‘ज’ जैववैद्यकीय कचऱ्याचा

-
सोमवार, 28 जून 2021

संपादकीय

‘कोऽहम्?’ _मी कोण आहे? _ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधण्याचे प्रयत्न माणसाच्या असंख्य पिढ्या करत आहेत. प्रत्येक काळातले तत्त्ववेत्ते, कवी, लेखक, शास्त्रज्ञ, इतिहासकार या एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असल्याचे जाणवत राहते. ‘होमो सेपियन’ म्हणजे प्राणिसृष्टीतल्या ‘प्रायमेट्स’, नरवानर, गणातला प्रज्ञावंत घटक इथपासून ते ‘समाजशील प्राणी’ किंवा ‘आत्मभान असणारा विवेकशील प्राणी’ अशा माणसाच्या अनेक व्याख्या आजवर केल्या गेल्या. गेली कित्येक दशके पृथ्वीवर नांदताना केवळ बुद्धीच्या आधारे स्वतःचं अस्तित्व नुसतं टिकवूनच ठेवणाऱ्या नव्हे तर अवघ्या पृथ्वीला कवेत घेणाऱ्या माणसाची आणखी एक व्याख्या मात्र अनेकदा सोयीने नजरेआड होत असते, ‘कचरा करणारा प्राणी’.    

निसर्गातला अन्य कोणताच घटक कचरा निर्माण करीत नाही. अगदी दूर रानात उन्मळून पडून कुजत रहाणारं एखाद्या झाडाचं खोडसुद्धा त्याच्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनून निसर्गाने आखून दिलेल्या रीतीने निसर्गात विलीन होतं. पण आपल्यासाठी, आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या असंख्य वस्तू वापरून त्यांचा ‘कचरा’  झाल्यावर त्या कचऱ्याच्या भस्मासुराबरोबर कसं वागायचं, हा प्रश्न सृष्टीतल्या माणूस नावाच्या प्रज्ञावंत घटकाला अजून पुरेशा समाधानकारकरीत्या सोडवता आलेला नाही. मग केवळ माणसाच्या आजूबाजूलाच नव्हे तर महासागरांमध्ये, एव्हरेस्टवर आणि अगदी पृथ्वीच्या कक्षेबाहेर अंतराळातही कचऱ्याचे साम्राज्य पसरत राहते.

गेले पंधरा-सोळा महिने सगळ्या जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोनानी कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ‘कोविड जैववैद्यकीय’ कचऱ्याच्या रूपाने पुन्हा नव्याने ऐरणीवर आणला आहे.

कोरोना काळात आपल्या पर्यावरणामध्ये जे प्रतिकूल बदल झाले त्याचा लेखाजोखा मांडणारा एक अभ्यास ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट’, सीएसई, या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला. देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असताना, गेल्या महिन्यात, दररोज २०३ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होत होता. मे महिन्यातल्या या आकड्याची एप्रिल महिन्याशी तुलना केली तर हा आकडा दररोज ६४ टन इतक्या वेगाने वाढला होता. कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी, फेब्रुवारी २०२१मध्ये, रोज ५३ टन कोविड जैववैद्यकीय कचरा निर्माण होत होता.

मे महिन्यातल्या या कचऱ्यातला महाराष्ट्राचा रोजचा वाटा होता १९ हजार किलोंचा. केरळ आणि गुजरातमध्ये कोविड जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक होते. या काळात कोरोनाचे रौद्र रूप  आपण अनुभवत होतो, रुग्णसंख्या प्रचंड होती, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या यंत्रणा जिवाची पराकाष्ठा करीत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक प्रमाणात जैववैद्यकीय कचरा निर्माण होणे स्वाभाविक असले तरी या अभ्यासात मांडलेला सगळ्यात गंभीर भाग म्हणजे, आपल्याकडे आजही अनेक ठिकाणी या सगळ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा नाहीत. सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या सर्वच्यासर्व जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रकिया करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणा सगळीकडे नाहीत ही बाब काळजीत भर घालणारी आहे. 

सीएसईच्या अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीनुसार २०१७मध्ये रोज ५५९ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होत होता. हा आकडा २०१९मध्ये ६१९ टनांवर गेला. मात्र याच काळात प्रक्रिया होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण घसरलेले दिसते. २०१७मध्ये ९२.८ टक्के वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया होत होती, २०१९मध्ये ती ८८ टक्क्यांपर्यंत खाली आली.

एकुणात निर्माण होत असलेल्या कचऱ्याच्या तुलनेत जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत. सुमारे बारा टक्के जैववैद्यकीय कचऱ्यावर आज कोणतीही प्रक्रिया होत नाही, असे सीएसईचा अभ्यास म्हणतो. प्रक्रिया न होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्यामुळे होणारे परिणाम पाहता हे प्रमाण निश्चितच विचार करायला लावणारे आहे.

संबंधित बातम्या