न्यू नॉर्मल

-
गुरुवार, 25 मार्च 2021

संपादकीय
 

वर्षभरानंतर जगाचं चाक पुन्हा पहिल्याच ठिकाणी येतंय असं वाटण्यासारखी परिस्थिती आजूबाजूला होती अगदी कालपरवा पर्यंत. ''बॅक टू स्क्वेअर वन्...'' म्हणतात ना तशी. गेल्या वर्षी या दिवशी आपण काय करत होतो, आपले काय काय बेत होते -आपल्या स्वतःसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी हे अगदी लख्ख आठवत असणार कारण त्यानंतरच्या इतक्या दिवसांत आवर्जून लक्षात राहण्या, ठेवण्यासारखे बेत झालेलेच नाहीयेत. पण काही घडतंच नव्हतं, असं तरी कसं म्हणता येईल... कारण काहीच घडत नाही ही पण एक घटना असतेच ना? आणि नाही कसं? खूप काही घडून गेलंय, प्रत्येकाच्याच आयुष्यात. असंख्य अवतारांमधल्या अनिश्चिततांचा लंबक हेलकावत असताना काही बरे क्षणही आलेच की वाट्याला....

''मिशन बिगिन अगेन'' कोणत्या टप्प्यात आहे कोण जाणे, पण आयुष्याची पुन्हा आखणी करावी असे बेत असतानाच कोरोना, तो आजूबाजूलाच असल्याची जाणीव पुन्हा पुन्हा करून देतो आहे. ही संसर्गाची दुसरी लाट आहे की नुसतीच रुग्णसंख्या वाढ आहे यावर चर्चा सुरू राहतील, पण एक मात्र खरं -'न्यू नॉर्मल' नावाचं एक अमूर्त कोडं रोज एक नवीन रूप घेऊन समोर येतं आहे.

सगळा भवताल ठप्प झाला त्याला आणखी चार दिवसांनी वर्ष होईल. हे वर्ष खूप शिकवून गेलं यात शंकाच नाही. आपला भवताल थांबला त्याच्या आधीच निम्मं जग थांबलं होतं. 'लॉकडाउन' या शब्दाने अनेकांच्या आयुष्याचा ताबा घेतला होता आणि माणसाच्या निसर्गदत्त विजिगीषूवृत्तीने त्याच सुमारास 'न्यू नॉर्मल'बद्दलही बोलायला सुरुवात केली होती. येणारा कोणताच ''आज'' हा कालच्यासारखा नसतोच, पण त्याला कालचा काही संदर्भ असतो. आता उद्या उगवणाऱ्या 'आज'ला असणारे हे भूतकाळाचे संदर्भच बदलणार होते.

पण जग त्यातूनही शिकत गेलं. हा तर माणसाचा इतिहासच आहे. रोगराया, महायुद्धे, प्रचंड संहार या सगळ्यातून दरवेळी एक ''न्यू नॉर्मल'' नव्याने उभं राहत होतंच की. त्या शिकण्यात कोरोनाने आणखी भर घातलीय.

जगण्याच्या खूप पैलूंविषयी चर्चा घडताहेत, नवे संदर्भ, नव्या पद्धती उभ्या राहताहेत. नवे प्रश्नही आहेत आणि त्याला नवी उत्तरेही आहेत. गावं, शहरं बदलली आहेत. या लॉकडाउननी माणसाच्या वस्त्यांना एक धडा जरूर शिकवलाय जगण्याची साधनं आपल्या जवळपासच ठेवण्याचा. त्यातून शहरी जग आता ''फिप्टीन मिनीट सिटी'' सारख्या कल्पनेविषयी बोलायला लागले आहे. आपल्याला लागणाऱ्या सर्व सुविधा अगदी चालण्याच्या अंतरात असाव्यात. ग्रीन जॉब्ज्, रेझिलियंट मास ट्रांझिट, ग्रीन स्पेसेस ह्या कल्पना परवलीच्या बनताहेत. आव्हानं आहेतच. सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा मुद्दा आहे. कोरोनानी आपल्या सगळ्यांना अनिश्चिततेच्या एका भोवऱ्यात ढकललं आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी, दिलासादायक वातावरण निर्माण करण्यासाठी पुन्हापुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.

 
माणसाला ''सोशल अॅनिमल'' म्हटलं जातं. कोरोनानी आपल्याला कोंडून घातल्यानंतरच्या काळातील सामाजिक संबंधांविषयी जगभरात खूप काही लिहिलं, बोललं जातं आहे. गर्दीत असण्याची आपली इच्छा किती अनावर असू शकते ते गेल्या काही दिवसांत बंधनं जरा सैलावल्यावर आपण अनुभवलंच आहे. 'द इकॉनॉमिस्ट'च्या अलीकडच्या एका अंकात 'व्हॉट इफ वी हॅव फरगॉटन टू सोशलाइझ?' अशा शीर्षकाचा एक लेख वाचण्यात आला. मानवी संपर्कात घडलेल्या बदलांचा वेध घेणारा. अनेकांची रोज कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कोरोनानी संपवली, मिटिंगाच काय, पण मोठमोठ्या सभा, संमेलने, परिषदा अगदी फॅमिली गेटटुगेदर्सही व्हर्च्युअली व्हायला लागली. दुसऱ्या बाजूला शेजारचा माणूस नाकात काहीतरी हुळहुळलं म्हणून जरी शिंकला तरी असुरक्षित वाटायला लागला. तिसऱ्या बाजूला या घरकोंडीमुळे, हालचालींवरच्या निर्बंधांमुळे माणसाचं अनुभवविश्वच आक्रसेल की काय अशीही भीती व्यक्त होते आहे. 

पण याही सगळ्या परिस्थितीत आशेचे किरणही आहेतच. ज्या गतीने विज्ञानाने, तंत्रज्ञानाने परिस्थितीवर मात करण्यासाठी कंबर कसली ती विलक्षण अचंबित करणारी आहे आणि या वेगातच परिस्थिती बदलू शकते असा दिलासाही आहे.

संबंधित बातम्या