साध्य आणि साधन

-
सोमवार, 24 मे 2021

संपादकीय

किशोरवयाच्याही अलीकडच्या वयातल्या मुलांसाठी इन्स्टाग्रामची एक विशेष आवृत्ती बाजारात आणण्याच्या फेसबुकच्या निर्णयावरून बिनीच्या अमेरिकी विधीज्ञांनी सध्या एका चर्चेला तोंड फोडले आहे. अर्थात किशोरवयाच्या, आपल्याकडे बहुतेकवेळा ज्याचं वर्णन ‘अडनिडं वय’ असं केलं जातं त्या वयाच्या, उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या मुलांच्या संदर्भाने समाजमाध्यमांच्या दुनियेतल्या घडामोडींवर भाष्य होत असल्याची ही काही पहिली वेळ नाही. समाजमाध्यमांची घोडदौड सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या निमित्तांनी ह्या विषयावर चर्चा झडतच आहेत. ताज्या चर्चेला संदर्भ आहे तो आभासी दुनियेत रमणाऱ्यांचा आभासी जिवलग असणाऱ्या इन्स्टाग्रामचा. 

अमेरिकेतल्या टेक्सास, न्यू यॉर्क आणि कॅलिफोर्नियासह तब्बल चव्वेचाळीस राज्यांच्या ॲटर्नी जनरलांनी तेरा वर्षांखालच्या मुलांसाठी इन्स्टाग्रामची एक विशेष आवृत्ती बाजारात आणण्याचा विचार सोडून देण्याची विनंती फेसबुकला केली आहे. समाजमाध्यमांच्या वापराचे मुलांच्या मनावर होणारे परिणाम, मुलांच्या वागणुकीत होणारे बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक-आरोग्याच्या समस्या, सायबर गुंडगिरी अशा विषयांवरच्या अभ्यासांचा दाखला देत त्यांनी फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांना तसं पत्रच लिहिलं आहे. 

केविन सिस्ट्रम आणि माइक क्रिगर या जोडगोळीनी तयार केलेल्या इन्स्टाग्रामचा प्रवास थक्क करणारा आहे. गेल्या दहा -साडेदहा वर्षात या अॅपनी जगातल्या सोशल मीडिया वापरणाऱ्यांना अक्षरशः भुरळ घातली; इतकी की लॉंच झाल्यावर दीड एक वर्षातच त्याची पोच फेसबुककर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी जवळजवळ एक अब्ज डॉलर खर्चून, खरंतर गुंतवून, इन्स्टाग्राम विकत घेतलं. मुळात फोटो-शेअरींगसाठी तयार झालेल्या या अॅपमध्ये नंतरच्या काळात अनेक सुधारणा झाल्या, नवी फीचर आली आणि आज सदतीस भाषांमध्ये उपलब्ध असणारे हे अॅप जगभरातले आठशे दशलक्षांहून अधिक लोक वापरत आहेत. 

फेसबुकच्या सध्याच्या नियमावलीप्रमाणे तेरा वर्षांखालच्या मुलांना त्यांच्या अॅपचे आणि संकेतस्थळाचे सदस्यत्व घेता येत नाही. ही अट पाळली जात नाही, हे उघड गुपित आहे. ‘‘मुलं ऑनलाइन आहेतच; सगळ्याच पालकांना हे माहिती असतं. आपली मुलं नेमकं काय करतात याची पालकांना कल्पना असावी आणि त्यावर पालकांचे नियंत्रण असावे, असा आमचा प्रयत्न आहे, त्यातून परिस्थिती सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटल्याचे ''द वॉल स्ट्रीट जर्नल''ने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे ह्या चर्चा काही आजच्या नाहीत. फेसबुकनीच त्यांच्या मेसेंजर नावाच्या अॅपची ''मेसेंजर किड्स'' ही तेरा वर्षांखालच्या मुलांसाठीची आवृत्ती बाजारात आणल्यानंतर जानेवारी २०१८मध्ये ‘कॅम्पेन फॉर कमर्शिअल-फ्री चाइल्डहूड’ (सीसीएफसी)सह पंधरा अन्य संस्थांनी फेसबुकला या अॅपचा फेरविचार करण्याबाबत लिहिले होते.

अडनिड्या वयातल्या मुला-मुलींच्या इंटरनेट वापराच्या परिणामांवर आजवर असंख्य अभ्यास झाले आहेत. वरवर नॉर्मल वाटणाऱ्या स्क्रीन अॅडिक्शनपासून ते ऑनलाइन जुगाराच्या व्यसनापर्यंतच्या घटनांमध्ये सापडल्याने मनःशांती हरवून बसलेल्यांमध्ये मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे, असंही हे अभ्यास सांगतात. केवळ तारुण्याच्या उंबरठ्याकडे वाटचाल करणाऱ्यांनाच नव्हे, तर तो उंबरा ओलांडून जगण्याच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असणाऱ्या अनेकांसाठी या अनेकविध अभ्यासांमधून धोक्याचे कंदील दाखवले आहेत. गेल्यावर्षी साधारण याच दिवसांत पुढे आलेले ‘बॉईज लॉकर रूम’ प्रकरण अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल. वास्तवाचं भान नसणाऱ्या वयातल्या मुलांना आभासी जगात खेचून नेणारे हे आवेग एवढे झंझावाती असतात की दुर्दैवाने इथे ‘पुढच्या ठेच मागचा शहाणा’ हा धडा कुचकामी ठरतो.

हे समाजमाध्यम की ते समाजमाध्यम याविषयी ही चर्चा नाही. माहितीच्या आंतरजालाचे आणि त्यावर आधारलेल्या साधनांची बलस्थानं इथे नाकारायचीही नाहीत. मुद्दा आहे तो नकळत्या वयातल्या मुलांच्या त्यातल्या सहभागाच्या प्रमाणाचा. जगाच्या निष्ठुर वास्तवाच्या दृष्टीने नकळत्या वयात असली तरी या मुलांमध्ये खरंतर प्रचंड ऊर्जा असते, कल्पकता असते. गरज असते ती ह्या ऊर्जेला, कल्पकतेला दिशा मिळण्याची, आणि त्यासाठी योग्य साधनांचा योग्य वापर करण्याच्या प्रेरणांची. अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेडमास्तरांना पुन्हा जर पत्र लिहिलं, तर त्या पत्रात ते एक ओळ नक्की लिहितील - ‘...आणि त्याला म्हणावं, साध्य डोळ्यापुढून हलू न देता साधनं निवड, आणि दोन्हीतला फरक कधी विसरू नको!’

संबंधित बातम्या