सृष्टीसंहार

-
सोमवार, 5 जुलै 2021


संपादकीय

हवामान बदलाबाबत खूप काही लिहिले, बोलले जाते आहे.  वाढत्या तापमानाचे चटके सोसणाऱ्या पृथ्वीला वेठीला धरणारे संकट तुम्हाआम्हा सगळ्यांच्या उंबऱ्यात उभे आहे, आणि आता त्याचे परिणाम सर्वांशाने रोखता जरी येणार नसले तरी त्यांची तीव्रता जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याच्या दिशेने जगभरात प्रयत्न सुरू आहेत. 

तापमानवाढ आणि त्या वाढीचे विनाशकारी परिणाम थोपविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्याचे एक मोठे आव्हान आपल्या समोर आहे. याच संदर्भाने क्रांतिकारी ठरू शकेल असा आणखी एक विचार गेल्याच आठवड्यात मांडला गेला आहे.

बारा विधिज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने ‘इकोसाइड’ म्हणजे सृष्टीसंहाराची नवी कायदेशीर व्याख्या जगासमोर ठेवली आहे. नेदरलँडमधल्या ‘स्टॉप इकोसाइड फाउन्डेशन’साठी वकिलांचा हा गट जवळजवळ सहा महिने या नव्या कायद्याच्या मसुद्यावर काम करीत होता. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) जर हा मसुदा स्वीकारला तर सृष्टीविध्वंस हादेखील युद्ध गुन्ह्यांइतकाच गंभीर गुन्हा ठरेल आणि प्रदूषकांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला जाब द्यावा लागेल. प्रचलित कायद्यानुसार नरसंहार, मानवतेविरूद्धचे गुन्हे, युद्धगुन्हे आणि आक्रमणे हे चारच मुद्दे आंतरराष्ट्रीय गुन्हे ठरतात आणि त्याबाबतीत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जर हा प्रयत्न उचलून धरला तर सृष्टीसंहार हा पाचवा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरेल.

‘पर्यावरणाची सर्वदूर परिणाम करणारी किंवा दीर्घकालीन परिणाम करणारी अत्यंत गंभीर हानी होऊ शकते याची जाणीव असूनही केलेले बेकायदेशीर आणि अमानुष कृत्य’ अशी सृष्टीसंहाराच्या या नव्या व्याख्येची रूपरेषा सांगता येईल. पर्यावरणाविषयी आस्था असणाऱ्या जगभरातल्या मंडळींनी या प्रयत्नाला ‘सर्वंकष पर्यावरणहानीला आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवू शकणारे १६५ शब्द’, असं म्हटलं आहे.

सृष्टीसंहाराच्या ह्या नव्या कायद्याचा मसुदा वाचल्यास हा कायदा लिहिणाऱ्यांना पर्यावरणाच्या कोणत्याही घटकासाठी स्थलकालाच्या बंधनांच्या पलीकडे जाऊन प्रतिकूल ठरू शकणाऱ्या बदलाविषयी दाखवल्या जाणाऱ्या बेपर्वाईला वेसण घालणे अपेक्षित आहे, हे जाणवते.

ही व्याख्या जर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्वरूपात स्वीकारली गेली तर कारवाईसाठी मानवी हानी ही आवश्यक पूर्वस्थिती असलीच पाहिजे अशी पूर्वअट नसणारा सृष्टीसंहार हा एकमेव गुन्हा ठरेल. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या लढाईचा दूरगामी विचार करता हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. हा ‘पृथ्वीच्या अस्तित्वाचाच प्रश्न’ असल्याने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने ह्या प्रयत्नाला बळ देऊन जागतिक पर्यावरणाचा विनाशक विध्वंस रोखण्यासाठी बड्या प्रदूषकांना जबाबदार धरावे, अशी या प्रयत्नकर्त्यांची इच्छा आहे.

सृष्टीसंहाराची ही नवी व्याख्या अर्थातच पर्यावरणरक्षणाच्या एका दीर्घ प्रयत्नाची सुरुवात आहे. सृष्टीसंहार हा आंतरराष्ट्रीय गुन्हा असावा यासाठी गेल्या अर्धशतकापासून प्रयत्न सुरू आहेत. स्वीडनचे त्यावेळचे पंतप्रधान ओलाफ पाल्मे यांनी स्टॉकहोममध्ये १९७२मध्ये मानवी पर्यावरण या विषयावर झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या जागतिक परिषदेत ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती. (याच परिषदेत बोलताना भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण विषयक प्रश्नांचा गरिबीच्या अनुषंगाने ऊहापोह केला होता. त्यांच्या भाषणाने जागतिक स्तरावर होणाऱ्या पर्यावरणविषयक चर्चांना एक नवा पैलू जोडला गेला होता.) आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या स्थापनेच्या वेळेसही सृष्टीसंहाराचा मुद्दा विचारात होता, पण नंतर तो बाजूला पडला. सृष्टीसंहार हा मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा मानला जावा यासाठी स्कॉटिश विधिज्ञ पॉली हिगिन्स अनेक वर्ष एक मोहीम चालवली होत्या. गेल्या चार वर्षांपासून ‘स्टॉप इकोसाइड फाउन्डेशन’ने हा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे.

या मसुद्याचे आंतरराष्ट्रीय कायद्यात रूपांतर होण्यासाठी ‘रोम स्टॅट्यूट’मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या नियमांमध्ये बदल करावा लागेल. आणि त्यानंतर कायद्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू होईल. हा मसुदा जाहीर होण्याच्या दोन आठवडे आधी फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने सृष्टीसंहार हा गुन्हा मानणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली.  मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि साडेचार दशलक्ष युरो इतक्या दंडाची तरतूद या कायद्यात आहे. 

सृष्टीसंहार मानवता विरोधी मानणाऱ्या कायद्याची चर्चा गेल्या अनेक दशकांपासून जगभर सुरू आहे. मात्र संपूर्ण जग पर्यावरणीय संकटाच्या छायेत असताना या नव्या मसुद्यामुळे या चर्चेला एक निश्चित दिशा मिळेल अशी आशा आहे.

संबंधित बातम्या