एक तरी पाऊस अनुभवावा...

-
सोमवार, 19 जुलै 2021

संपादकीय

त्याला पाऊस म्हणा, पर्जन्य म्हणा. वृष्टि, बृष्टी, वर्षा, वर्सा, वर्षाव, वरसात, बरसात, बारीश, मींहुं, बर्साति, मळे... भारतीय भाषांमधल्या कोणत्याही संबोधनाने त्याला बोलवा किंवा तुमतिरो, मो, ईऽऽ, प्लुई, रे ऽऽगन, पीओज्जा, आमे, प्लूवीयाम्मा, दोझ्ट अशा अरेबिक, ब्रह्मी, चिनी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, पोर्तुगीज, रशियन नावाने हाक मारा. तो मृगाचा असो वा हस्ताचा, स्वातीचा वा वळवाचा; आषाढातला असो की श्रावणातला. धुवांधार असो की शिडकावा; पाऊस ही एक विलक्षण घटना आहे. त्याच्या येण्याचीही चर्चा असते आणि न येण्याचीही. तो कधी आधी येतो, कधी अवेळी येतो, कधी लांबतो, कधी रेंगाळतो, कधी मुक्काम ठोकतो, कधी तोंडदेखलाच असतो. पण तो कसाही आला तरी तो एक अनुभव असतो.

भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने म्हणजेच संनयनी क्रियेने वर जाणाऱ्या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्याच जाडीच्या ढगातून होणाऱ्या वर्षणाचा एक प्रकार, म्हणजे पर्जन्य असं रोकड्या शास्त्रीय भाषेत त्याचं जरी वर्णन केलं, तरी पाऊस अनुभवावा तो अनुभव म्हणूनच. स्वतःला त्या अनुभवाच्या स्वाधीन करून! सहज आठवायला बसलं तरी सरींवर सरी कोसळायला लागतात. एका मागून एक. मन गायला लागतं. सौमित्र लिहितात तसे ‘ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात। ऋतू पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात।।’

जीवनाचा आधार असणारं जलचक्र अव्याहत सुरू ठेवणारं पाऊस नावाचं हे रूपक आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपांनी येत असतं. हे अनुभव जितके सार्वत्रिक असतात, तितकेच ते ‘फक्त आपले’ही असतात. मनाशी जोडलेल्या असंख्य रूपांनी पाऊस येत असतो. कधी तो जीवनाधार बनून येतो. तप्त ग्रीष्मानंतर हवाहवासा असणारा गारवा घेऊन येतो, चराचराला शांतवतो. कागदी होड्यांच्या आठवणींनी हरवलेले बालपण जागवतो, आणि एखाद्या धुंद वादळाच्या आठवणींतून निसटलेलं तारुण्यही. तो सृष्टीचक्राला गती देणारं, पृथ्वीला सस्यशालिनी करणारं नवचैतन्य आणतो. कधी त्याचं येणं आणि न येणंही मागच्या जन्मीच्या दावेदारासारखं असतं. कधी तो ‘रेनमेकर’ मधल्या लिझी करीला किंवा ‘थोडासा रूमानी हो जाए’ मधल्या बिन्नीला तिचा आत्मविश्वास मिळवून देणारा ‘स्टारबक’ किंवा ‘ध्रुष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती नीलकंठ बारिशकर’ नावाचा किमयागार होऊन येतो. कधी सखा असतो, कधी हळूवार प्रियकर असतो, कधी नुसताच धसमुसळा! 

एखाद्या वेळी भवताल कुंद असतो, कृष्णमेघांनी झाकोळून गेलेलं असतो. कुठूनशा बेभान वावटळी उठत राहतात, तळाशी साचलेला पाचोळा भिरभिरत वर आणत राहतात. नुसतीच गदगद होत असते. मग एकेक थेंब जाणवायला लागतो. एकामागून एक टपोरे थेंब वाजत गाजत उतरायला लागतात. सरींवर सरी येत राहतात, आणि मग एका क्षणी पाऊस थांबतो. काही वेळापूर्वी दाटून आलेल्या कृष्णमेघांची पांगापांग झालेली असते. भवताल धुऊन निघालेला असतो. त्या वर्षावानंतरही तरंगत राहिलेल्या एखाद्या चुकार ढगाला हलकेच एक सोनेरी किनार मिळते, आणि पाठोपाठ येतो आश्वासक स्वच्छ प्रकाश. बहिणाबाई म्हणतात तसा, ‘शिपडली भुई सारी। धरत्रीचा परमय। माझं मन गेलं भरी।’

अस्तित्वही जाणवू न देणाऱ्या उंच काचांच्या आडून हातातली वाफाळती कॉफी गात्रांमध्ये भिनवून घेत असताना बाहेर कोसळणारा एखादा पाऊस अलिप्त जवळिकीची, डिटॅच्ड् ॲटॅचमेंटची, अनुभूतीही देऊन जात असतो. कोणत्याही नावानी हाकारलं तरी ओलावाच घेऊन येणारी पावसाची ही कहाणी साठा उत्तरांनीच काय कदाचित सहस्र उत्तरांनीही संपूर्ण होणार नसली तरी त्या कहाणीचा प्रत्येक पदर आपल्या सर्वांसाठी ‘शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा’ घेऊन येवो, अशाच शुभेच्छा!

संबंधित बातम्या