आशेच्या आनंदसरी

-
मंगळवार, 27 एप्रिल 2021


संपादकीय

भाजून काढणाऱ्या फुफाट्यातून वाट काढत असताना अवचित कुठूनशी वाऱ्याची एखादी झुळूक हवाहवासा थंडावा घेऊन यावी, तसा कालपरवाच येत्या पावसाचा सांगावा आला आहे. फुफाट्यातून वाट शोधणाऱ्याला ती थंड वाऱ्याची झुळूक, पुढे कुठेतरी असायला हवेत असे वाटणाऱ्या, सुखद क्षणांची चाहूल देत असते. दिवसच असे आहेत की चांगलं काही तरी घडणार आहे असं सुचवणारी कोणतीही शुभचिन्हे कुठेतरी लांब क्षितीजापार उमटताना पाहणं देखील सद्आशेचा हवाहवासा वाटणारा शिडकावा करून जातं आहे. असाच काहीसा दिलासा भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या यंदाच्या पावसाच्या अंदाजाने दिला आहे. 

येत्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीतील पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच वर्तविला आहे. या प्राथमिक अंदाजानुसार यंदा या चार महिन्यांत ९८ टक्के पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजात पाच टक्के अधिक-उण्याची शक्यता जरी गृहीत धरली तरी कमीत कमी ९३ टक्के ते जास्तीतजास्त १०३ टक्के पाऊस यंदाच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडेल असा हा अंदाज आहे. आर्थिक, भावनिक अशा साऱ्याच मानवी व्यवहारांशी पावसाचं नातं असतं. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याबाबतचे हे शुभवर्तमान शेतकरी, व्यापारी, कारखानदार, प्रशासक, प्रत्येकालाच दिलासा देणारे आहे.

पावसाचं जगण्याच्या गुणवत्तेशी असलेलं नातं उमगल्यावर आपल्या पूर्वजांनी पावसावर सूक्त रचली. “महान्तं कोशमुदचा नि षिञ्च स्यन्दन्तां कुल्या विषिताः पुरस्तात्। घ्रृतेन द्यावापृथिवी व्युन्धि सुप्रपाणं भवत्वघ्नाभ्यः।।” आमच्या जीवनाचं हे विशाल पात्र जलाने भरून जाऊ दे. पाण्याचे (जीवनाचे) प्रवाह मुक्त वाहू देत आणि स्वर्ग व पृथ्वी समृद्ध होऊ देत, अमल आणि उदंड जलाने सर्व चराचराची तृष्णापूर्ती व्हावी यासाठी हे पर्जन्यदेवा तुमचे आशीर्वाद असो द्यावेत, अशी प्रार्थना पर्जन्यसूक्तातल्या एका श्लोकात केलेली आहे. 

आजच्या आपल्या कृषिधारित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही  पाऊस येणार आणि पुरेसा असणार या म्हणण्याला पर्जन्यसूक्त रचणाऱ्या आपल्या पूर्वसूरींच्या काळाइतकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यापासून ते शेती आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याच्या नियोजनापर्यंतची आणि त्या पलीकडे जाणारी बाजारपेठेची, समाजस्वास्थ्याचीही अनेक गणिते पावसाच्या वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पडण्याशी बांधलेली असतात, हे लक्षात घेतले तर चांगल्या पावसाचा अंदाज देणाऱ्या या ‘मेघदूता’ने किती आशा पल्लवीत केल्या आहेत याचा अंदाज येईल.

प्रशांत महासागरातल्या ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’ ह्या दोन घटकांचा भारतातल्या मोसमी पावसावर परिणाम होत असतो. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार प्रशांत महासागरातल्या पाण्याचे तापमान वाढवणारा ‘एल-निनो’ घटक तयार होण्याची शक्यता यावर्षी कमी आहे. अर्थात हा पहिल्या टप्प्याचा अंदाज आहे. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खाते पावसाचा दुसरा अंदाज जाहीर करेल.

हवामान खात्याने यावर्षीच्या पावसाचा प्रत्येक राज्यासाठीचाही अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातही यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे, तर राज्याच्या उर्वरित भागांत सरासरी एवढा पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदाच्या या पहिल्या अंदाजानुसार दुष्काळ आणि महापुराच्या शक्यताही कमी आहेत.

गेल्या काही वर्षांपासून हवामानाच्या अंदाजांमध्ये अचूकता आली असली तरी अभ्यासकांच्या मते आपल्याला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, कारण मुद्दा पडलेल्या पावसाने एक कोणता तरी आकडा गाठणे एवढाच नाही. गेल्या पाच वर्षांचे अंदाज पाहिले तर २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांमध्ये पावसाने अपेक्षित सरासरी गाठलेली नाही, आणि २०१९ व २०२० या वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, असे दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पाऊस राज्यात हाहाकार माजवत असल्याचे आपण अनुभवतो आहोत. एखाद्याच भागात अगदी कमी वेळात प्रचंड पाऊस झाल्याच्याही घटना आता नवीन नाहीत. अशा पावसाने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर होत असली तरी त्यामुळे शेतीचे जे नुकसान होते ते पाहता अंदाजांची अचूकता वाढविण्यावर आपल्याला आणखी भर द्यावा लागणार आहे, तरच अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही संकटांशी आपल्याला पुरेशा तयारीने सामना करता येईल आणि वेळेवर आणि पुरेसा पाऊस होऊन ‘पृथिवी सस्यशालिनी’ व्हावी ही प्रार्थना फलद्रूप होईल.

संबंधित बातम्या