप्ताहिक’चा दरवर्षी प्रमाणे येणारा हा ‘फराळ विशेषांक’ फराळाच्या नेहमीच्या चाकोरीबाहेरच्याही काही पाककृती आपल्यासमोर ठेवेल आणि आपल्या यंदाच्याही दिवाळीला अनोखी चव देईल असा विश्वास वाटतो.

अन्नपूर्णा आपणांस प्रसन्न होवो!  

संबंधित बातम्या