गोष्ट, छोट्या गोष्टींची...

-
सोमवार, 17 मे 2021

संपादकीय

‘की-वर्ड्स’ हा सध्याच्या जगातला परवलीचा शब्द आहे. माहितीच्या आंतरजालात घुसमटून न जाता योग्य ती माहिती मिळवायची असेल तर योग्य शब्दांची ही किल्ली हाताशी असणं फार महत्त्वाचं असतं, अन्यथा माहितीच्या या महापुरात नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरायला होण्याचीच शक्यता अधिक. या यादीच्या ‘श्री’काराखाली कोणते शब्द असावेत हे समजलं तर वास्तवाचे चटके सुसह्य करण्याच्या प्रयत्नांना काहीशी दिशा देण्याच्या स्थितीत आपणच आपल्याला आणू शकतो, हे समजावून घेणं कदाचित अधिक सोपं असू शकतं. आता जर नव्याने परवलीच्या या शब्दांची यादी करायला बसलो तर एक महत्त्वाचा बदल लक्षात येतो. बहुतेकांचं रोजचं जगणं मॅप करणारे की-वर्ड्स गेल्या बारा-चौदा महिन्यांत बदलले आहेत; चिंता, काळजी, अनिश्चितता, अदृष्टाची भीती, हतबलता अशा एरवीही आपल्या आसपास वावरणाऱ्या शब्दांनी या यादीला घेरल्याची जाणीव प्रबळ करणारे हे बदल दिसतात.

जवळपास पंधरा महिन्यापूर्वी चीनमधल्या एका कोपऱ्यातून माणसाच्या आयुष्यात शिरलेल्या कोविड-१९चा अगदी अलीकडचा भारतीय अवतार आता ‘व्हेरिंएट ऑफ कन्सर्न’ या स्थितीपर्यंत पोचला आहे. ‘ह्याचं करायचं काय?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अजूनही झगडणाऱ्या माणसाकडे, ‘हा आला कुठून?’, या प्रश्नाचंही नेमकं उत्तर अजून नाहीये. पण त्याच्या बदलत्या अवतारांनी माणसाचं जगणं अंतर्बाह्य बदलवणारं खूप काही शिकवलं हे तर खरंच. अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्या पुरेशा अंगवळणी पडलेल्या नाहीत, मात्र हे शिकणं आता खऱ्या अर्थाने निरंतर शिक्षण असणार आहे. या शिक्षणाला रचनात्मक चांगुलपणाच्या छटा आहेत, हा या परिस्थितीतही दिलासा देणारा एक महत्त्वाचा भाग. 

जाणिवांच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या या निरलस रचनात्मक छटा  ‘गोदरेज समूहा’ने केलेल्या ‘द लिटल थिंग्ज वी डू’ या सर्वेक्षणातून पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अनिश्चिततेने घेरलेले असतानाही असंख्य हातांनी, तितक्याच अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या अन्य असंख्य जिवांना मदत तर केलीच, पण त्यांनी स्वतःच्या आयुष्याचेही काही कोपरे घासून घेतलं; स्वतःलाही कर्तव्यांच्या, जाणिवांच्या, सर्जनशीलतेच्या नव्या वळणावर नेऊन उभं केलं. कोविडनी आणलेल्या टाळेबंदीचा अपरिहार्य परिणाम म्हणून काहींना नवीन रस्ते शोधणं भाग पडलं, काहींनी कंटाळा घालवण्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला तर काहींनी स्वतःला बदलण्याचाही प्रयत्न केला. 

अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकता, मुंबई, पुणे, चंडीगड, इंदूर, कोची आणि लखनौ या शहरांमधल्या रहिवाशांचा सहभाग असलेल्या या सर्वेक्षणातून सामोरी आलेली आकडेवारी रंजक तर आहेच, पण गेल्या वर्षभरातले काही, दिसायला छोटे पण महत्त्वाचे बदल अधोरेखित करणारी आहे. समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक उपक्रमांमध्ये लोकांचा वाढता सहभाग तर दिसलाच, पण या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींनी नोंदवलेले वैयक्तिक आयुष्यातले, दिनचर्येतले, सवयींमधले बदलही महत्त्वाचे आहेत. 

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दर पाचातल्या एकाने स्वयंपाक, चित्रकला किंवा सोशल मीडियावर छोटी सादरीकरणे अशा सर्जनशील छंदांमध्ये विरंगुळा शोधला, तर एक चतुर्थांशजणांसाठी वाचन आणि संगीत हे विरंगुळ्याचे विषय होते. घरातून काम करत असल्याने अनेकांचा कामाला येण्याजाण्याचा वेळ वाचला त्या वेळेचा उपयोग अनेकांनी इतर अनेक, एरवी आवर्जून लक्षात न येणाऱ्या, गोष्टींसाठीही केला. कुटुंबीयांना अधिक वेळ देता आला इथपासून ते योग्य तेवढी विश्रांती घेता आली आणि मानसिक, शारीरिक फिटनेसपासून ते पर्यावरणाच्या मुद्द्यांची नव्याने जाणीव झाली, इथपर्यंतच्या बाबी या सर्वेक्षणात नोंदल्या गेल्या आहेत. 

कामाच्या धबडग्यात एरवी छोट्या वाटणाऱ्या, जगण्याच्या शर्यतीत लक्षातही न येणाऱ्या किंवा आवर्जून लक्ष द्यावं अशा गोष्टींच्या यादीत असल्याच तर तळाशी कुठेतरी हरवून गेलेल्या या साऱ्या गोष्टी. आपल्या जवळच्या माणसांबरोबरच्या सुख-दुःख वाटून घेण्याऱ्या गप्पा असतील, एखादं चांगलं पुस्तक असेल, एखादी कला असेल, राहून गेलेला आणि कधीतरी खुणावणारा एखादा छंद असेल, अगदीच काही नाही तर एकांतातला आपलाच आपल्याशी केलेला संवाद असेल... योग्य ते की-वर्ड्स घेऊन या छोट्या गोष्टींची गोष्ट नीट रचली तर आपल्या ‘असण्या’तली खुमारी आणखी वाढेल, हे नक्की!

संबंधित बातम्या