हत्तींचे उत्तरायण

-
सोमवार, 23 ऑगस्ट 2021


संपादकीय

संपूर्ण मानवजातीला वेठीला धरणाऱ्या कोरोना महासाथीच्या उद्रेकाच्या काळातच वन्यप्राणी संशोधकांना गोंधळात टाकणारी आणखी एक घटना चीनमध्येच घडत होती; किंबहुना अजूनही घडते आहे. दक्षिण चीनमधल्या युनान प्रांतातून उत्तरेकडे काहीशे किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या हत्तींचा कळप परत फिरला आहे. गेल्या आठवड्यातली, दहाव्या जागतिक हत्ती दिनाच्या आसपासचीच ही घटना. मात्र नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून वाटेतल्या गावा-शहरांमधल्या रहिवाशांच्या उरात धडकी भरवणाऱ्या हत्तींच्या प्रवासावर अजूनही पडदा पडलेला नाही. पण पुढच्या काही आठवड्यांत हत्तींचा हा कळप शिश्वांगबॅना राष्ट्रीय उद्यानातल्या आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे परतेल, अशी आशा हत्तींच्या या ‘न भूतो...’ अशा भरकटण्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना वाटते. 

गेल्यावर्षी मार्चच्या मध्यात जगभरातील माणसं कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात स्वतःला घरात बंद करण्याच्या खटपटीत असताना, चौदा हत्तींचा एक कळप शिश्वांगबॅनाच्या वर्षावनातून बाहेर पडला. म्यानमार, लाओस आणि चीनच्या सीमा जिथे मिळतात त्या प्रदेशातल्या अत्यंत घनदाट वर्षारण्यातून या हत्तींनी प्रस्थान ठेवले थेट उत्तरेकडे. युनानच्या अरण्यातल्या एकाही हत्तीने या आधी केला नव्हता इतका प्रवास या हत्तींनी गेल्या सतरा महिन्यांमध्ये केला आहे.

सुरुवातीला या हत्तींकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. पण आठवडेच्या आठवडे या कळपाचा उत्तरेकडचा प्रवास सुरू राहिल्यावर मात्र यंत्रणा खडबडून जागी झाली. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा वापरून या कळपाच्या चालीचा मागोवा घ्यायला सुरुवात झाली, आणि हे हत्ती पाचएकशे किलोमीटरची वाट अक्षरशः तुडवत असताना या नवलाईच्या प्रवासाचा अभ्यासही सुरू झाला. बीबीसीने अलीकडेच दिलेल्या एका वृत्तानुसार हत्तींचा हा कळप आता पुन्हा दक्षिणेकडे फिरला आहे आणि त्या कळपाला शिश्वांगबॅनाकडे नेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या सतरा महिन्यांपासून विविधांगाने उलगडत जाणाऱ्या या हत्तीकथेला वातावरणातील बदलांपासून अनेक पदर आहेत. मधेच मागे फिरलेले दोन नर हत्ती आणि बहुधा चालण्याच्या अतिश्रमामुळे थकून गलितगात्र झालेल्या आणखी एका हत्तीचा अपवाद वगळला तर सगळा कळप हा सगळा काळ एकमेकाला धरून चालतो आहे. (हत्तींच्या मागावरच असणाऱ्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने त्या थकलेल्या हत्तीला ट्रकात घालून पुन्हा शिश्वांगबॅनात आणून सोडले आहे.) तीन भिडू गळाले तरी या प्रवासात कळपात दोन पिलांची भरही पडली. या कळपाला जवळपास सेलेब्रिटी स्टेटस मिळाले. युनानच्या वर्षावनातून कुनमिंगच्या थंडीत गेलेल्या या हत्तींमुळे वाटेतल्या जवळजवळ दीड एक लाख लोकांना हलवावे लागले आणि अंदाजे दहा लाख डॉलर किमतीच्या पिकांचे आणि माणसांच्या इतर मालमत्तेचे नुकसानही झाले.

‘वॉन्डरिंग एलिफंट्स _भटके हत्ती’ आता त्यांच्या मूळ निवासस्थानाकडे परत फिरले असले तरी ते सरळ शिश्वांगबॅनाचीच वाट धरतील, किंवा पुन्हा भटकणार नाहीत याची खात्री वन्यजीव तज्ज्ञांना अजूनही देता येत नाहीये.

संशोधकांच्या दृष्टीने हत्तींची ही इतक्या दीर्घ पल्ल्याची चाल गोंधळात टाकणारी आहे. युनानच्या या भटक्या हत्तींविषयी जो काही अभ्यास गेल्या सतरा महिन्यांमध्ये झाला आहे त्यानुसार खाण्याच्या शोधात हा कळप बाहेर पडला असावा. हत्ती बाहेर पडले त्याच्या वर्षभर आधीपासून युनान प्रांत एका भीषण दुष्काळाला तोंड देतो आहे. दुष्काळाबरोबरच वृक्षतोड आणि अधिकाधिक प्रमाणात शेतीखाली येणाऱ्या जमिनीमुळे होत असलेली अरण्याची हानी अशांसह अन्य काही कारणं या भटकण्यामागे असावीत, असे संशोधकांना वाटतं आहे.

यावर आणखी अभ्यास होईलही. पण चीनमधल्या भटक्या हत्तींची गोष्ट जगभरातल्या सगळ्याच प्राण्यांची गोष्ट आहे. वन्यजीव संवर्धनाचे जे काही प्रयत्न माणूस करतो आहे, त्या प्रयत्नांना मिळणाऱ्या यशाचा वेग आणि माणसाच्याच करणीमुळे वन्यप्राण्यांचे अधिवास आक्रसत जाऊन जगण्याच्या संघर्षात होत जाणाऱ्या वाढीचा वेग यांचं प्रमाण कायमच व्यस्त राहिले आहे. परिणामतः अगदी आपल्या परसापासून ते जगभरात सगळीकडेच माणूस आणि वन्यप्राण्यांमधलं नातं ताणलं जातं आहे. या पार्श्वभूमीवर जैवविविधतेच्या संवर्धनाच्या प्रवासाचा विचार करताना चीनमधल्या भटक्या हत्तींची दीर्घ पल्ल्याची चाल समजावून घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या