पर्यावरण दिनाच्या निमित्ताने...

-
सोमवार, 7 जून 2021

संपादकीय

गेल्या पंधरा दिवसांतल्या काही घडामोडी, बातम्या मुद्दाम लक्ष देऊन समजावून घेण्यासारख्या आहेत; विशेषतः आजच्या आणखी एका पर्यावरण दिनाचे वेध लागलेले असताना घडलेल्या. या घटनांना पार्श्वभूमी आहे ती कोरोना विषाणूनी अवघं जगणंच गेले काही महिने एका विचित्र खोड्यात अडकवल्याची. यातल्या बऱ्याचशा घडामोडी चिंतेत एकूणच भर घालणाऱ्या, आणि एखादी काहीशी उत्साहवर्धक!

‘निसर्ग’ नावाच्या वादळाने गेल्या वर्षीच्या पर्यावरण दिनाच्या आदल्याच दिवशी दिलेल्या तडाख्यातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोकणाच्या किनारपट्टीला पंधरा दिवसांपूर्वी ‘तौते’ नावाच्या आणखी एका वादळाला सामोरं जावं लागलं. पाठोपाठ चारच दिवसांनी पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ नावाचं आणखी एक वादळ थैमान घालून गेलं. अरबी समुद्रातल्या आणि बंगालच्या उपसागराल्या उष्णकटिबंधीय वादळांच्या संख्येत जवळजवळ बत्तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगणारी आकडेवारी ‘तौते’च्या निमित्ताने अधोरेखित झाली. यातली एक तृतीयांश वाढ गेल्या दहा वर्षांतील आहे, असं ही आकडेवारी सुचवते. हवामान बदलामुळे जमीन आणि पाण्याच्या तापमानात झालेली वाढ या वाढत्या वादळांना कारणीभूत असावी, असं हवामानशास्त्रज्ञांना वाटतंय.

आणखी एक बातमी आहे तैवानमधली. तिथं दुष्काळ पडलाय. मध्य तैवानमधला सन्-मून तलाव आटलाय. पाणी वापरावर इतके निर्बंध आले आहेत की तैवानवासियांना अंघोळीपासून आपल्या अनेक सवयी बदलाव्या लागल्या आहेत. सन्-मून तलावाचं भूचित्रच बदलून गेलंय. या दुष्काळानी केवळ तैवानवासियांनाच नव्हे तर संपूर्ण जगातल्या वाहन आणि इतर उद्योगांना वेठीला धरलंय. कारण या दुष्काळानी प्रचंड प्रमाणात पाण्याच्या पुरवठ्यावर अवलंबून असणारी चिप इंडस्ट्री थंडावलीय, या परिस्थितीचा फायदा घेऊन आपला चिप उद्योग चीन गिळंकृत करेल अशी भीती तैवानला वाटतेय, ब्रेन ड्रेनचा धोका जाणवायला लागलाय आणि वर्चस्ववादाचं एक नवं वादळ पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र प्रदेशात उभं राहतंय. या दुष्काळाबद्दल अभ्यासकांनी मांडलेलं एक निरिक्षण लक्षात घेण्याजोगं आहे. गेल्या वर्षी तैवानच्या किनाऱ्याला एकही टायफून धडकलेलं नाही. गेल्या साडेपाच वर्षांत असं पहिल्यांदाच घडतंय. अभ्यासकांच्या मते हा गेल्या दहा वर्षांतल्या हवामान बदलाचा परिणाम आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संघटनेने अलीकडेच जागतिक हवामानाबद्दलचे काही नवे अंदाज प्रसिद्ध केले आहेत. त्यातल्या एका अंदाजानुसार २०२५पर्यंत जगाला आणखी एका उष्णतम वर्षाला सामोरे जावे लागण्याची आणि अटलांटिक महासागरातल्या संहारक वादळांच्या संख्येतही वाढ होण्याच्या शक्यता नव्वद टक्क्यांच्या आसपास आहेत.

उद्याच्या संकटाची जाणीव करून देताना आजच्या पर्यावरण दिनाला थोडं बळ देणारी, ‘अजूनही फुलं फुलतील’ अशा आशा उंचावणारी बातमी म्हणजे जगातल्या जवळजवळ ब्याऐंशी टक्के देशांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनाक्षम असणाऱ्या त्यांच्यात्यांच्याकडच्या आणखी काही भूभाग संरक्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘प्रोटेक्टेड प्लॅनेट रिपोर्ट २०२०’नुसार जगभरातल्या साडेबावीस दशलक्ष चौरस किलोमीटर भूभागावरची वने, तलाव आणि पाणथळ जागा आणि अठ्ठावीस दशलक्ष चौरस किलोमीटरवर पसरलेला समुद्री प्रदेश आता पर्यावरण संरक्षण- संवर्धनाच्या दृष्टीने संरक्षित प्रदेश आहे.

पर्यावरण ही संकल्पना काहीशी गुंतागुंतीची आहे. पर्यावरणीय जाणिवांच्या लंबकाचं एक टोक म्हणजे झाडे, झुडपे, नद्या, डोंगर, अभयारण्ये, कधीतरी पाहिलेले वाघ, हत्ती, डॉल्फिन आणि पर्यावरण दिन म्हणजे पावसाची चाहूल लागत असताना झाडं लावण्यासाठी एक आऊटिंगची आणि त्यानिमित्ताने चमकण्याची संधी. तर दुसऱ्या टोकाला पर्यावरण असा नुसता उल्लेखही अनेकांचा भृकुटीभंग करून जात असतो. या दोन टोकांच्या मधे एक छोटा समूह तग धरून उभा असतो; पर्यावरण समजावून घेत असतो; त्या बद्दल बोलत असतो. रोजच्या जीवघेण्या  लढाईत गळ्यापर्यंत बुडालेला असतानाही हे जगणं अधिक निसर्गस्नेही असावं त्याला मनापासून वाटत असतं. 

पर्यावरण शिक्षण हा शाळेत कधीतरी एखाददोन वर्षं शिकून पुढे जाण्याचा विषय नाही. ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. जीव, भौतिक, रसायनशास्त्रांसह भूगोल, अभियांत्रिकी, हवामानादी शास्त्रांना आणि तंत्रज्ञानाला कवेत घेणारी पर्यावरण ही संकल्पना थेट माणसाच्या इतिहासाशी, कलांशी, जगण्याच्या नियमांशी, आरोग्याशी आणि व्यापक अर्थानी विचार केल्यास माणसाच्या जगण्याच्या गुणवत्तेशी जोडली गेलेली आहे. या संदर्भाने ‘नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन’ ही पर्यावरण दिनाची यंदाची कल्पना समजावून घेतली तर पर्यावरण जाणिवा अधिक समृद्ध व्हायला आणि मग त्या जपण्यासाठी अगदी छोट्या वाटणाऱ्या पण दूरगामी परिणाम साधणाऱ्या कृती करण्याचे आणि त्याविषयी आग्रह धरण्याचे बळ मिळू शकेल. मग कदाचित उद्याच्या संकटाची धग कमी करण्यात आपलाही काही हातभार असेल.

संबंधित बातम्या