विचारपूर्वक स्वीकारलेला रस्ता

-
सोमवार, 26 जुलै 2021

संपादकीय

‘करिअर’ या शब्दाचं मूळ सापडतं ते पंधराव्या शतकातल्या फ्रेंच भाषेत. खरंतर त्याकाळातल्या ‘प्रोव्हेन्सल’, खेडवळ वळणाच्या, फ्रेंचमध्ये. देवनागरीत लिहायचा झाल्यास हा मध्ययुगीन फ्रेंच शब्द ‘कॅरिहा’ असा लिहिता येईल. ‘कॅरिहा’चा शब्दशः अर्थ रस्ता. भाषाशास्त्री ‘काररिया’ या साधारण त्याच काळात प्रचलित असणाऱ्या इंडो-युरोपिअन भाषासमूहातल्या लॅटीन भाषेतल्या वाहनांशी संबंधित असणाऱ्या शब्दाकडेही अंगुलिनिर्देश करतात. रथ अशा अर्थी लॅटीन भाषेत वापरल्या जाणाऱ्या ‘कॅरस’ या शब्दाशीही ‘करिअर’चं नातं सांगितलं जातं. ‘व्यावसायिक किंवा सार्वजनिक जीवन’ हा करिअर शब्दाचा आजचा अर्थ तसा तुलनेने नवाच म्हणावा लागेल. व्युत्पत्तीशास्त्राच्या प्रांतात थोडं डोकावलं तरी ‘करिअर’ या शब्दाने आज ध्वनित होणारा अर्थ एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीइतकाच जुना असल्याचे ध्यानात येते. एकूणच रस्ता, वाहने या कल्पनांच्या साथीने प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ‘करिअर’ या शब्दाचा प्रवास आज अक्षरशः सर्वव्यापी बनला आहे. आज किशोरवयाच्या सुरुवातीला शरीरापासून ते भावविश्वापर्यंत असंख्य बदलांना सामोरं जाणारं मूल आता त्याच्याही नकळत ‘करिअर’ या शब्दाचं बोट धरत असतं. 

पण करिअरचा अर्थ, जगायला आवश्यक ती साधने मिळवून देणारा ‘पोटापाण्याचा’ एक उद्योग एवढ्यापुरताच मर्यादित नव्हे. आपल्याला केवळ पोटापाण्याच्या उद्योगाच्या, रोजगाराच्या कल्पनेपलीकडे नेणाऱ्या अर्थाने ‘करिअर’ या संकल्पनेकडे पाहायला हवे. त्यात जगणं सुकर करण्याचा, आयुष्यात स्थिरावण्याचा आणि त्यासाठी आवश्यक ती साधने मिळवायचा मुद्दा आहेच, पण त्याच्या बरोबरीनेच, किंबहुना काकणभर अधिकच, ते जगणं अधिक अर्थवाही, समाधानी करण्याचा मुद्दा आहे. करिअर नावाचा जगण्याचा रस्ता समजावून घ्यायचा, त्याचं नियोजन करायचं, व्यवस्थापन करायचं ते यासाठीच. म्हणूनच करिअर हा अपघात असत नाही, तर तो विचारपूर्वक स्वीकारलेला रस्ता असतो.

विसावं शतक मैलाचा दगड खराच. या शतकाने दोन महायुद्धे बघितली, साम्राज्यशाहीचा सूर्य मावळताना पाहिला, जगणं बदलणाऱ्या नव्या तत्त्वज्ञानाचा उदय पाहिला, विज्ञानाची दिङ्मूढ करणारी संहारशक्ती पाहिली आणि त्याच विज्ञानाची माणसाच्या प्रगतीला हातभार लावणारी श्रेयस बाजूही बघितली. याच शतकाच्या अखेरीस करिअरच्या व्याख्याही बदलत गेल्या, असंख्य नव्या वाटाही उघडल्या. जगण्याच्या उद्योगाविषयीच्या पारंपरिक कल्पनांना छेद देत अनेक नवे उद्योग उभे राहिले, स्थिरावले, वाढले. निव्वळ ‘वेळ घालवण्याचे’ किंवा लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे’ उद्योग म्हणून संभावना होणाऱ्या अनेक वाटा करिअरच्या वाटा ठरू लागल्या. त्या वाटा नुसत्याच अनवट न राहता त्या वाटांवर प्रवास करण्याचेही शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम निर्माण झाले. अशा अनेक नव्या वाटा, स्टार्टअपच्या रूपाने येणाऱ्या नव्या कल्पना आता जाणीवपूर्वक स्वीकारल्या जाताहेत. प्रसंगी वयाची, अनुभवाची ओझी बाजूला सारली जाताहेत. 

करिअर ही कल्पना यश, समाधान, संपन्नता अशा एकचएक व्याख्या नसणाऱ्या कल्पनांशी जोडलेली असली तरी एका पातळीवर ती शोधयात्राही आहे. करिअर आपल्याला आपल्याआपल्या व्याख्यांशी जोडलेल्या यश, समाधान, संपन्नतेकडे नेत असताना; त्या प्रवासात आपल्या ज्ञानाचा, कौशल्यांचा पुनर्विचार आहे, ज्ञान आणि कौशल्यांबरोबरच कार्यक्षमताही आणखी उंचावण्याचा प्रयत्नही आहे.

आज बदलांचा वेग वाढलेला असताना वेगवेगळ्या ज्ञानशाखांविषयी, सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विविध ज्ञानशाखांच्या समन्वयाविषयी आणि त्यातून खुल्या होणाऱ्या करिअरच्या वाटांविषयी योग्य माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता वारंवार अधोरेखित होते आहे. माहितीच्या महापुरात नेमकी दिशा कळण्यासाठी नेमकी माहिती हाताशी असणे महत्त्वाचं ठरतं. दहावी- बारावीचा टप्पा नव्याने ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने आपल्या हातात असलेल्या ‘सकाळ साप्ताहिक’च्या करिअर विशेषांकातील तज्ज्ञांचे लेख काही क्षेत्रांबाबतचा हा नेमकेपणा आपल्यापर्यंत निश्चितच पोचवतील. त्याचबरोबर जुन्या-नव्या दिशा स्वीकारताना आचार-विचारांची दिशा काय असावी, या बद्दलही हे तज्ज्ञ आपल्याशी संवाद साधतील. गेल्या पंधरा-सोळा महिन्यांतल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, लक्ष्याचा शोध घेणाऱ्या आणि लक्ष्यावरचे आपले लक्ष विचलीत होऊ न देता मार्गक्रमण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या लेखांचा उपयोग होईलच, पण आपल्या मनाचा कौल घेत लक्ष्य बदलू पाहणाऱ्या किंवा परिस्थितीने लक्ष्य बदलायला भाग पडलेल्यांनाही या लेखांचा आधार मिळेल.

दहावी आणि बारावीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडत करिअरच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि करिअर या कल्पनेकडे नव्याने पाहू इच्छिणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

संबंधित बातम्या