येईल हे करता आपल्याला?

माधव मुकुंद गोखले
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

संपादकीय

सगळ्या जगाला वेठीला धरणाऱ्या कोव्हीड-19 विषाणूने माणसाचे कुठेकुठे आणि किती नुकसान केले आहे, याच्या कहाण्या मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक समोर येत आहेत. विषाणूच्या विळख्यात सापडलेला; त्यातून बाहेर पडलेला, बाहेर न पडता आलेला प्रत्येक माणूस ही एक एक स्वतंत्र कहाणी आहेच, पण या सगळ्याचे माणसांच्या जगण्यावर, जगण्याच्या साधनांवर, माणसा-माणसातल्या नात्यांवर, अर्थकारणावर, एकूणच जगण्याच्या प्रत्येक कोनावर झालेले एकत्रित परिणाम - ही आणखीनच स्वतंत्र कहाणी आहे. माणूस मूलतःच विजिगिषू असला तरी अजूनही त्याच्या नियंत्रणात न आलेल्या कोव्हीड-19 मुळे माणसानी काय काय गमावलंय, याचा अंदाज घेणारे अभ्यासही जगभर सुरू आहेत. असाच एक अभ्यास नुकताच वाचनात आला. त्या अभ्यासाचा विषय आणि त्यातून पुढे येणारे विषय आणखीनच चक्राऊन टाकणारे आहेत.

दिल्लीतल्या एका संस्थेतल्या क्लिनिकल रिसर्च विभागातल्या संशोधकांच्या अभ्यासाचे सार थोडक्यात मांडायचे तर भारतात कोरोनाच्या साथीने झालेल्या अकाली मृत्यूंमुळे भारतवासीयांच्या आयुष्यातून एकूण चाळीस लाख उत्पादक वर्षे वजा होणार आहेत. ह्या शोधनिबंधातली एक टिपणी आणखी वेगळा विचार करायला लावणारी आहे. देशात दर दिवशी कुठे ना कुठे होणाऱ्या रस्ते अपघातांमुळे आपण गमावत असलेल्या वर्षांचा -इयर्स ऑफ लाईफ लॉस्ट, वायएलएल- विचार केला तर ते नुकसान कोव्हिड-19नी घडवलेल्या उत्पातांपेक्षाही भयानक आहे, असे हे अभ्यासक म्हणतात. 

वायएलएल ही कल्पना सोप्या शब्दांत सांगायची तर एखाद्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे किती वर्षांचे सक्रीय आयुष्य लाभले असते याचे गणित. 

रस्ते अपघातांमुळे होणारे नुकसान हा विषय नवा नाही. पण इयर्स ऑफ लाईफ लॉस्ट संदर्भातला अभ्यास वाचत असताना, या मुद्द्यावर अडखळायला होते. कोव्हिड-19ने घडवलेला उत्पात अनपेक्षित होता, अनाकलनीय होता. पण रस्त्यांवरचे अपघात हा विषय तसा नाही. कोव्हिड-19 विषाणूला थोपवण्याचा खात्रीलायक उपाय दृष्टीपथात असला तरी अजून तो आपल्या हातात नाही, मिळणारा उपाय किती खात्रालायक असेल त्याचाही अंदाज नाही. हा मुद्दा देखील रस्ते अपघातांच्या बाबतीत लागू ठरत नाही. अपघात का होतात? अपघात कमी करता येतील का? या सगळ्या विषयांवर आतापर्यंत खूप काही लिहिलं, बोललं गेलं आहे. अगदी स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयावर अभ्यास झाले आहेत, होत आहेत.

