उत्तर आपल्याच हातात आहे

-
सोमवार, 19 एप्रिल 2021

संपादकीय

जा गतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहोम घेबियस यांनी कोरोना विषाणूशी लढणाऱ्या प्रत्येकाला सावध करणारा इशारा दिला आहे. त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. निर्बंध असावेत की नसावेत, असले तर कसे, किती असावेत यावर चर्चा सुरू असताना आठवड्याच्या सुरुवातीलाच जीनिव्हामध्ये पत्रकारांशी बोलताना डॉ. घेबियस यांनी कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जगभरातल्या आरोग्य यंत्रणा आणि सर्वसामान्य लोक यांना चार शब्द सुनावले आहेत. कोरोनाविरूद्धची लढाई संपलेली नाही, उलट ती दीर्घकाळ चालणार आहे, हे -आता सगळ्यांनी समजावून घेण्याची गरज असलेले सत्य -तर त्यांनी मांडलेच, पण त्याबरोबरच मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता ह्या तीन सवयींना पर्याय नसल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले आहे. जगभरात आतापर्यंत ७८ कोटींहून अधिक लोकांना लस देऊन झाली आहे, तरीही आशिया आणि मध्य पूर्वेसह जगाच्या इतरही भागांमध्ये कोरोना पसरताना दिसतो आहे. कोविड-१९ची साथ हाताळण्यामध्ये अजूनही असणारी गोंधळाची स्थिती आणि दुसऱ्या बाजूला अजूनही न संपलेली बेफिकीरी या दोन मुद्द्यांवर डॉ. घेबियस यांनी नेमके बोट ठेवले आहे. जगभरातल्या आरोग्ययंत्रणांना आणि कोरोनाच्या साथीत सापडलेल्या प्रत्येकाने विचार करावा असे हे मुद्दे आहेत.

कोरोनानी कुरतडून टाकलेल्या २०२०ला निरोप देऊन नव्या वर्षात पाऊल टाकताना, नव्या आशांना धुमारे फुटावेत अशी परिस्थिती होती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांमध्ये सलग सहा आठवडे जगभरातील रुग्णसंख्या कमी होत होती. आज २०२१ची पहिली तिमाही संपून पंधरवडा उलटत असताना भारतासह अनेक देश रुग्णवाढीचा सलग सातवा आठवडा अनुभवत आहेत. गेल्या चार आठवड्यांमध्ये जगाच्या काही भागात मृत्युदरही वाढलेला दिसतो आहे, याकडेही डॉ. घेबियस यांनी लक्ष वेधले. 

माणसानी कोरोनाशी मांडलेल्या लढाईत विषाणूला रोखणाऱ्या लशीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, याबाबत दुमत नाही. लस हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहेच. पण, लस आली आहे आणि आता कोरोनाचा पराभव फक्त घोषित व्हायचा बाकी आहे, अशा आविर्भात वावरणाऱ्यांना डॉ. घेबियस यांनी ‘ही चूक करू नका’ असा सल्ला दिला आहे. त्याच बरोबर घेबियस यांनी कोरोना पसरण्याला आणि त्यामुळे होणाऱ्या जीवितहानीला या यंत्रणांमधला गोंधळ, एकप्रकारची आत्मसंतुष्टी आणि सातत्याच्या अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. 

दोषदिग्दर्शन करतानाच, वेळ लागेल पण कोरोनाला रोखता येईल असा विश्वासही डॉ. घेबियस व्यक्त करतात. मात्र त्यांच्या मते सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक समन्वय असल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही. कोरोनामुळे बिघडलेल्या अर्थचक्राचे परिणाम सोसतानाही पुरेशी काळजी न घेणाऱ्या लोकांविषयीही, विशेषतः तरुण पिढीविषयी, त्यांना चिंता वाटते आहे. आजार होऊन गेल्यानंतरही या विषाणूचे माणसाच्या शरीरावर होणारे दीर्घकालीन परिणाम अजून पुरते उलगडलेले नाहीत, याकडेही ते लक्ष वेधतात. आपल्या आजूबाजूला आज असणाऱ्या परिस्थितीकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं तर विचारक्षमता जागी असणाऱ्या कोणालाही डॉ. घेबियस यांच्या विधानांमधले तथ्य जाणवेल. कोरोनाची पहिली लाट ओसरत असतानाच दुसऱ्या लाटेचे इशारे मिळत होते. पण त्यातून आपण, किंवा आपल्या यंत्रणा काही शिकल्याचे दिसत नाही. वर्षभरापूर्वी कोरोना नावाचं महाभयानक प्रकरण आपल्यावर येऊन आदळलं त्यावेळी आपण जेवढे भांबावलेले होतो, तेवढेच आजही भांबावलेले आहोत. वर्षभरापूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत फरक काही असेलच तर आज कोरोनाला वर्षभर का होईना पण रोखून धरू शकणारी लस आपल्या हातात आहे, एवढाच आहे. बाकी परिस्थिती तीच आहे. रुग्णालये भरलेली आहेत, बेड मिळवण्याकरता दारोदार फिरणं थांबलेलं नाही, वैद्यकीय आणि आनुषंगिक सुविधा अपुऱ्या आहेत, व्हेंटिलेटर पुरेसे नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, चाचण्यांचे गोंधळ आहेतच, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही, पुरेसे मनुष्यबळ हाताशी नाही; इतकं सगळं कमी पडतंय म्हणून की काय पण स्मशानांमध्येही वेटिंग आहे. या संकटातही मास्कचा काळाबाजार झाला, साठेबाजी झाली, रेमडेसिव्हिर सारख्या औषधांचा काळाबाजार अजूनही थांबलेला नाही. चिंतांच्या यादीमध्ये लस मिळेल की नाही, या नव्या चिंतेची भर पडली आहे आणि आता तर लस कोणाला द्यायची आणि किती द्यायची याचीही टक्केवारी ठरायला लागली आहे. सुरू होतंय होतंय असं वाटणारं अर्थचक्र पुन्हा रूततंय की काय, अशी सार्थ भीती एकीकडे आहे आणि दुसरीकडे गर्दी हटत नाहीये, कर्मठपणाकडे झुकणारे कुठलेच हट्ट सुटत नाहीयेत.

कोरानासोबत जगण्याची तयारी करावी लागणार असे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत असताना; आपण आतापर्यंतच्या अनुभवातून काही शिकणार आहोत का असा प्रश्न आपल्याच मनाला विचारण्याची वेळ आली आहे, फैलावणाऱ्या विषाणूनी आणि त्या फैलावाला मदत करणाऱ्या प्रत्येकानी ती आणली आहे. लसीकरणाबरोबरच, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखून व्यवहार करणे, गर्दी टाळणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे, वैद्यकीय चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या बाबींना पर्याय नाही. अर्थव्यवस्था रूळावर आणायची असेल, जगण्यातलं चैतन्य पुन्हा अनुभवायचं असेल तर मागच्या चुकांमधून शिकावं लागेल. कोरोनाची ब्याद कधी टळेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याच हातात आहे.

संबंधित बातम्या