सांगावा २०२१चा

संपादक
सोमवार, 28 डिसेंबर 2020

संपादकीय

दुसऱ्या सहस्रकाची विशी सुरू झाली होती नेहमीच्याच उत्साहात. या सहस्रकातल्या शेवटच्या टीन एजला, ट्वेन्टी नाइन्टीनला, निरोप देताना आनंदाचे चषक रिकामे झाले होते, बऱ्याचशा जुन्या संकल्पांना नवी झळाळी मिळाली होती, काही बहाद्दरांनी काही संकल्प नव्यानेही केले होते. प्रश्न होतेच, पण नवी स्वप्नंही होती. अनेकांसाठी 2020 ड्रीम इयरही होतं. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी दिलेल्या ‘‘अजेंडा २०२०’’ अजून पूर्णपणे विस्मृतीत गेलेला नव्हता. पण विशीत प्रवेश केल्यानंतर सत्तर एक दिवसांतच 2020चा नूरच बदलला. इतका की ''टाइम'' साप्ताहिकाने या वर्षातल्या शेवटच्या अंकात २०२० हे आतापर्यंतचे "सर्वात वाईट" वर्ष असल्याचे जाहीर करून 2020वर एक मोठी लाल फुली मारली होती. जणू जगभरातल्या असंख्य लोकांच्या मनातलाच सल मुखपृष्ठावर मांडून ‘टाइम’ने २०२०च्या सर्व स्मृती जणू पुसून टाकल्या आहेत. जगाचा इतिहासाला कलाटणी देणाऱ्या वर्षांच्या यादीत २०२० कायमचे जाऊन बसले आहे.

सगळ्या जगाच्या गळ्याला फास लावणारं दुसऱ्या महायुद्धानंतर माणसावर आलेलं हे सर्वात मोठं संकट. गेल्या दहा-अकरा महिन्यात दुर्दैवाचे अक्षरशः दशावतार या विषाणूने मनुष्यजातीला दाखवले, तशीच माणसाची या सगळ्यावर मात करून तगून राहण्याची, तरून जाण्याची आकांक्षाही फुलवली. एकीकडे भविष्याचा पत्ता नसलेले लाखो लोक घर नावाच्या सुरक्षेकडे परतताना आपण पाहिले, दुसरीकडे नव्याने निर्माण होणाऱ्या सामाजिक दऱ्या पाहिल्या तशाच माणसातली माणुसकी जागी असल्याच्या साक्ष देणाऱ्याही असंख्य घटना आपल्या आजूबाजूला घडून गेल्या; आपली, आपल्या कुटुंबाची, पोराबाळांची काळजी बाजूला ठेवून कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांच्या मदतीला लाखो कोरोनायोद्धे धावले. यातल्या प्रत्येकाने मनुष्याला माणूसपण जागे असल्याचा दिलासा दिला. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी याही परिस्थितीवर मात करण्यासाठी कंबर कसली.

जगाच्या काही भागात कोरोनाला रोखू शकणारी लस द्यायला आता सुरुवात झाली आहे. त्याची परिणामकारता आणखी काही दिवसांत लक्षात येईल. विज्ञान आपला मार्ग शोधत राहील; पण दुसरं सहस्त्रक एकवीशीत प्रवेश करत असताना कोरोना विषाणूने उडवलेला हाहाकार संपलेला नाही. जगभरात एक कोटी पेक्षा जास्त लोकांचे प्राण घेणाऱ्या, त्याही पेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकांच्या आयुष्यांमध्ये प्रचंड उलथापालथ घडवणाऱ्या या विषाणूने आता रूप पालटून जगाच्या काही भागांत पुन्हा लोकांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे. कोरोना नावाचा हा विषाणू भविष्यात जगाला कुठे घेऊन जाणार आहे याचा  अजूनही अंदाज नसलेल्या माणसांनी आता कोरोनाला जगण्याचा अटळ भाग म्हणून स्वीकारला आहे. जात्या वर्षाने आयुष्याच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी या सगळ्या उत्पातातूनही नवसर्जनाचे आव्हान स्वीकारत जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या छोट्यामोठ्या माणसांनी पुन्हा उभारी धरली आहे. 

माणसाला कुठल्या ना कुठल्या दिशेला ढकलत रहाणाऱ्या ‘आशा’ नावाच्या अजब रसायनाला सुभाषितकारांनी शृंखलेची उपमा दिली आहे. आणि ही शृंखला चमत्कारिक आहे, कारण ‘‘बद्धा यया प्रधावन्ती । मुक्तास्तिष्ठंती पंगुवत् ।।’’. ‘आशा’ नावाच्या बेडीच्या बंधनात अडकलेला माणूस धावत असतो; काहीवेळा लक्ष्य गाठायला, तर काही वेळा निव्वळ मृगजळामागे. पण हे धावणंच धावणाऱ्याला तगवून ठेवत असतं, हे नाही नाकारता येणार.

कोरोनानी बांधून घातलं असलं तरी आपल्याला थांबून चालणार नाही. जे घडतं आहे त्याचा अभ्यास करून दिशा ठरवाव्या लागतील. काय चुकलं आणि कुठे चुकलं, त्याचा अंदाज घ्यावा लागेल, पण थांबून, थबकून, हातपाय गाळून नाही निभावणार.  कोरोना विषाणूने जगण्यात खूप काही बदल घडवले आहेत, त्या बदलांना सामोरे जाताना कदाचित आणखीही काही बदल घडतील; त्या बदलांवर नजर ठेवूनच आता पुढे जायचे आहे. आणखी काही कौशल्ये, कल्पना काळाच्या पडद्याआड जातील. त्यांची जागा घेणाऱ्या नव्या कौशल्यांचे स्वागत करावे लागेल, क्वचित काही नवी कौशल्ये विकसित करावी लागतील. शिकून पुढे जाणं माणसाला नवीन नाही. अंगठ्याचा वापर करायला शिकलेल्या कपीकुळातल्या एका शाखेचा विस्तार या शिकत राहण्याच्या वृत्तीतूनच झाला आहे, याचा मात्र आता पुढच्या प्रवासात विसर पडू देऊन चालणार नाही. हाच सांगावा असेल २०२१चा. 

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला । “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!’’, हे कविवर्य कुसुमाग्रजांचे शब्द आणखी एकदा सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे.

याच भावनेसह नव्या वर्षाचे स्वागत करूयात. आपणा सर्वांना हे नवे वर्ष आरोग्यदायी भरभराटीचे जावो, आपल्या साऱ्या आकांक्षा पूर्ण होवोत, अशाच शुभेच्छा

संबंधित बातम्या