'उद्या'ला सावरण्यासाठी

-
सोमवार, 1 मार्च 2021

संपादकीय

माणसाच्या विजिगिषूवृत्तीची परीक्षा पाहणाऱ्या कोरोनाच्या विषाणूने जगातल्या अनेकांसमोर अनेकानेक प्रश्न उभे केले आहेत. जगण्याच्या लढाईत गुंतलेल्या असंख्य जिवांना कोरोनाने मोठ्या संकटात ढकलले असताना या संकटाचे विविधांगी परिणामांचे नवे नवे अर्थ दरदिवशी पुढे येत आहेत. रुतून पडलेल्या अर्थचक्राला ज्या तरुण पिढीच्या हातांच्या भरवशावर गती द्यायची त्या तरुणांच्या संदर्भात अलीकडेच झालेले दोन अभ्यास या संदर्भात पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची वेळ आल्याचे सांगत आहेत. अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठाने केलेला ‘नॅशनल हेल्दी माईंड््स’ हा त्यातला एक अभ्यास आणि दुसरा आहे मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा ‘द  पोस्ट पॅन्डेमिक इकॉनॉमीः द फ्युचर ऑफ वर्क आफ्टर कोविड १९’ हा अहवाल. या दोन्ही अभ्यासांनी उपस्थित केलेले प्रश्न अगदीच नव्याने पुढे आले आहेत असेही नाही, पण या प्रश्नांवर मात करण्यासाठी प्रत्येक स्तरावर एकत्रितपणे उत्तर शोधण्याची आवश्यकता मात्र त्यांनी पुन्हा अधोरेखित केली आहे.

कोरोनामुळे जगाचे रहाटगाडगे ठप्प व्हायला सुरुवात झाली त्याला आता वर्ष होईल. पुढचे जवळपास दहाएक महिने मग अर्थचक्र रुतूनच पडले होते. या अर्थचक्राला काहीशी गती येत असताना महाराष्ट्रासह जगाच्या अनेक भागात कोरोना विषाणूने पुन्हा अनिश्चिततेचे आणखी एक आव्हान समोर आणले आहे. ही अनिश्चितता, विविध पातळ्यांवरची अस्थिरता तरुण मनांवर कळत-नकळत खोलवर परिणाम करते आहे, असं बोस्टन विद्यापीठाचा अभ्यास सुचवतो. अमेरिकेतल्या तेहेतीस हजार महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या अभ्यासाचे हे निष्कर्ष आहेत. सर्वेक्षणातील एकूण विद्यार्थ्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य किंवा चिंतेच्या विकाराची लक्षणे आढळली. या संशोधनाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न ध्यानात घेणाऱ्या यंत्रणेची गरज पुढे आणली आहे, असे बोस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाच्या सह-संशोधक साराह लिप्सन यांनी म्हटले आहे. चिंता, नैराश्य जाणवणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये एकटं पडल्याची भावना आहे, आणि या साऱ्याचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो आहे याचीही त्यांना चिंता आहे, असं या संशोधनाचे निष्कर्ष सांगतात.

जगातल्या पहिल्या आठ अर्थव्यवस्थांमधल्या -यात भारताबरोबर अमेरिका, ब्रिटन, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांचा समावेश आहे- किमान शंभर दशलक्ष लोकांना पुढच्या दहा वर्षांत आपल्या सध्याच्या नोकऱ्या-व्यवसाय बदलणे भाग पडेल असे ‘द फ्युचर ऑफ वर्क आफ्टर कोविड १९’ हा मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा अभ्यास कोरोनोत्तर जगात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या आणि उद्योगसंधींविषयी भाष्य करताना म्हणतो. या पुढच्या काळात कमी वेतनमानाच्या नोकऱ्यांचे प्रमाण घटत जाईल आणि त्यामुळे नोकऱ्या करणाऱ्या आणि नोकऱ्या शोधणाऱ्या अशा दोन्ही घटकांना नव्या जगाच्या गरजेनुसार स्वतःला बदलत न्यावे लागेल.

गेले काही महिने संपूर्ण जगातले भविष्यवेधी तज्ज्ञ या निष्कर्षाबद्दल बोलत आहेत. रोजगारासाठी, नोकऱ्या मिळवण्यासाठी, व्यवसायांमध्ये शिरण्यासाठी लागणारी कौशल्ये जर दहा वर्षांनी उपयोगी पडणार नसतील तर हातात वेळ अगदीच  थोडा आहे. औपचारिक, अनौपचारिक, संघटित अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये नव्या कौशल्यांची गरज भासणार आहे, असं हा अहवाल सांगतो.

अमेरिकेतल्या तेहेतीस हजार महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांची सध्याची मानसिकता प्रातिनिधीक आहे असे मानले तर समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या बरोबरच शिक्षणापासून ते उद्योगापर्यंतच्या सर्व क्षेत्रातल्या धुरीणांसमोर ते एक आव्हान असेल. जिवंत माणसाला कणाकणाने जाळणाऱ्या चिंतेच्या, नैराश्याच्या गर्तेतून तरुण मनाला बाहेर काढून, त्याची एकटेपणाची जाणीव दूर करण्यासाठी एकवटून प्रयत्न करण्याची जबाबदारी जशी आहे, तशीच ती शारीरिक व्याधींपासून ते सामाजिक अपंगत्वापर्यंत अनेक कारणांनी या खडतर प्रवासात मागे पडण्याची शक्यता असणाऱ्या समाज घटकांना वेळीच हात देण्याचीही आहे. 

बदलांशी जुळवून घेत जगण्याच्या वृत्तीमुळेच माणूस टिकला, असे माणसाचा आजवरचा प्रवास सांगतो. कोरोनावर मात करून आपण आपल्या भविष्याला पुन्हा आकार देऊ हे निश्चित, मात्र ते करत असताना उद्याचे शिलेदार असणाऱ्या आजच्या तरुण मनांना आकार देण्यासाठी आपल्याला त्यांच्यात सजगपणे गुंतवणूक करत राहावे लागणार आहे, असाच या अभ्यासांचा अन्वयार्थ आहे.

संबंधित बातम्या