जळके बी.ए.

-
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

संपादकीय

आजी-आजोबा होण्याच्या वयात असलेल्या सध्याच्या पिढीतल्या सदस्यांनी त्यांच्या आजी-आजोबांकडून ही गोष्ट ऐकली असण्याची शक्यता आहे. ‘जळक्या बी.एं’ची! बॅचलर्सची पदवी मिळवणं आणि त्यातही ऑनर्ससह ही पदवी मिळवणं, ही ‘उल्लेखनीय अचिव्हमेंट’ असण्याच्या काळातली गोष्ट आहे ही. कोणत्याशा विद्यापीठात बी.ए. फायनलच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर म्हणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, आणि त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला. यावर भरपूर खल झाला आणि अखेरीस त्यावर्षी फायनलला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पास करून त्यांना पदवी देण्याचा निर्णय झाला. पेपर जळाल्यामुळे त्यांनी पेपरात किती आणि काय लिहिले आहे, याची शहानिशा न होताच त्यांना पदवी मिळाली. खरंतर दोन पदव्या मिळाल्या. एक विद्यापीठाने दिली आणि दुसरी लोकांनी - ‘जळके बी.ए.’ त्यांची वेळ चुकली होती, एवढा एकच मुद्दा वगळला तर त्या विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना ती दुसरी पदवी आयुष्यभर वागवावी लागली.

हा किस्सा आठवायचे कारण म्हणजे कोविड महासाथीचे वेगवेगळ्या क्षेत्रांवर झालेले, होत असलेले परिणाम आता वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत आहेत; आणखी काही काळ हे होत राहणार. गेल्या पंधरा-सोळा महिन्यांत परवलीचा शब्द बनलेल्या ‘न्यू नॉर्मल’च्या ह्या वेगवेगळ्या आविष्कारांमधून कोणाच्याच भविष्याची वाट लागणार नाही, अशा बेताने वाट काढायची आहे, हे वारंवार अधोरेखित करणारी ही स्थिती आहे.

परीक्षा व्हाव्यात की नाही, झाल्या तर कशा व्हाव्यात, परीक्षा होणारच, परीक्षा नकोतच, मग पास-नापास कसं ठरवायचं असा प्रचंड गदारोळ झाल्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी –बारावीच्या आणि त्याही पलीकडच्या परीक्षांची निकालांनी एकूण व्यवस्थेच्याच शहाणीवेवर बोट ठेवले आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीतला निकाल अशी केवळ या वर्षीच्या निकालाची संभावना करून भागणार नाही. बदलत्या काळाच्या गरजांचा वेध घेत शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या वाटा धुंडाळण्याबद्दल आपल्याला वाटणाऱ्या आपल्याच अभिमानालाच प्रश्न विचारणारी परिस्थिती आपल्यासमोर उभी ठाकली आहे, याचे भान ठेवून आता आपल्या एकूण शिक्षणव्यवस्थेला हालचाल करावी लागणार आहे.

आपली संपूर्ण शिक्षणपद्धती अधिकाधिक परीक्षाकेंद्री होते आहे, अशी चर्चा गेल्या काही पिढ्या तरी करत आहेत. शिकविण्याच्या पद्धतींपासून ते मूल्यमापनाच्या पद्धतींपर्यंत शिक्षणाच्या अनेक पैलूंविषयी चर्चा झडत असल्या, काही बदल होत असले तरी त्या बदलांचा वेग आणि जगण्याच्या गरजा भागविणाऱ्या परिस्थितीत होणाऱ्या बदलांचा वेग याचा ताळमेळ घालण्याचं आव्हान आपण अजूनही पुरेशा सक्षमपणे स्वीकारू शकलेलो नाही, हे वास्तव शिल्लक आहेच.

या वर्षीच्या निकालांनी या उणिवेवर नेमकं बोट ठेवलं आहे. परीक्षाच नकोत हा वरवर सोपा वाटणारा मार्ग स्वीकारताना आपण नकळत मूल्यमापनच नाकारण्याच्या स्थितीकडे जातो आहोत का, यावर जशी आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, तशी ती मूल्यमापनाच्या पद्धतींचाही विचार करण्याची आहे. आपल्या मुलांनी मूळ संकल्पना, मूळ विषय समजावून घ्यावेत की ‘परीक्षा देण्याचं तंत्र’ शिकावं याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे, आणि तो करताना; विचारांती कराव्या लागणाऱ्या बदलांच्या वेगाचा, परिस्थितीत होणाऱ्या बदलांच्या वेगाशी मेळ घालण्यासाठी आवश्यक ती लवचिकता सांभाळण्याचे आव्हान आता धोरणकर्त्यांसमोर आहे.

गेल्या वर्षी कोविडमुळे ठाणबंदी स्वीकारावी लागली तेव्हा सर्वसाधारण बहुतेक शैक्षणिक प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाला आधीच्या कामगिरीचा आधार मिळू शकला. मात्र त्यानंतरच्या काळात कोरोनाला सोबत घेऊन जगायची भाषा करताना शैक्षणिक मूल्यमापनाचे नेमके काय करायचे हा प्रश्नच मुळी व्यवस्थेला परीक्षा घेण्याची वेळ येईपर्यंत जाणवला नाही, किंवा ज्या पातळ्यांवर त्यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा होता तिथे तो झाला नाही, असेच चित्र आहे. 

शिक्षणसातत्य आणि मूल्यमापनाच्या बाबतीत आपल्या समोर ज्या समस्या आहेत तशाच त्या थोड्या फार फरकाने जगात अन्यत्रही आहेत. संपन्न समजल्या जाणाऱ्या व्यवस्थांनाही या प्रश्नांनी ग्रासले आहे, तेथेही त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोविड-१९ आणि आता त्याची बदलती रूपे ही ‘फोर्स मॅश्यॅ’, अतर्क्य परिस्थिती, आहे हे मान्य केल्यानंतरही कोविड ही इष्टापत्ती मानून वर्षाअखेरीला प्रत्येक विषयाची केवळ एक एक प्रश्नपत्रिका सोडवून मिळवलेल्या किंवा पदरात पडलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची पात्रता जोखण्याच्या सध्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सातत्यपूर्ण मूल्यमापनाकडे नेण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. म्हणजे भविष्यात कोणाच्याच वाट्याला ‘जळक्या बी.ए.’ सारखी ‘पदव्युत्तर पदवी’ येणार नाही.

संबंधित बातम्या