एक नवी सुरूवात

माधव मुकुंद गोखले
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

संपादकीय  

जगाला वेढून टाकणाऱ्या अनिश्चिततेच्या कृष्णमेघांना चंदेरी किनार लावणाऱ्या ज्या काही थोड्याफार घटना गेल्या नऊ दहा महिन्यांत घडल्या आहेत त्यातली अगदी अलीकडची गोष्ट म्हणजे लोणार सरोवराला देण्यात आलेला ‘रामसर स्थळा’चा दर्जा. दीपोत्सवाचा पहिला दीप प्रज्वलित होत असतानाच आलेली ही बातमी अनेकांना सुखावून गेली असणार यात शंका नाही. भूवैज्ञानिकांसह निसर्गाबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाला खुणावत राहणाऱ्या लोणार सरोवर परिसराचे जतन होण्याच्या आवश्यकतेला या ताज्या निर्णयामुळे बळ मिळेल अशी आता रास्त अपेक्षा आहे.

गेल्या काही दशकांमध्ये अनेक कारणांमुळे लोणार सरोवर चर्चेत राहिले आहे. कधी ही चर्चा लोणारच्या विवराच्या परिसरात आढळणाऱ्या जैवविविधतेची असते, कधी पाण्याच्या बदललेल्या रंगाची; घटणाऱ्या क्षार घनतेची, कधी या आघाती विवराचे थेट मंगळ आणि चंद्राशी नाते असण्याच्या संशोधकांच्या दाव्यांविषयीची, कधी या विवराच्या जुनेपणाची, कधी युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे, स्मिथसोनिअन इन्स्टिट्यूट, नासा, जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, आयआयटी, खरगपूर सारख्या संस्थेतल्या वैज्ञानिकांच्या शोध मोहीमांबद्दल असते तर कधी ही चर्चा आजूबाजूच्या परिसरातून जाणाऱ्या या विवरात जाणाऱ्या सांडपाण्याला रोखण्यासाठी सजग लोणारकरांनी, सरोवराच्या जतनाचे महत्त्व जाणणाऱ्या मंडळींनी मांडलेल्या प्रयत्नांची असते.

कधीकाळी विरजतीर्थ म्हणून ओळखले जाणारे लोणार हे वऱ्हाडातले सर्वात प्राचीन गाव असल्याचे श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा़’त नमूद केले आहे. अत्यंत सुंदर मंदिरांनी वेढलेल्या या सरोवराचे पौराणिक संदर्भ, त्या मंदिरांशी जोडलेल्या पौराणिक कथांचे संदर्भही वाचायला मिळतात. पद्म पुराण आणि स्कंद पुराणात जसे लोणारचे उल्लेख आहेत तसे सोळाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आईने अकबरी या तत्कालीन प्रशासन पद्धतीविषयी लिहिल्या गेलेल्या ग्रंथातही खाऱ्या पाण्याच्या या सरोवराचा उल्लेख असल्याचा संदर्भ मराठी विश्वकोशात मिळतो. पाश्चिमात्य संशोधकांचे लक्ष लोणारकडे गेले त्याला आता दोनशे वर्ष होतील. गेली दोन शतके हे विवर आणि त्याच्या पोटातली गुपिते संशोधकांना खुणावत आहेत. 

हिवाळ्यात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्थलांतर करून जाणाऱ्या पक्ष्यांचे आश्रयस्थान असण्यापासून अनेक नैसर्गिक सेवा पुरवणाऱ्या पाणथळ जागांचे पर्यावरणातले महत्त्व लक्षात घेऊन, अशा जागांचे संवर्धन, संरक्षण व्हावे अशी चर्चा सुरू झाली ती साठीच्या दशकाच्या मध्यावर. ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅंड्स ऑफ इंटरनॅशनल इंपॉर्टन्स इस्पेशियली ॲज वॉटरफाऊल हॅबिटाट्स’ किंवा ‘रामसर करार’ हे या चर्चेचे फलस्वरूप. कॅस्पियन  

समुद्राच्या इराणमध्ये असलेल्या किनाऱ्यावरच्या रामसर शहरात फेब्रुवारी १९७१मध्ये झालेल्या या परिषदेत भारताच्यावतीने पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली यांच्यासह एक द्विसदस्यीय शिष्टमंडळ सहभागी झाले होते. डिसेंबर १९७५मध्ये रामसर करार प्रत्यक्ष अंमलात आला. भारताने फेब्रुवारी १९८२मध्ये या कराराला मान्यता दिली. ‘रामसर दर्जा़’च्या पाणथळ जागांचे संवर्धन हा या करारानुसार आंतरराष्ट्रीय कृती आराखड्याचा भाग ठरतो.  

चिल्का सरोवर, सुंदरबन यांसह भारतातल्या एक्केचाळीस पाणथळ जागांना आतापर्यंत ‘रामसर साइट्स’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. नाशिक जवळचे नांदूर-मध्यमेश्वर हे महाराष्ट्रातले पहिले ‘रामसर स्थळ’ आणि आता साडेपाच लाख वर्षांपूर्वी अवकाशातून अतिशय वेगाने पृथ्वीवर आदळलेल्या उल्केमुळे निर्माण झालेले लोणार सरोवर. (बेसॉल्ट खडकावर उल्कापाताने तयार झालेल्या जगातल्या या एकमेव विवराच्या वयाबद्दल संशोधकांनी अनेक अंदाज बांधले आहेत. मात्र साधारण दहा वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात अरगॉन डेटींग पद्धतीच्या आधारे  लोणार सरोवराची निर्मिती साडेपाच लाख वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.) भूवैज्ञानिक महत्त्वाबरोबरच जैवविविधतेने संपन्न असलेल्या लोणार सरोवर परिसराला ‘रामसर स्थळा’चा दर्जा मिळावा यासाठी  गेली तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. लोणार सरोवर परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करून महाराष्ट्र सरकारने सरोवर परिसराचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले होते. त्याही आधीपासून लोणारच्या काही सजग नागरिकांनी  न्यायालयांपासून विविध पातळ्यांवर चालवलेले प्रयत्न, गेल्या तीन वर्षांपासून चालवलेला ‘मी लोणारकर’ सारखा उपक्रम, वन्यजीव, पर्यटन विभागांसह स्थानिक यंत्रणा आणि अन्य संस्थांनी विविध स्तरांवर केलेले प्रयत्न या सगळ्यांचा लोणारच्या जपणुकीमध्ये मोठा वाटा असणार आहे. 

‘रामसर स्थळा’चा दर्जा ही लोणारसाठी नक्कीच एक नवी सुरूवात असेल. सरोवरचे प्रदूषण रोखणे हा आता पुढच्या वाटचालीतला प्राधान्याचा भाग असू शकतो, तसाच पर्यावरणाला, जैवविविधतेला, मंदिरांना, त्यांवरील शिल्पांना झळा लागणार नाही याची खात्री देत, स्थानिकांच्या सहभागाने केलेला पर्यटन विकास हा देखील महत्त्वाचा भाग असेल. या परिसरातल्या पर्यावरणीय आणि देवळांशी जोडलेल्या पर्यटनाला विज्ञान पर्यटनाचीही जोड देता येईल.

लोणार सरोवराला नव्याने आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणाऱ्या या घटनेमुळे अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत. त्याला योग्य तो प्रतिसाद देणे ही आता आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे

संबंधित बातम्या