निद्रादेवी नमोस्तुभ्यं!

-
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

संपादकीय

शंभर वर्ष झोपलेल्या त्या राजकन्येची गोष्ट आठवतेय? कृष्णपरीच्या शापामुळे राजकन्या, तिचे दासदासी, राजवाड्यातले शिपाई इतकंच काय पण अगदी सगळे नगरजनही गाढ झोपून गेले होते. पण कृष्णपरीच्या शापाला धवल परीचा उःशापही होता. कोण्या देशाचा राजपुत्र येईल, राजकन्येचे चुंबन घेईल आणि राजकन्या तिच्या त्या मायावी निद्रेतून जागी होईल. मग एक दिवस पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून तो राजपुत्र दौडत आला, जंगलाच्या गचपणात हरवून गेलेला वाडा बघून कुतूहलाने तो आत शिरला.... वगैरे. ही गोष्ट पहिल्यांदा वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या दहातल्या सात-आठ जणांना खरंतर त्या राजकन्येचा सुप्त का होईना पण हेवाच वाटत असतो. कृष्णपरीच्या शापामुळे असेना का पण शं....भ....र.... वर्षं राजकन्येची झोपमोड कोणी करणार नसतं, आणि त्या नंतर येणार असतो एक राजपुत्र.

'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' या समर्थांच्या प्रश्नावर कॉन्फिडन्टली हात वर करणारी फार लोकं सापडत नाहीत, पण जे काही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके महाभाग उत्तरादाखल हात वर करतील त्यात एक जमात नक्की असते - अंथरुणाला पाठ टेकल्याटेकल्या ज्यांना झोप लागते ते सगळे! मऊ बिछाने आणि कंदील, शामदाने नसताना, पडल्या पडल्या शांत झोप लागणं हे सुखी माणसाचं एक लक्षण आहे हे समजणं आणि प्रत्यक्षात तशी परिस्थिती असणं यात अंतर आहे. किती अंतर आहे विचाराल तर, शांतरसाचा फेसाळता प्याला आणि ओठांमध्ये असतं तेवढंच. हे अंतर नेमकं किती असतं ते आराधना करकरूनही निद्रादेवी ज्यांच्यावर प्रसन्न होत नाही तेच सांगू शकतील.

‘सुखाची झोपही नशिबात असावी लागते’ असं म्हणत असले तरी माणसाला झोप लागते तरी किती? 'नॅशनल स्लीप फाउंडेशन'ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार जसजसे वय वाढत जाते तशी तशी झोपेची गरज कमी कमी होत जाते.  फाउंडेशनच्या तज्ज्ञांच्या मते पासष्ट वर्षे वयावरील मंडळींना दिवसाकाठी सात ते आठ तासांची झोप पुरेशी असते तर सहा ते तेरा या वयोगटातल्या मुलांना मात्र रोज नऊ ते अकरा तासांची झोप आवश्यक असते. तीन महिन्यांच्या बाळापासून ते पासष्ट प्लस अशा नऊ वेगवेगळ्या वयोगटांसाठी रोज किती तास झोप आवश्यक आहे, याचं एक कोष्टकच 'स्लीप फाउंडेशन'ने दिले आहे. अर्थात हे कोणी किती झोपावं याचं अगदी सर्वसाधारण गणित आहे, कारण झोपेची गरज ही इतकी वैयक्तिक बाब आहे की ती माणसागणिक, प्रसंगागणिक बदलत जातेच, पण माणसांच्या सवयींप्रमाणेही बदलत जाते. पुन्हा झोप घेण्याचेही प्रकार असतात. काहींची झोप सावध असते, काही लोक इतके गाढ झोपतात की ते निद्रावस्थेत असताना एखादा उत्पात घडून गेला तरी यांना पत्ता नसतो. एखाद्या वेळी कानाशी गुणगुणणारा एखादा डासही गाढ झोपलेल्या एखाद्याची झोप उडवतो. काही सुखी माणसांना आडवं झाल्या क्षणी झोप घेरून टाकते, काहीजण तासनतास झोपेची आराधना करण्यात घालवतात. नेहमीची उशी बदलली तरी काहींची झोप उडते आणि काहीजण कुठेही आडवे झाले की झक्क झोपून जातात.

शांत झोपेचा आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे, या विषयी मात्र तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. तुम्ही कसे आणि किती झोपता याचा थेट संबंध तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीशी असतो, असे तज्ज्ञ सांगतात. अंथरूणाला पाठ टेकल्याटेकल्या झोप लागणे हे म्हणूनच मनःशांतीचं आणि पर्यायाने सुखी असण्याचं लक्षण. 

झोप उडवणाऱ्या असंख्य गोष्टींच्या गराड्यातही मनाच्या शांतीसह टिकून राहण्यासाठी आपले प्रयत्न आपल्यालाच करायचे आहेत, तेही पुरते जागेपणी. मग रोज एक शुभ्र दिवस उजाडेल, रोज एक प्रसन्न सकाळ पुढ्यात येईल, नव्या स्वप्नांना बळ देईल!!

संबंधित बातम्या