काही आठवड्यांपूर्वी नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्यूरोने 2019चा क्राईम इन इंडिया हा अहवाल प्रसिद्ध झाला. दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध होतो. गेल्या वर्षभरात देशभरात झालेल्या रस्ते अपघातात एक लाख छत्तीस हजारहून अधिक जणांनी, म्हणजे दर तासाला साधारण सोळा जणांनी, प्राण गमावले, असं या अहवालातली आकडेवारी सांगते. ही संख्या एकूण अपघाती मृत्यूंच्या निम्मी आहे. या एक लाख छत्तीस हजारांमध्ये कितीतरी कर्ते कुटुंबप्रमुख असतील, हाताशी आलेली मुलं- मुली असतील. या मृत्यूंमुळे कितीतरी कुटुंब उघड्यावर पडली असतील, असंख्य स्वप्नांचा चक्काचूर झाला असेल. यातला गंभीर मुद्दा म्हणजे रस्ते अपघातात बळी पडलेल्यांची संख्या गेल्या तीन वर्षात वाढते आहे. काही काही आलेख चढते राहतात याचाच अर्थच काहीतरी चुकते आहे असा होतो. हा आलेख त्यांतलाच. त्यातही, रस्ते अपघातामागची कारणं, त्याच्यावरच्या उपाययोजना माहिती असतानाही हा आलेख चढता रहाणं हे अधिक गंभीर आहे.

रस्ते अपघातांच्या घटनांना अनेक पदर आहेत. रस्त्यांची स्थिती, वाहनांची देखभाल, रस्ते वापरणाऱ्यांसाठी पुरेशा सुविधा, रस्त्यांवर चालताना, वाहन चालवताना पाळावयाच्या शिस्तीचा अभाव अशी  अनेक कारणं सांगता येतील. तज्ज्ञांनी ती वारंवार सांगितलीही आहेत. मुद्दा आहे तो या कारणं समजावून घेऊन त्यांवर मात करण्याच्या इच्छाशक्तीचा, प्रत्येक देशवासियाच्या इच्छाशक्तीचा. यात प्रशासनाचा, नेतृत्वाचा जेवढा सहभाग अपेक्षित आहे, तितकाच, किंबहुना कांकणभर अधिकच सहभाग सर्वसामान्य नागरिकांचाही असणं अपेक्षित आहे.

वाहतुकीचे नियम पाळणं हा खरंतर किती साधा मुद्दा आहे. पण दुर्दैवाने वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह धरणारे कायमच अल्पमतात असतात. परदेशामध्ये सगळी लोकं वाहतुकीचे नियम कसे पाळतात, आणि सिग्नल लाल असताना एकटादुकटा मोटरसायकलवाला किंवा कारवाला कसा थांबून रहातो,  सिग्नल हिरवा झाला की मगच कसा तो पुढे जातो, झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी परदेशात वाहनं कशी थांबून रहातात, अशा कथा आपल्या दृष्टीने "सुरस आणि चमत्कारिक" या सदरात मोडतात. सकाळी मुलाला शाळेत सोडायला जाताना, "चालतं रे, आत्ता कोण बघतंय" असं म्हणत ‘वन वे’चा नियम मोडणाऱ्या बाबा किंवा आईकडून मुलाने त्या संस्कारक्षम वयात कोणता धडा घ्यावा.

याला यंत्रणांची जबाबदारी ही दुसरी बाजूही नक्कीच आहे. अपुऱ्या सुविधा, अयोग्य अंमलबजावणी, यंत्रणांमधल्या समन्वयाचा अभाव याचीही झालर या सर्व घटनांना आहे.

अपघातामध्ये होणारा प्रत्येक मृत्यू अकाली असतो. ठरवलं यातले काही अपघात निश्चितच टाळता येतील. कोव्हिड-19ला हरवण्याचा विडा जसा आपण उचलला आहे, तसंच कोव्हिडोत्तर न्यू नॉर्मलसाठी तयार होताना आपण रस्ते अपघात रोखण्याचाही चंग बांधूया. रस्ते अपघातात अकाली मालवल्या जाणाऱ्या प्राणज्योती आणि त्यामुळे होणारी हानी टाळता येणे शक्य आहे, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूचा प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे, हे समजून घेऊ या. वैयक्तिक पातळीवर आपण हे बोलत राहू, स्वतःला आणि इतरांनाही सांगत राहू.

संबंधित बातम्या