...दिठीच्या दिशा तेजाळताना

-
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

संपादकीय

जुनी दिवाळी आठवते आहे. फार जुनी नव्हे, काही वर्षांपूर्वीचीच. पहाटे उजाडायच्या आत घराघरात लगबग सुरू झालेली असे. पहाटेच्या काळोखातच पहिला फटाका वाजे. आसमंत दुमदुमे. आभाळाच्या अंधारात मौनपणे फुटणारे नळे, चंद्रज्योती हवेतला गारवा आणखीनच सुखद करून टाकत. हे घडायचं आभाळात, आणि खाली जमिनीवर गावागावात, वाड्यावस्त्यांत, घराघरात दिवाळीचा माहौल फराळाच्या खमंग वासासारखा दर्वळू लागे. 

दीपावलीच्या मंगलमय पावलांना निमंत्रण देत लटकणारा आकाशदिवा. जमेल तशी, पण मान मोडेस्तवर कुणीतरी खपून काढलेली रांगोळी. मंदपणे जळणाऱ्या पणत्या. 

चिमुकल्यांचा वावर असलेल्या घरात तर उत्साहाला धरबंद नसे. फुलबाजांच्या आणि उजेडांच्या झाडांचा प्रकाश त्या बच्चेकंपनीचे चेहरे अधिकच उठावदार करायचा.

...मग साग्रसंगीत अंघोळी उरकून नवेकोरे कपडे कपाटातून काढायचे. त्याचा नवाकोरा वास नाकाशी रुंजी घालायचा.

 अशा शुचिर्भूत अवस्थेत मित्र-मैत्रिणींचा शहरगावात फेरफटका ठरलेला. एकमेकांना भेटणं, खिदळणं. आपल्या शरीरात दिवाळीचं सुख भिनतं आहे, याची जाणीव करून देणारे ते जिवंत क्षण होते. यंदाची दिवाळी मात्र थोडी निराळी आहे. 

कित्येक महिने वीज गेलेल्या वस्तीत अचानक एकेक घरात उजेड लुकलुकावा, बंद पडलेल्या पंख्याच्या पात्यांमध्ये जोर शिरावा, आणि मलूल पडलेल्या घरात पुन्हा जीवनाचा संचार व्हावा, तशी काहीशी भावना यंदाच्या दिवाळीत आहे. गेलेली वीज पुन्हा टिकाव धरेल की पुन्हा गायब होईल, याची धाकधूक असते. तशीच ती यंदाच्या दिवाळीच्या उजाळ्याबाबत आहे. 

दीपावलीच्या मांगल्याने भारलेले हे उत्सवी वातावरण टिकेल का? ईडापीडा टळेल का? पुन्हा सारे काही सुरळीत होईल का? उष:काल होता होता, पुन्हा काळरात्र तर येणार नाही ना? या भस्मासुरी सवालांना दूर सारण्याच्या खटाटोपात आपण सारेच आहोत. त्यातलाच एक छोटासा प्रयत्न म्हणूनच यंदाचा ‘सकाळ साप्ताहिक’चा दिवाळी अंक आपल्या हातात येतो आहे. दिवाळीचा आनंद तो द्विगुणित करेल, यात शंका नाही.

‘जुने जाऊ द्या मरणांलागुनी’ या उक्तीनुसार चालत दुर्दम्य सकारात्मकतेनं ठामपणे पावलं टाकत उजेडाचं गाव गाठायचंच, या आदिम मानवी मूल्याशी इमान 

राखणारा साहित्यिक फराळ यंदा ‘सकाळ साप्ताहिक’च्या पानापानांमधून दिसेल. इथं जिवाभावाचे मित्र आणि मैत्रिणी आपल्या अनुभवांबद्दल आसुसून सांगताहेत. 

एरवी भटकंतीत महिनोनमहिने घराबाहेर हिंडणारे जातिवंत मुसाफिर आपल्या लॉकडाउनमधल्या मनाच्या मुशाफिरीची प्रवास वर्णनं सांगताहेत. जुन्या सफरींचे अनुभव घासून पुसून लख्ख करून समोर ठेवताहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात लघुकथांचं दालन संपन्न आणि प्रवाही आहे. जग बदलतं, काळ बदलतो, तसंच साहित्यही बदलत असतं. नवनवे रूपबंध, नवा आशय आपापली मुळं धरू लागतात. त्या बदलाची हाळी देणाऱ्या ताज्या कथांचा नजराणाच वाचकांसाठी येथे पेश केला आहे. ज्यांच्या कवितांची रसिक असोशीनं वर्षभर वाट पाहात असतात, त्या नावाजलेल्या कविमंडळींनी आपापलं पान पंगतीत धरलं आहे. बरंच काही हवंहवंसं यंदाच्या ‘सकाळ साप्ताहिक’च्या अंकात आढळेल.

दिव्याभोवती काजळी धरते. वात विझलेल्या दिव्यावर तर धूळही चढते. तसा तो घासून पुसून लख्ख करून पेटवतानाच जणू आक्रीत घडलं; आणि त्यातून प्रकटलेल्या मैत्रीच्या मायाळू राक्षसानं ‘बोल मेरे आका’ असं म्हणत चक्क हातात ‘सकाळ साप्ताहिक’चा दिवाळी अंकच ठेवला! 

दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे? कुणी जागले? ...

कविवर्य शंकर रामाणींच्या या काव्यदीपाच्या प्रसिद्ध ओळी आज अचूक लागू पडतात. दिव्याचे प्रयोजन अंधारातच असते. मांगल्याचा, आशेचा एक दिवा त्या तिमिराला मागे लोटायला पुरेसा ठरतो. 

तो दिवा तुमच्या आमच्या आयुष्यात सदैव तेवत राहो, या प्रार्थनेसह दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

संबंधित बातम्या