हा खेळ बाहुल्यांचा

-
सोमवार, 29 मार्च 2021

संपादकीय

‘‘अरे ओ बाबू मोशाय, हम तो रंगमंच की कठपुतलियां है। जिनकी डोर ऊपरवाले की उंगलीयो में बंधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नही बता सकता है।’’

सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या लेखक-दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ या चित्रपटातील हा एक अत्यंत लोकप्रिय संवाद. लोकांच्या आयुष्यात आनंद पेरताना आयुष्यातल्या अपरिहार्यतेवरही भाष्य करणारा. पहाणाऱ्यांच्या आयुष्यात असाच आनंद पेरताना, जगण्याच्या खेळाची अपरिहार्यता अधोरेखित करणाऱ्या कठपुतळ्यांचा जागतिक दिवस, वर्ल्ड पपेट्री डे, नुकताच साजरा झाला. कठपुतळ्यांच्या खेळाला आयुष्य वाहिलेल्या पपेटीअरनी जगभरात त्या निमित्ताने पपेट शो केले. कॅनडा, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, नेदरलँड्स, स्पेन, रुमानियात पपेटीअर एकत्र जमले, त्यांनी कठपुतळ्यांच्या भविष्याबद्दल, त्यातल्या नवीन ट्रेंडबद्दल प्रयोगांबद्दल चर्चा केल्या. कोविडच्या साथीमुळे हे कार्यक्रम यंदा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर झाले. आपल्याकडेही काही कार्यक्रम आयोजित केले होते. यंदाच्या १७व्या पपेट्री डेला महाराष्ट्राच्या दृष्टीने एक चंदेरी किनार होती. अनेक शतकांपासून कोकणातल्या लाल मातीत रुजलेल्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचे, चित्रकथी कला परंपरेचे एखादे व्रत घेतल्याप्रमाणे जतन करणारे ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना देण्यात आलेल्या पद्मश्री किताबाची. कुडाळजवळच्या पिंगुळीतल्या  गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीने महाराष्ट्रातल्या बाहुली नाट्याची परंपरा जपली आहे.

जगभरात लोकप्रिय असलेल्या या कलेचा उगम भारतातला आहे आणि भारतीय नाट्याचे मूळ कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात असल्याचे प्रतिपादन जर्मन इंडॉलॉजिस्ट डॉ. रिचर्ड पिशेल यांनी त्यांच्या ‘द होम ऑफ पपेट प्ले’ या छोटेखानी पुस्तकात केल्याचे संदर्भ विश्वकोशात आणि महाराष्ट्रीय ज्ञानकोशात मिळतात. कळसूत्री बाहुल्यांचे संदर्भ मोहें-जो-दडो, हडप्पापर्यंत मागे जातात, असाही उल्लेख विश्वकोशात वाचायला मिळतो.

बघणाऱ्याला बांधून ठेवणाऱ्या कठपुतळ्या हा खरंतर अनेक कलांचा समुच्चय आहे. लाकडाची, कातड्याची, रंगीत कागदाची, कापडाची, कागदाच्या लगद्याची बाहुली बनवण्यापासून सुरू होऊन हा कला समुच्चय बाहुल्या सजवण्यापासून ते त्या नाचवून कथा सादर करणाऱ्या व्हेन्ट्रोलोकिस्ट -शब्दभ्रमकारापर्यंत पोचतो. या वरवर छोट्या दिसणाऱ्या प्रवासाला रंगसंगतीचे भान असण्यापासून ते कलाकुसर, मांडणी आणि सादरीकरणाचे भान असण्यापर्यंत कितीतरी पैलू आहेत. बाहुल्यांच्या खेळाला मर्यादा असते ती सूत्रधाराच्या कल्पनाशक्तीचीच, असे म्हटले जाते. ह्या विधानाचा अर्थ प्रत्यक्ष डोळ्यांसमोर नाचणाऱ्या, डोलणाऱ्या, बोलणाऱ्या बाहुल्या पाहिल्याशिवाय नाही समजत.
पुराणातल्या, रामायण-महाभारतादी महाकाव्यांमधल्या कथा सादर करणाऱ्या या बाहुल्यांचा काही कल्पक सूत्रधारांनी लोकशिक्षणासाठीही उपयोग केला आहे. के.एस. गोडे, रामदास पाध्ये यांच्यासारख्या शब्दभ्रमकारांची जादू, पाध्ये यांनी पुनरुज्जीवित केलेल्या नाट्याचार्य विष्णुदास भाव्यांच्या कठपुतळ्या, बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रश्नावर भाष्य करणारे ‘वाटेवरती काचा गं’ सारखे बाहुलीनाट्य, पर्यावरण, मूल्यांची जाणीव, हुंड्यासारख्या कुप्रथा, व्यसनमुक्ती, मुलींचं शिक्षण अशा मुद्यांना धरून लोकशिक्षणासाठी होणारे बाहुल्यांचे खेळ, अलीकडच्या काळात टिव्ही शोमध्ये मुलांसाठी अलीकडच्या काळातल्या गोष्टी घेऊन येणारी पपेट असे या प्रवासाचे कितीतरी टप्पे आहेत.

पपेट्रीच्या संवर्धनासाठी ‘धातू पपेटस्’ ही संस्था स्थापन करणाऱ्या अनुपमा होसकेरे कठपुतळ्यांच्या या कलेला ‘सिरियस बिझिनेस’ म्हणतात. एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या या कलेच्या शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठासह देशातल्या काही विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत. अलीकडच्या काळात कॉर्पोरेट ट्रेनिंगपासून अनेक ठिकाणी पपेटसचा वापर होतो आहे. भविष्यात कदाचित यातून अर्थार्जनाचेही मार्ग निर्माण होतील. पण गरज आहे ती या कलेला नव्या पिढीचा सक्रिय आश्रय मिळण्याची.

खरंतर डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं तर आपल्या अवतीभवती 'पपेटस्'ची रेलचेल दिसेल -यातल्या काहींनी स्वखुशीने आपल्या दोऱ्या कुणाच्यातरी हातात दिलेल्या असतात आणि काहींनी नाईलाजापोटी. अत्यंत चलाख शब्दभ्रमकारांच्या इशाऱ्यांवर जग नावाच्या रंगभूमीवर या 'पपेटस्'चा खेळ अव्याहत सुरू असतो.

मुद्दा फक्त कळसूत्री बाहुल्या जोपासण्याचा नाहीये, तर त्या बाहुल्यांच्या अस्तित्वाला अर्थ देणाऱ्या कलांच्या जोपासनेचा आहे.

संबंधित बातम्या