लाटा मोजणारी माणसं....

-
सोमवार, 31 मे 2021

संपादकीय

बिरबलाची एक गोष्ट आहे. अकबराच्या दरबारातल्या एका पैसेखाऊ अधिकाऱ्याबद्दल रोज तक्रारी येत असतात. कारवाया, बदल्या असल्या गोष्टींना भीक न घालता या माणसाच्या भ्रष्टाचाराचा वारू चौखूर उधळलेलाच असल्याने अकबराच्या राज्यात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्याची चर्चा अगदी उघडपणे व्हायला लागलेली असते. अस्वस्थ होऊन बादशहा बिरबलाला पाचारण करतो. “हुजूर अशा अधिकाऱ्याला ताबडतोब बरखास्त करावं, कारण पैसे खाण्याची चटक लागलेला माणूस सुधारणं मुश्कील असतं,” बादशहाची चिंता ऐकून बिरबल आपली राय देतो. बिरबलाचं म्हणणं न पटल्याने बिरबलानं त्याचं म्हणणं सिद्ध करावं असं फर्मान निघतं.

दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्याची बदली एका लांबच्या समुद्र किनाऱ्यावर होते. मासेमारी करून जगणाऱ्या बारा-पंधरा कुटुंबांशिवाय दुसरा कोणी माणूसकाणूस नजरेस पडणंदेखील तिथं मुश्‍कील असतं. काही महिन्यांनी बादशहा आणि बिरबल वेष पालटून त्या अधिकाऱ्याची खबर काढण्याच्या मोहिमेवर निघतात. पाहतात तो काय, समुद्र किनाऱ्यावर एका शाही शामियान्यात या अधिकारी महाशयांनी आपलं बस्तान बसवलेलं असतं आणि शामियान्याच्या बाहेर चारपाच मच्छीमार नाणी मोजत उभे असतात. थोड्या चौकशा केल्यावर बादशहाला कळतं की त्या शामियान्यात प्रत्यक्ष बादशहांचा सर्वात विश्वासू अधिकारी राहतो आहे; आणि समुद्राच्या लाटा मोजण्याची महत्त्वाची जबाबदारी देऊन खुद्द बादशहांनीच त्याला इथे पाठवलं आहे. “लाटा मोजायच्या? कशासाठी?” त्यावर बादशहाला मिळालेल्या माहितीचा एकंदर सारांश असा; त्या लोकांचं नशीब थोर म्हणून बादशहाला या अधिकाऱ्याला इथे पाठवायची बुद्धी झाली; नाहीतर आज त्यांची मुंडकी काही जाग्यावर नव्हती. ह्या लोकांच्या मासेमारीमुळे लाटा कमीजास्त व्हायच्या आणि लांब कुठेतरी बादशहाचं एक बंदर आहे, तिथल्या शाही जहाजांना यायला-जायला अडचण व्हायची. पण हे अधिकारी दयाळू असल्याने यांच्या समुद्रात येण्याजाण्यावर काही आंच आलेली नाही, हां, आता त्यासाठी कमाईतला पाचवा हिस्सा त्यांना द्यायला लागतो; पण त्याचं इतकं काही नाही. देशोधडीला लागण्यापेक्षा हे बरं. हे ऐकून बिरबल बादशहाकडे पाहून फक्त एक स्मितहास्य केलं.

स्पेनमधली एक बातमी वाचून ही गोष्ट आठवली. दक्षिण स्पेनमधल्या कॉर्डोबा शहरातल्या कारागृहात सध्या एक प्रयोग सुरू आहे. कॉर्डोबा हे पहिल्या शतकातला रोमन तत्त्वज्ञ, नाटककार ल्युसियस सेनेका याचं जन्मगाव. सेनेकाच्या गावातला हा प्रयोग म्हणजे भ्रष्ट माणसाच्याही अंतर्मनात, आत खोलवर कुठेतरी, काहीएक प्रामाणिकपणा असतो का, हे शतकानुशतकांचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न आहे. ‘करप्शन रिहॅब’ नावाचा बत्तीस सत्रांच्या ह्या प्रयोगात गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये स्पेनमधल्या नऊ कारागृहांमध्ये सध्या शिक्षा भोगणाऱ्या चोवीसशे ‘व्हाइट कॉलर’ ठकसेनांना सामील करून घेण्यात आले आहे.

भ्रष्टाचारामागची नेमकी मानसिकता शोधण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून अनेक ग्रंथांमध्ये भ्रष्टाचारावर, लाचखोरीवर भाष्य केलेलं आढळतं. भ्रष्टाचार रोखणाऱ्या कायद्यांवर, त्यांच्या परिणामकारकतेवर, त्यावरच्या उपायांवर आजवर असंख्य चर्चा झडल्या आहेत. पण तरीही हे कोडं काही सुटलेलं नाही. सुस्थितीत असणाऱ्या एखाद्याला हजारपाचशेंचा मोह का होत असेल? कोणाच्या तरी मढ्याच्या टाळूवरचं लोणीही न सोडणारी ही अक्कलहुषारी माणसाच्या मेंदूत नेमकी कुठे असेल? समोरचा माणूस अडलेला आहे हे दिसल्यावर त्या अडचणीतच ‘संधी’ कशी दिसत असेल? माणसं मरत असताना जीव वाचवणाऱ्या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या हातांमागचं मन नेमका काय विचार करत असेल? 

पुन्हा या सगळ्याच्यामागे एकचएक मानसिकता असेल असंही नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, हे त्रिकालाबाधित सत्य इथेच कदाचित अधिक ठळकपणे सामोरे येत असेल. मग पुढे काय? यालाही कदाचित एकचएक उत्तर नाही. बिरबलाला हा प्रश्न विचारला असता तर त्यानी काय उत्तर दिलं असतं माहीत नाही, पण त्याच्या गोष्टीतल्यासारख्या लाटा मोजणाऱ्यांना आपल्याच आळशीपणाचा, अज्ञानाचा, भीतीचा, मोहाचा, संपत्तीच्या मदाचा, वाकड्या वाटा जवळ करण्याच्या वृत्तीचा फायदा होतो हे आपणही कधीतरी समजावून घेतलं पाहिजे आणि जोडीला ‘पाण्यात राहणारा मासा, पाणी कधी पितो’ ते शोधण्याचे, गैरव्यवहारांमागच्या लालसा शोधण्याचे, त्यावर बोलत राहण्याचे प्रयत्नही करण्याची गरज मात्र आहे.

संबंधित बातम्या