आहे आपली तयारी?

-
सोमवार, 5 एप्रिल 2021

संपादकीय

कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट एका बाजूला पुन्हा अधिक गहिरे होत असताना, आपल्या उंबऱ्याशी येऊन ठेपलेल्या आणखी एका संकटाविषयीच्या बातम्या गेल्या काही दिवसांत लक्ष वेधून घेत आहेत.

हवामान बदलांविषयी आजवर खूप काही लिहिलं, बोललं गेलं आहे. हवामान तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक गेल्या काही दशकांपासून सातत्याने हवामानात होत जाणाऱ्या बदलांविषयी बोलत आहेत. मात्र हवामान बदल हा विषय म्हणजे कुठेतरी लांबवर घडणारी, ओझोन लेअर वगैरे आपण न पाहिलेल्या गोष्टींशी संबंध असणारी काहीतरी अगम्य घटना असणार असा आपल्यापैकी असंख्यजणांचा अजूनही समज आहे, हा भाग दुर्दैवाचा! आपल्या जगण्याशी त्याचा थेट काही संबंध असू शकतो, येऊ शकतो, येत आहे या बद्दलची एकतर अनभिज्ञता जाणवते किंवा ''माझ्या एकट्याच्या करण्याने काय होणार आहे?'' या प्रकारातली अगतिकता जाणवते. 

कधीतरी प्रचंड गारपीट झाल्यावर, अवकाळी पावसाने, ''निसर्ग''सारख्या वादळाने शेतीभातीचे, घरादारांचे प्रचंड नुकसान झाल्यावर, जीवितहानी झाल्यावर हवामान बदलांविषयी चर्चा झडतात; हा विषय समजणारे काही जण पोटतिडकीने लिहितात, बोलतात, दुसरीकडे जगरहाटी सुरू राहाते आणि आणखी एखादी आपत्ती पुन्हा नव्याने येऊन धडकेपर्यंत विषय मागे पडतो. नाही म्हणायला कधीतरी ‘उकाडा वाढलाय’, ‘थंडी यंदा अजिबातच नव्हती’, ‘या दिवसात एवढा पाऊस?’, ‘हवा आता पूर्वीसारखी राहिली नाही’, अशा उद््गारांमधून बदलांची नोंद घेतलीही जाते, पण त्यामागे हे संकट आपल्या उंबऱ्यात आल्याची जाणीव असतेच असं मात्र नाही.

या पार्श्वभूमीवर आता चांगलाच जाणवू लागलेल्या उन्हाळ्याच्या संदर्भाने गेल्या काही महिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेले काही अहवाल आणि शोधनिबंध महत्त्वाचे आहेत. यंदाच्या मार्च ते मे महिन्यांच्या कालावधीत देशात बहुतेक ठिकाणी लोकांना प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागेल; उत्तर भारतात आणि देशाच्या ईशान्य, पूर्व व पश्चिम भागांत दिवसाचे तापमान नेहमीपेक्षा अधिक राहील अशा शक्यता हवामान विभागाने २००३ ते २०१८ या पंधरा वर्षांतल्या निरीक्षणांच्या आधारे व्यक्त केल्या आहेत. ओडिशा, छत्तीसगड राज्यांच्या काही भागांबरोबरच कोकणात यंदाचा उन्हाळा गेल्या दशकापेक्षा अधिक कडक असेल हा या अंदाजातला थेट आपल्याशी संबंध असणारा भाग. याचा प्रत्यय सध्या येतोच आहे. पुढच्या दहा वर्षात राज्यातल्या तापमानात एक ते दीड अंश सेल्सिअस इतकी वाढ नोंदवली जाईल, असा अंदाज 'द एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट'ने राज्याच्या पर्यावरण विभागासाठी केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. असेच निष्कर्ष आणखीही काही संशोधकांनी मांडले आहेत. येत्या काही वर्षांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतील तापमान विदर्भातील तापमानाशी स्पर्धा करेल, असेही हे अहवाल सुचवतात.

कुठल्यातरी ध्रुवीय प्रदेशात घडणाऱ्या, आपल्यापासून लांब असणाऱ्या घटनांचे साखळी पद्धतीने एकंदरच ऋतूमानावर होणारे परिणाम आता थेट आपल्या दारात उभे राहू लागले आहेत, याचेच हे द्योतक आहे.वातावरणावर परिणाम करणाऱ्या अति सूक्ष्म घटनांचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही, असे ध्वनित करणारी 'बटरफ्लाय इफेक्ट' अशी एक कल्पना आहे. ब्राझीलमध्ये कुठेतरी एखाद्या फुलपाखराने पंख फडफडवले तरी काही आठवड्यांनी दूर टेक्सासमध्ये झंझावाती वादळ होऊ शकते, असे हा 'बटरफ्लाय इफेक्ट' म्‍हणतो. याचे गेल्या वर्षी मे महिन्यात आपण अनुभवलेले एक उदाहरण म्हणजे जवळजवळ दोन लाख हेक्टरवरची उभी पिके संपवणारी टोळधाड. या टोळधाडीचा उगम झाला होता २०१८मध्ये अरबी वाळवंटात आलेल्या तीन वादळांमधून...

वातावरण नावाच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या व्यवस्थेत अवाजवी मानवी हस्तक्षेपासह असंख्य छोट्या-मोठ्या कारणांनी घडणाऱ्या बदलांचे परिणाम आता आपल्या भवतालावर होताना दिसताहेत. उष्णतेच्या, पावसाच्या प्रमाणापासून ते जमिनीचा पोत आणि पीक पद्धती, शेती उत्पादने ते थेट आरोग्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांच्या स्वरूपात हे बदल आपल्याशी जोडलेले आहेत, यातले काही भयसूचक आहेत. हे लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणापासून ते वैयक्तिक जीवनशैलीकडे पुन्हा नव्याने पाहण्याची निकड हे सगळे बदल अधोरेखित करत आहेत. या परिस्थितीत विचारण्याजोगा प्रश्न एकच आहे -आहोत का तयार आपण?

संबंधित बातम्या