...ऐका पुढल्या हाका

-
सोमवार, 14 जून 2021

संपादकीय

आशेची शृंखला पायात नसेल तर माणसाच्या अवघ्या जगण्याला एक पांगळेपण येतं, असं सुभाषितकारांनी सांगून ठेवलं आहे. पण आशा जागवत ठेवणारी गाणी नुसतीच गाऊन ह्या पांगळेपणावर मात करता येत नाही, त्याला समंजस कृतीची जोड असावी लागते हे सुद्धा उच्चरवाने सांगण्याची वेळ आता पुन्हा एकदा आली आहे. लाटांवर स्वार होत कोलंबसाने समुद्रात जहाजं घातली तेव्हाच ‘किनारा तुला पामराला’ असं त्या उधाणलेल्या सागराला बजावण्याचा अधिकार त्याला मिळाला, याची जाणीव ठेवण्याची आठवण स्वतःलाच पुन्हा पुन्हा करून देण्याची हीच वेळ आहे. ठाणबंदीच्या आणखी एका विचित्र कालखंडातून बाहेर पडून ‘पुनःश्च हरी ओम्’ म्हणत शिडात वारा भरून घेत असताना कृतीतल्या समंजसपणाला तिलांजली देणं ही भविष्याशी वर्तमानात केलेली सर्वात मोठी प्रतारणा ठरेल. संपूर्ण मानवजातीच्या जगण्याला क्रूर फटका देणाऱ्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असतानाच, तिसऱ्या लाटेचे इशारे मिळत आहेत; अशा वेळी थोडं थांबून गेल्या पंधरा महिन्यांत आपण जेवढं काही केलं, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपण जे जे केलं नाही, त्याकडे एक नजर टाकायला हवी.

गेल्या काही दिवसांतल्या आकड्यांवर नजर टाकली तर देशातल्या अनेक राज्यांमधल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसते आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांमध्येही आता रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे, कोरोनाला बळी पडणाऱ्यांची संख्यादेखील घटते आहे. अजूनही कोरोनाच्या विळख्यात असलेले राज्याचे काही भाग वगळले तर ठाणबंदीचे नियमही आता शिथिल झाले आहेत, होत आहेत. जगण्याचं थांबून पडलेलं रहाटगाडगं पुन्हा फिरायला सुरुवात झाली आहे. मात्र, या बदलत्या परिस्थितीला सामोरं जाताना गेल्या चार महिन्यात कोरोनामुळे आणि त्या आधीच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर झालेल्या, न झालेल्या, पुरेशा प्रमाणात न झालेल्या गोष्टींमुळे झालेली वाताहात, वाट्याला आलेली अगतिकता नजरेआड करून चालणार नाही. ‘आता नजीकच्या भविष्यात तरी कोरोनाबरोबरच जगावं लागणार,’ वगैरे बोलताना; वैयक्तिक आयुष्यातल्या ‘काही होत नाही हो..’ या वाक्यामागे दडलेल्या बेफिकिरीच्या विषाणूवर मात करण्याची आपली तयारी आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.   

गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडचे निर्बंध सैलावायला सुरुवात झाली. त्याचवेळी युरोपातून कोरोनाच्या परतण्याचे दुसऱ्या लाटेचे संकेत मिळत होते. निर्बंध कमी झाल्यानंतरच्या काळात आपण सगळेच, प्रशासनापासून ते अगदी साध्या, एरवी समंजस असणाऱ्या नागरिकांपर्यंत, सगळेच कसे वागलो याचा कोळसा इथे उगाळला नाही तरी प्रत्येकाने आपल्याआपल्यापुरता त्याचा विचार करायला हरकत नसावी. इथे कोणा एका घटकावर दोषारोप करण्याचा मुद्दा नाही, कारण परिस्थिती बिघडवत नेण्यास अनेक वेगवेगळ्या घटकांचा हातभार लागला आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

पोटाच्या मागे धावणाऱ्या प्रत्येकालाच हातपाय हलवणं भाग असतं त्यामुळे निर्बंध सैलावल्यावर गर्दी वाढणार, लोक प्रवास करणार, उद्योगधंदे; कार्यालये सुरू होणार, राजकारणापासून ते मौजमजा, चालीरीती, सण –समारंभ आणि परंपरांपर्यंतचा उत्साह उतू जाणार, पोटापलीकडेही एक आयुष्य असतं आणि आता लसही आली आहे, ही सगळी विधानं मान्य जरी केली तरी या साऱ्यांच्या आडून नकळत येऊन अंगाअंगात भिनून राहणारा निष्काळजीपणा आपल्याला कुठे घेऊन जाईल, याचा अंदाज आता तरी घ्यायला हवा. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या त्रिसूत्रीतला मास्क वापरण्याचा एकच मुद्दा घ्या. सार्वजनिक ठिकाणी वावरताना आजही कित्येक जणांना मास्क वापरणं कमीपणाचं वाटत असावं. मास्कच न वापरणाऱ्यांपेक्षाही अधिक लोकांच्या बाबतीत, कोरोना आधी हनुवटीवर येऊन बसतो, आणि तिथून तो ओष्ठद्वयाकडे सरकतो असा समज आहे की

काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे;  कारण त्यांचा मास्क नाक सोडून चेहऱ्याचा अन्य भाग झाकत असतो. विनोदाचा भाग सोडून द्या. पण तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे, ती कशी असेल यावर मत व्यक्त होत आहेत. सरकार आणि संबंधित यंत्रणा किती सजग आहेत, त्या काय करत आहेत, त्यांनी काय करावं यावर चर्चा करताना, त्या तिसऱ्या लाटेचा फटका आपल्याला बसणार नाही यासाठी आपण काय करणार? आधीच्या चुका टाळणार का? हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे आहेत. तिसरी लाट नसावी अशी आशा करताना आधी म्हटल्याप्रमाणे आशा जिवंत ठेवणाऱ्या गाण्यांना समंजस कृतीची जोड नसेल तर ती गीतंही अर्थहीनच ठरतील.

संबंधित बातम्या