मांजर नसलेल्या मांजरासाठी

संपादकीय
सोमवार, 11 जानेवारी 2021

संपादकीय

मांजर आडवं गेल्यावर माणसाला अपशकून होतो म्हणे. ही बदनामी मांजरांच्या कपाळी कोणी लिहिली कोणास ठाऊक... पण माणूस आडवा गेल्यावर एका मांजराला मात्र नक्की अपशकून होतो. त्या मांजराला याची कल्पना असण्याचं काही कारण नाही, पण आपलं आडवं जाणं त्या मांजरांच्या मुळावरच यायला लागलंय हे काही माणसांच्या जगातल्या काहींना उमगलंय. खरं तर एखाद्या ग्रीक किंवा रोमन योद्ध्यासारखं सर्वांगावर खवल्यांचं चिलखत घालणाऱ्या आणि माणसाला अजूनही अनेक बाबतीत कोड्यात टाकणाऱ्या या निशाचर प्राण्याला मांजर तरी कोणी आणि का ठरवलं हे देखील कोडंच, कारण माणसाच्या अवतीभवती वावरणारी मांजरं आणि माणसाच्या वाटेपासून फटकूनच राहणारे खवले मांजर यांची शास्त्रीय कूळंही वेगवेगळी, कोणतंच साटंलोटं न संभवणारी.

ज्युरासिक पार्कातल्या एखाद्या अवाढव्य डायनासोरला खवले लावून त्याचं मिनिएचर बनवलं तर तो डायनासोर जसा दिसेल किंवा पाइनच्या झाडाचा खवल्याखवल्यांचा जरा लांबट शंकू जर चालायला लागला तर जसा दिसेल तसा दिसणारा हा प्राणी आपल्यापैकी अनेकांनी फक्त चित्रातच पाहिला असणार. पण आता ज्या गतीने खवले मांजरं किंवा पॅंगोलीन जगभरातल्या तस्करीला बळी पडत आहेत ते पाहता हा प्राणी अस्तित्वात होता हे तुम्हालाआम्हाला नीट समजेपर्यंत या प्राण्याचं अस्तित्व कदाचित संपूनही गेलं असेल. नष्टप्राय होणाऱ्या या प्राण्यासाठी जगभरात शास्त्रज्ञांचे, तज्ज्ञांचे अनेक गट काम करत आहेत. या प्रयत्नांना आता महाराष्ट्राचं वनखातंही जोडलं गेलं आहे. खवले मांजरांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी वनखात्याने अलीकडेच एक समिती नेमली आहे.

दिवस एखाद्या बिळात काढायचा आणि रात्री अन्नाच्या म्हणजे वाळवी, मुंग्या, डोंगळ्यांच्या शोधात भटकंती करायची इतकंच आयुष्य असणाऱ्या या प्राण्याभोवती विणलेल्या तस्करीच्या जाळ्याविषयीचे उपलब्ध तपशील धुंडाळल्यावर त्याची भीषणता जाणवते. एरवी हा प्राणी आपल्यापैकी अनेकांच्या खिजगणतीतही नाही. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या एका अहवालानुसार २००९ ते २०१७ या नऊ वर्षात फक्त भारतात सहा हजार खवले मांजरं चोरट्या शिकारीला बळी ठरली. हा माहिती असलेला आकडा आहे, प्रत्यक्षात हा आकडा आणखी मोठाही असू शकतो. अन्य काही अभ्यासगटांच्या म्हणण्याप्रमाणे जगात हा आकडा वर्षाला काही हजारांत असू शकतो.

हिमालय पर्वतराजीचे काही भाग आणि वायव्य सीमेलगतचा अत्यंत उष्ण प्रदेश वगळता मॅनिस प्रजातीतला हा प्राणी भारतात सगळीकडे आढळतो. याचा अर्थ बहुतेक सर्व प्रकारच्या अधिवासांमध्ये तग धरण्याची फार कमी प्रजातींमध्ये आढळणारी क्षमता या प्राण्याकडे आहे. पृथ्वीच्या पाठीवरच्या आठ पैकी खवले मांजरांच्या दोन जाती भारतात आढळतात. भारतीय खवले मांजर, शास्त्रीय भाषेत Manis crassicaudata आणि चिनी खवले मांजर Manis pentadactyla. आपल्या देशात जवळजवळ सगळीकडे वावरणाऱ्या या प्राण्यांची आजमितीला नेमकी संख्या किती आहे याचा अंदाज सांगता येत नाही कारण या दृष्टीने या प्राण्याचा सूत्रबद्ध अभ्यास अजूनही झालेला नाही. 

काही महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या उगमाशी जोडला गेलेला एक संशयित म्हणून जगासमोर आलेल्या खवल्या मांजरांची शिकार होते ती त्यांच्या अंगावरच्या खवल्यांसाठी आणि मांसासाठी. आफ्रिकी आणि पूर्व आशियायी देशांमधल्या पारंपरिक औषधांमध्ये या खवल्यांचा वापर होतो. साहजिकच या सगळ्या चोरट्या व्यापारात गुंतलेला पैसाही तितकाच अवाढव्य असल्याचे, संवर्धन -संरक्षण संस्थांचे अहवाल सांगतात.

मांजर नसलेले खवले मांजर का वाचवायचे? कारण खवले मांजरांमुळे वाळवीसारख्या अनेक उपद्रवी किडींवर नियंत्रण राहतं. दर दिवशी काही लाख मुंग्या, वाळवी आणि त्यांची अंडी खाणाऱ्या एका खवले मांजरामुळे कीड नियंत्रणावरचा डोंगराएवढा खर्च वाचू शकतो. आययूसीएनने याची आकडेवारीच मांडली आहे. चिमण्यांपासून ते विशिष्ट जातीच्या बेडकांपर्यंत माणसाने आतापर्यंत जेव्हा जेव्हा कीडींवरच्या नैसर्गिक नियंत्रणांना धक्का लावला आहे, तेव्हा तेव्हा माणसाला त्याची जबर किंमत मोजावी लागली आहे, असं या आधीच्या घटनाही सांगतात.

आययूसीएनच्या रेड डाटा बुकमध्ये समावेश असलेल्या खवले मांजरांना १९७२च्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानेही संरक्षण दिलेले आहे. काही वर्षांपूर्वी कोकणाच्या काही भागात खवल्या मांजरांच्या चोरट्या शिकारीची प्रकरणं उघडकीस आल्यानंतर निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या काही संस्थांनी लोकांना बरोबर घेऊन खवल्या मांजरांच्या संरक्षणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना जोड म्हणून अभ्यासासह आणखी कितीतरी गोष्टी व्हायला हव्या आहेत. वनखात्याच्या समितीच्या निमित्ताने खवल्या मांजरांच्या संवर्धन, संरक्षणाविषयी काही ठोस विचार होऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे, एवढे आत्ता नक्की म्हणता येईल.

संबंधित बातम्या