मनाचिये गुंफी

-
सोमवार, 12 जुलै 2021

संपादकीय

मानवी मनाच्या अथांगतेचा वेध घेण्याच्या प्रयत्नांचा इतिहास खुद्द माणसाइतकाच जुना असणार. मनोव्यापार हे असंख्य गुपितं उलगडणाऱ्या माणसाच्या बुद्धिमत्तेला मिळालेलं विलक्षण गुंतागुंतीचं आव्हान आहे. ‘मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा’ अशा शब्दांत मनाच्या विहरण्याचं म्हणा, भटकण्याचं म्हणा वर्णन करणाऱ्या बहिणाबाई माणसाच्या मनाला ‘प्रत्यक्ष परमेश्वराला जागेपणी पडलेलं स्वप्न’ म्हणतात. अत्यंत कुतूहलाने आपला भवताल टिपण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रांगत्या मुलापासून ते अब्जावधींचे साम्राज्य सांभाळणाऱ्या एखाद्या श्रेष्ठाच्या मनाच्या तळाशी चाललेल्या खळबळीचा नेमका अंदाज घेणं अवघडच, किंबहुना शक्यतांच्या आवाक्यांच्या पलीकडचंच. 

सध्याच्या भांबावलेल्या परिस्थितीने माणसाच्या मनोव्यापारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या मानसशास्त्र विभागातल्या डॉ. महादेव सिंग सेन, डॉ. निष्ठा चावला आणि डॉ. राजेश सागर यांनी त्यांच्या एका शोधनिबंधामध्ये आताच्या परिस्थितीत मानसिक स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे. प्राप्त परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, माध्यमांमध्ये विषाणूमुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीच्या शारीरिक परिणामांची जेवढी चर्चा होते त्या तुलनेमध्ये मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष होते आहे, असे हे संशोधक म्हणतात. या परिस्थितीमध्ये चिंता आणि नैराश्य असे मनोविकार बळावतात हे दाखवणारे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. त्यानुळे हा मुद्दा सहजी नजरेआड करता येणारा नाही. 

नकार ही मनोविकारांबाबत अजूनही आढळणारी एक सार्वत्रिक भावना आहे. आणि ही भावना स्थलकालातीत आहे; धर्म, जात, पंथ, शिक्षण, आर्थिक स्थिती या सगळ्यापलीकडे जाणारी आहे. मानसिक अस्वस्थता, मानसिक आजार, समुपदेशन, काउन्सिलिंग हे शब्द आता परियचाचे असले तरी ते साधारणतः शेजाऱ्याच्या अंगणात असतात; आपल्याबाबतीत असं घडणं शक्यच नाही, असा अनेकांना ठामपणे वाटत असतं. एखादी समस्या मानसिक आजाराशी संबंधित आहे, हे आजारी माणसाच्याच काय पण कित्येकदा त्याच्या/ तिच्या नातेवाइकांच्याही पचनी पडत नाही, अशी परिस्थिती आजही दिसते. स्वतःच्याच मनस्थितीला नाकारण्याच्या प्रयत्नात मग अनेकदा योग्य वैद्यकीय उपचारांऐवजी माणसं गंडेदोरे, बाबा-बुवा-माता, चकचकीत आवरणातून येणाऱ्या झुळझुळीत पण फसव्या मनःशांतीच्या चकव्यांच्या सापळ्यांमध्येही गुरफटत जातात. 

आपत्ती, मग ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित, आणि मानसिक ताणतणावांचा थेट संबंध अलीकडच्या काळात प्रकर्षाने चर्चेत आला तो किल्लारीच्या विनाशकारी भूकंपामुळे. भौतिक पडझडीच्या धक्क्यातून थोडं बाहेर आल्यानंतर भूकंपग्रस्त भागातल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामात असणाऱ्या अनेकांना ही मानसिक पडझडही जाणवू लागली होती. 

गेल्या पंधरा –सोळा महिन्यांच्या काळातलीही मानसिक पडझड अनेक चेहरे घेऊन आपल्यासमोर आली आहे. कधी त्याला आजार भोगण्याचा संदर्भ आहे, कधी आजारामुळे जवळची माणसं गमावण्याचा संदर्भ आहे, कधी आर्थिक अरिष्ट आहे, रोजगाराचे प्रश्न आहेत, शिक्षणातल्या अडथळ्यांमुळे उभे रहाणारे भविष्यातल्या वाटचालीचे प्रश्न आहेत, तर कधी आजूबाजूच्या परिस्थितीने निर्माण केलेली भीती, चिंता, ताण आहे. भूकंपानंतर अनेक महिने कोणताही मोठा आवाज झाला की अनेकांचा जीव घाबरा व्हायचा, महापूर सोसणाऱ्या अनेकांना पडत्या पावसाचा आवाज नकोसा व्हायचा, तसा गेल्या काही महिन्यात रुग्णवाहिकेचा सायरन ऐकला की अनेकांना धडकी भरते. ही तणावाची, पर्यायाने स्वतःला एका कुरतडणाऱ्या परिस्थितीत घेऊन जाण्याची, सुरुवात असू शकते. 

या परिस्थितीत डॉ. सेन, डॉ. चावला आणि डॉ. सागर ही तज्ज्ञत्रयी शरीराबरोबर मनाच्याही ‘स्वच्छते’वर भर देते. ‘बदलणाऱ्या भवतालाबरोबर सातत्याने आणि अत्यंत परिणामकारकरीत्या जुळवून घेता येईल अशा परिस्थितीला प्रोत्साहन देणे आणि ती परिस्थिती कायम राहील या कडे लक्ष देणे,’ अशी या तज्ज्ञत्रयीची मनाच्या स्वच्छतेची, मेंटल हायजिनची, व्याख्या आहे. केवळ सकारात्मकतेला प्रोत्साहित करणे एवढ्यावरच ही मनाची स्वच्छता थांबत नाही तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरणारे मुद्दे ओळखून त्यांना अटकाव करण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, असं या तिघांचं सांगणं आहे. 

दिसेल त्या वाटेने सैरावैरा धावण्याच्या मनाच्या सवयीला आवर घालण्याचा शारीरिक तंदुरुस्तीशीही जवळचा संबंध आहे, असे तज्ज्ञ सांगतात. बदलांना सामोरे जाताना प्रत्येक वेळी, प्रत्येक पिढीला या मानसिक आंदोलनांचा सामना करावा लागला आहे, आणि हा सामन्यात जिंकणे एवढा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. मागच्या अनेक पिढ्यांच्या तुलनेत कदाचित आता आपल्याला असे थोडे अधिक सामने खेळावे लागतील. त्यासाठी लागणारे खंबीर मन बांधण्याची प्रत्येक संधी सजगतेने, आपला आपल्याशी आणि आपला इतराशीही संवाद कायम ठेवून, साधायला हवी. 

संबंधित बातम्या