गृहिणीत्व

-
सोमवार, 8 मार्च 2021

संपादकीय

''मला एक उत्तम गृहिणीही व्हायचंय,'' असं कोणी म्हणालं तर? प्रतिक्रिया कशा येतील, त्याचा अगदीच अंदाज बांधता येणार नाही असं नाही. काय हा खुळचटपणा? जग कुठे चाललंय? हे कुठे चाललेत? असंच काहीसं त्या प्रतिक्रियांचं स्वरूप असणार हे सांगायला काही कोणा मोठ्या भविष्यवेत्त्याची गरज नसावी. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटाला नॉव्हेल कोरोना विषाणूनी आख्खं जग कोंडून घातलं आणि एरवी घराचे मालक असल्याची भावना घेऊन फिरणाऱ्या, पण घर नेमकं कसं चालतं याची फारशी कल्पना नसणाऱ्या अनेकांना घर नावाच्या व्यवस्थेतले एरवी न जाणवणारे अनेक कंगोरे जाणवून गेले. घराचं व्यवस्थापन नावाची एक नवी ज्ञानशाखाच अनेकांसाठी कळत, नकळत सामोरी आली. इथे मुद्दा केवळ लॉकडाउनच्या काळात वेळ जात नाही म्हणून स्वयंपाकघरात लुडबूड करून, कुठल्याकुठल्या समाज-माध्यमांच्या भिंतींवर सेल्फ्या डकवून, आता दारं बऱ्यापैकी उघडल्यावर ती वाट विसरून जाणाऱ्यांचा नाहीये. आपण घरात नसताना हे सगळं कोण करत असतं, हा प्रश्नच न कधी पडल्याने, ''ती कुठे काय करते, घरातच तर असते'', अशी धारणा (अजूनही) बाळगणाऱ्यांचा आहे.

कधीतरी ऐकलेला किस्सा आहे. म्हटलं तर फार जुनाही नाहीये. कसा कोण जाणे हाताशी वेळ होता म्हणून किश्श्याच्या नायकाच्या ऑफिसातल्या शिळोप्याच्या गप्पांमध्ये विषय सुरू होता करिअरचा. सगळेच तसे सुस्थित, करिअरच्या अगदी सुरुवातीच्या पायऱ्यांवर नसले तरी करिअरच्या शिडीवरून फार वरही न गेलेले, 'सेटल होण्याच्या' संकल्पनेच्या अलीकडे -पलिकडे असणारे. गप्पांना सुरुवात झाली होती ती कोणाकोणाला काय 'व्हायचं' होतं, काय कमवायचं होतं आणि त्या महत्त्वाकांक्षांचं काय झालं इथपासून. ठराविक वळणं घेत घेत गप्पा,' '...आणि अजूनही वेळ गेलेली नाही आपली स्वप्न पुरी करण्याची...’ च्या तशा ठराविकच वळणावर आल्या तशी इतका वेळ सगळ्यांच सगळं शांतपणे ऐकणारी त्यांची एकुलती एक सहकारी मुलगी अचानक उठली आणि म्हणाली, ‘तुम्हाला सगळ्यांना अजून हे सगळं करावसं वाटतंय ना, त्यात आणखी एक करा, एक चांगली गृहिणी होण्याचाही प्रयत्न करा.’ 

मुद्दा विचार करण्यासारखा आहे. 

समानतेची गाणी कितीही गायली तरीही पुरुषाच्याच अवतीभोवतीच विणल्या गेलेल्या आपल्या व्यवस्थेच्या समोरचे प्रश्न अजूनही त्याच जुन्या चाकोरीत फिरताहेत, हे समाज म्हणून आपल्याला जाणवतं की नाही असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आजूबाजूला अजूनही आहे. 'अर्धे जग', असा कायम उल्लेख होणाऱ्या स्त्रियांच्या जगाची काय नेमकी जाणीव उरलेल्या अर्ध्या जगाला आहे, हा प्रश्नच आहे.  

'घरधनी' या शब्दाला असलेली किंमत आणि मानमरातब 'घरधनिण' या शब्दाला अजूनही नाही. घराबाहेरच्या जगात पुरुषी कर्तृत्वाला आव्हान देणाऱ्या प्रतिभेला घराच्या चार भिंतींच्या आत अजूनही कानकोंडंच होतं, हे वास्तव नाकारण्यात काही हशील नाही. या स्थितीला अपवाद नक्कीच आहेत, पण 'अपवादांनी नियम सिद्ध होतो' हा नियम इतक्या दारूणपणे आणखी कोणत्या नियमाच्या बाबतीत पुढे येत असेल असे न वाटण्यासारखी परिस्थिती आहे. अन्यथा घरकोंडीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या इथपासून वर्क फ्रॉम होम या नव्या संकल्पनेबरोबर जुळवून घेताना घरातलं काम आणि घरातून करायचं ऑफिसचं काम याची सांगड घालता घालता घरधनिणींची दमछाक झाली इथपर्यंतचा प्रवास काय दाखवतो?

'अर्ध्या जगा'बद्दल आदराची भावना जोपासण्यासाठी गृहिणी असण्याचा मुद्दा समजावून घ्यायला हवा. ही एक जबाबदारी अशी असते जी भवताल बांधून घालते. गृहिणीत्वामुळे कुटुंब नावाच्या संकल्पनेला एक मध्यबिंदू मिळतो. 'गृहिणी होणं' याचा अर्थ

हा सोशिक मध्यबिंदू होणं, स्वतःच्या आतलं आपलं 'मी'पण थोडं बाजूला सारणं, स्वतःच्या पलीकडे विचार करणं. घर नावाचं एक आख्खं आभाळ पेलणारं गृहिणीपण निभावणं ही सुळावरची पोळीच, कारण घरातली बाई जे काही करते ते तिचं विहित कर्तव्यच असतं असाच तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांचाच समज असतो, त्यामुळे गृहिणीपणात 'मी एवढं केलं' असं म्हणत मिरवायला वाव नसतो. कविवर्य विंदा करंदीकरांचे शब्द उसने घ्यायचे तर 'संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणाऱ्या' ह्या 'किमये'चा अंश पेलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे गृहिणी होणं.

(उरलेल्या) 'अर्ध्या जगात'ल्या कितीजणांना हा रस्ता सापडेल माहीत नाही, पण आपल्या आत असणाऱ्या आपल्या एका कोपऱ्याला गृहिणी बनवण्याची महत्त्वाकांक्षाही असायला हरकत नाही.

संबंधित बातम्या