नंदनवनीचं विभूषण!

-
सोमवार, 10 मे 2021

संपादकीय

आम्र नंदनवनीचं विभूषण ।
श्रेष्ठ हिंद फळांतिल हे फळ ।।
अन्य फळे जरि पक्व ।
आम्र जरी न परिपक्व ।।

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’त ‘आंबा’ या विषयाची जी नोंद आहे त्यात या चार ओळी नोंदवलेल्या आहेत. चौदाव्या शतकात होऊन गेलेला सूफी रचनाकार आमीर खुस्रोच्या एका रचनेचं हे मराठी रूपांतरण आहे. खुस्रोनी आंब्याला ‘फक्र-ए-गुलशन’, बागेचे वैभव म्हटले आहे.

सातशे -साडेसातशे वर्षांपूर्वी रचलेल्या या चारोळीत खुस्रोनी आंब्याचं एक वैशिष्ट्य नोंदवलं आहे; इतर सगळी फळं पिकल्यावरच खाता येतात, पण आंबा मात्र कच्चा असो वा पिकलेला, त्याची भुरळ पडतेच.

‘आंबा’ हा आपल्या खाद्यसंस्कृतीमधला एक रसाळ टप्पा! किंबहुना सुफलनाच्या, वृद्धीच्या, सातत्याच्या भावनांशी जोडल्या गेलेल्या आम्रवृक्षाला आपल्या एकूणच पारंपरिक व्यवहारांमध्ये, रीतिरिवाजांमध्ये मानाचे स्थान आहे. ‘आंबा आणि अशोक ह्या दोन वृक्षांना भारतातल्या कला आणि साहित्यात सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे,’ असे नंदिनी कृष्णा आणि एम. अमृतलिंगम यांनी त्यांच्या ‘सॅक्रेड प्लान्टस्‌ ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हटले आहे. 

आपल्या या खंडप्राय देशात हिमालयाच्या पायथ्यापासून, आसाम, मेघालयातल्या घनदाट अरण्यांपासून, कडाक्याची थंडी आणि तितकाच कडाक्याचा उन्हाळा असणाऱ्या पंजाब आणि राजस्थानाल्या मरूभूमीपासून, मध्य भारतातल्या सुपीक मैदानी प्रदेशांपर्यंत आणि भरपूर पावसाचा पश्‍चिम घाटापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात आपल्या राष्ट्रीय फळाचा मान असलेला फळांचा हा राजा आपली ‘आंबेशाही’ टिकवून आहे.

माणसाच्या आणि आंब्याच्या साहचर्याला गेल्या पंचवीस ते तीस दशलक्ष वर्षांचा इतिहास आहे, असं वनस्पतिशास्त्र सांगतं. आपल्या भावविश्वाशी निरनिराळ्या रूपांत जोडल्या गेलेल्या आंब्याला आपल्या परंपरा, लोककथा, लोकगीते, महाकाव्ये, शिल्पकृती, मिथकांनी अजरामर करून ठेवलं आहे. सगळ्या जगाबरोबर झिम्मा खेळणाऱ्या आंब्याची वर्णनं पुराणं, उपनिषदं, रामायण, महाभारत, जैन आणि बौद्ध वाङ्‌मयात, पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्रात, मुघलकालीन लिखाणात, ब्रिटिश, पोर्तुगीज, डचांच्या लिखाणात सापडतात. अजिंठ्याच्या अज्ञात शिल्पकारांपासून ते कवीकुलगुरू कालिदासापर्यंत, इसवीसनापूर्वी सहाव्या शतकात भारतात येऊन गेलेला ह्यू एन त्संग, त्याच्याच अलीकडचे -पलीकडचे फाहायन, इब्न हॉकल, इब्न बॅटुता, ल्युडोव्हीची डी व्हर्दिमा असे चिनी आणि अरब प्रवासी ते आमीर खुस्रोपर्यंत असंख्यजणांनी आपापल्या पद्धतीने आंबा  चितारला आहे. उमलून आलेल्या आम्रमंजिऱ्यांनी गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांसह असंख्य कवी, गीतकारांना भुरळ घातली आहे. या द्वीपकल्पात वेगवेगळ्या प्रदेशांवर वेगवेगळ्यावेळी राज्य करणाऱ्या चक्रवर्ती सम्राटांनी, राजे-रजवाड्यांनी, त्यांच्या मांडलिकांनी आंब्याच्या राया फुलवल्या आहेत.

व्यापारी तत्त्वावर आंब्याचं उत्पादन घेण्याबद्दल संशोधक विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून लिहिता-बोलताहेत. पुण्याच्या त्यावेळच्या बॉटनी कॉलेजमधले प्राध्यापक आणि रॉयल हॉर्टीकल्चर सोसायटीचे फेलो जॉर्ज मार्शल वुड्रो यांनी १९०४ मध्ये लिहिलेल्या ‘द मॅंगो’ नावाच्या पुस्तकात आंब्याच्या व्यापारी उत्पादनाची गरज मांडली आहे.

जगात पिकणाऱ्या एकूण आंब्यापैकी चाळीस टक्क्यांहून थोडा जास्तच आंबा भारतात पिकत असला तरी आपली दर हेक्टरी उत्पादनक्षमता वाढविण्याची गरज अनेकदा अधोरेखित केली जाते. गेल्या काही दशकांमध्ये आपल्या विद्यापीठांनी या दिशेने मोलाचे प्रयत्न केले आहेत. आपल्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला  अलीकडेच मिळालेल्या जीआय मानांकनातून, आंब्याच्या फळांच्या भौगोलिक वैशिष्ठ्याची ग्वाही देणाऱ्या क्यूआर कोडसारख्या प्रयोगातून आंब्याच्या व्यवसायाला वेगवेगळे पैलू जोडले जात असले तरी जागतिक व्यापारात आपला ठसा उमटविण्यासाठी आपल्याकडच्या आंब्याला अजूनही अनेक अडचणींमधून मार्ग काढावा लागणार आहे. वातावरण बदलापासून घटत्या उत्पादनापर्यंतची आव्हाने आंब्यासमोर आहेतच. पण आंबा पुढे जात राहील, उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या नव्या तंत्राना स्वीकारत...

‘आजोबाने झाड लावावं आणि नातवंडांनी फळं खावीत’ अशी ख्याती असलेला, पंचेंद्रियांना सुखावणाऱ्या रस-रंग-गंध-चवीने आपल्या प्रत्येकाशी नातं सांगणारा आंबा तुम्हा सर्वांच्या जीवनप्रवासाची मिठास उत्तरोत्तर वाढवत नेवो, अशाच आंब्याच्या 

या ताज्या ‘सिझन’च्या निमित्ताने शुभेच्छा!

संबंधित बातम्या