‘तुम्ही लकी आहात...’

माधव मुकुंद गोखले
सोमवार, 7 डिसेंबर 2020

संपादकीय
 

"नमश्कार, क्या मेरी बात श्री. अमुक तमुकसे हो रही है....."

"आप बहोत लकी हो । आप एक ब्रँड न्यू लक्झुरी कार के ओनर बन गये हो ।"

"आपल्या कार्डाच्या मागे काळ्या पट्टीच्या शेवटी एक तीन आकडी नंबर असेल, तो सांगा म्हणजे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील..."

"मी फलाण्या फलाण्या बँकेचा मॅनेजर बोलतो आहे. तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक झालं आहे. तुम्हाला ते परत सुरू करायचं आहे का?"

"..............."

हे सगळे संवाद ओळखीचे वाटतात का? तुम्ही स्वतः कधीतरी ते ऐकले असतील. किंवा या संवादांना आणि त्यांच्या हातात हात घालून येणाऱ्या लॉटरीच्या, महागड्या सहलीच्या, फुकट मिळणाऱ्या महागड्या वस्तूच्या मोहाला किंवा एटीएम, डेबिट, क्रेडीट कार्ड बंद होण्याच्या, केवायसी नसल्याच्या, विम्याचे पैसे बुडण्याच्या भीतीला बळी पडलेल्यांच्या कहाण्या तुमच्या कानावर असतील. 

मोह आणि भीती या कोणत्याही काळात विकल्या जाणाऱ्या मानवी भावना आहेत, हे सत्य सायबर फसवणुकीच्या घटनांमधून उलगडत जाताना दिसतं. लाख ठरवूनही माणूस मोहावर किंवा भीतीवर मात करू शकत नाही. या मानसिकतेचा फायदा घेऊन लुबाडणूक करणाऱ्या टोळ्या आपल्यापासून फक्त एका माऊसक्लिक अंतरावर आहेत. फसलेला माणूस सुशिक्षित होता की नव्हता याचा या फसवणुकीशी जसा काहीच संबंध नाही तसाच तो फसणाऱ्या माणसाच्या आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमीशीही नाही. हातातल्या मोबाईल फोनमध्ये स्वतःची आख्खी बँक घेऊन फिरण्याची कल्पनाच लोभसवाणी आहे. ती सोय आहे यात शंकाच नाही. पण या बँकेबरोबरच आपण आपल्या मनातला सहज मिळणाऱ्या पैशाचा मोह आणि कमावलेले पैसे गमावण्याची भीतीही घेऊन फिरत असतो याचा विसर पडला की सायबर गुन्हेगारांच्या जाळं आवळत जात. 

एफबीआय या अमेरिकी गुप्तचर संघटनेमध्ये ‘इंटरनेट क्राईम कम्प्लेंट सेंटर’ किंवा आयसी3 अशा नावाचे एक केंद्र आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये,  या सेंटरनी २०१९ या वर्षात जगभरातल्या ४८ देशांमध्ये घडलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार इंटरनेट क्राईमला बळी पडणाऱ्या अमेरिकेतर देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा होता. 

सायबर फ्रॉड्सच्या जगभरातल्या घटनांमध्ये काही समान धागा शोधायचाच झाला तर वाडवडिलांनी सांगितलेला, "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" हा धडा सगळ्यांच्याच विस्मरणात गेल्याचे लक्षात येते. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालांतली चक्रावून टाकणारी आकडेवारी, दरदिवशी माध्यमांमधून मिळणाऱ्या बातम्या, सायबर क्राईम कॅपिटल म्हणवल्या जाणाऱ्या जामतारा या झारखंडमधल्या गावाबद्दलच्या कानावर पडणाऱ्या, वाचायला मिळणाऱ्या चित्तरकथा (अलीकडेच या विषयावर एक वेबसिरिजही प्रदर्शित झाली आहे) या सगळ्यांतून लोभ आणि मोहाचीच कहाणी पुन्हा पुन्हा पुढे येत राहते.

सायबर गुन्हेगार अत्याधुनिक होत आहेत हा मुद्दा मांडताना आयसी3च्या प्रमुख डोना ग्रेगरी खऱ्या खोट्यातला फरक ओळखून शंका घेणेही आता अवघड होत चालले आहे, असे निरीक्षणही अधोरेखित करतात.

या साऱ्या पार्श्वभूमीवर वाढते सायबर फ्रॉड रोखण्याऱ्या यंत्रणा आणि उपाययोजनाही सक्षम होत आहेत. बँका, वित्त संस्था तुमच्या खात्याची, डेबिट, क्रेडीट कार्डांची माहिती फोनवर कधीही मागत नाहीत, मेलबॉक्समध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करताना एक क्षण थांबून विचार करा, अशा अर्थाच्या सूचना आपल्या सर्वांनाच आपापल्या बँकांकडून, वित्त संस्थांकडून येत असतात. पैसे गेल्याच्या बातम्यांसारख्याच, गेलेले पैसे परत मिळाल्याच्याही बातम्या वाचायला मिळतात. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेनेच अनेक प्रकरणांचा पाठपुरावा करून आत्तापर्यंत काही कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत.

हे खरे असले तरी, सायबर क्राईम रोखण्यासाठी होत असलेल्या उपायांची परिणामकारकता आणि त्यांचे यश ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या प्रत्येकाच्या सजगतेवर आणि सद्सदविवेकबुद्धिवरही अवलंबून आहे हे देखील तितकेच खरे आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी तुमची बँक जशी दोन स्तरांवर तपासणी करते, तशीच सवय स्वतःलाही लावून घ्या, असा आग्रहाचा सल्ला म्हणूनच डोना ग्रेगरी देतात.

तीन वर्षांपूर्वी इस्त्राईलमधल्या एका सायबर सुरक्षा तज्ज्ञाशी बोलताना वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या सायबर हल्ल्यांचे स्वरूप उलगडत गेले होते. त्या तज्ज्ञाच्या मते, सायबर हल्ल्याची भीती कितीही मोठी असली तरी सायबर जगात वावरताना वैयक्तिक माहितीबाबतची गोपनीयता, त्यात वेळोवेळी आवश्यक ते बदल होणे आणि फायरवॉल्स् अपडेट असणे हाच त्यावरचा खात्रीलायक उपाय आहे. एक फायरवॉल आता स्वतः भोवतीही उभी करायला हवी. लोभेन बुद्धिश्चलती, लोभो जनयते तृषाम्  (लोभ भावनेमुळे बुद्धी चंचल होते. लोभ भावनेमुळे लालसा उत्पन्न होते) हे माहिती असतं आपल्याला; तरीही तो क्षण नेमका ओळखून टाळणं कठीण असतं.  ‘पुढे खड्डा असू शकतो’'' ही जाणीव मनाच्या बॅकअपमध्ये सतत फ्लॅश होत राहील असं काही सेटिंग करता येईल का, ते विचारायला हवं...    

संबंधित बातम्या