शाळा 2.0 किंवा आणखी कितीतरी

-
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

संपादकीय

मोठा काही अडथळा उभा राहिला नाही तर सोमवारपासून शाळा सुरू झालेल्या असतील. गेल्या अठरा महिन्यांतल्या कठीण दिवसांतला अगदी थोडा काळ वगळला तर गेल्या वर्षी वार्षिक परीक्षांच्या काळातच बंद पडलेल्या शाळा आता पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने गजबजणार आहेत. या मधल्या काळात असंख्य गोष्टी घडून गेल्या आहेत. संपूर्ण जगणं ढवळून काढणाऱ्या या परिस्थितीत राज्यभरातल्या शिक्षकांनी, त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अत्यंत अवघड मनःस्थितीचा सामना करत, तांत्रिक, आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक अडचणींना तोंड देत, शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला, शिक्षणाची गंगा वाहती ठेवली.

गेल्या काही आठवड्यांपासून विविध पातळ्यांवर शाळा पुन्हा उघडण्याबाबत चर्चा सुरू होती. कोविड-१९ नावाच्या दृष्टीलाही न पडणाऱ्या विषाणूनी जगात माजवलेल्या उत्पाताचे परिणाम संपूर्ण मानवजातीला पुढची काही वर्षे सोसावे लागणार आहेत. कोविडने जागतिक अर्थव्यवस्थेवर, उद्योग-व्यवसायांवर जेवढे गंभीर परिणाम केले आहेत, तेवढेच गंभीर परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाले आहेत. कोविड-१९ आणि त्याच्या वेगवेगळ्या रूपांचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. अजूनही देशाच्या विविध भागांतून, परदेशातून येणाऱ्या कोरोना उद्रेकाच्या बातम्यांचे येणे पूर्णपणे थांबलेले नाही. 

शाळा सुरू कराव्यात, किंबहुना त्याबाबतीत मुलांच्या भविष्याचा, त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरील विकासाचा विचार करून काही ना काही तोडगा काढावा यावर जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांचे, शिक्षणाविषयी आस्था असण्याऱ्या प्रत्येकाचेच एकमत होते. तरीही कोरोनाच्या महासाथीने प्रत्येकाच्याच मनात पेरलेल्या अदृष्टाच्या भीतीचा विचार करता हा निर्णय तितका सोपाही नव्हता.

‘न्यू नॉर्मल’ या आता जुन्याही झालेल्या कल्पनेच्या राज्यात कोरोनाबरोबर जगताना, आणि त्याचाच भाग म्हणून आता कोरोनोत्तर जगात शाळेचा उंबरा पुन्हा ओलांडताना, अन्य सर्व व्यवहारांप्रमाणेच शिक्षण आणि शाळा -महाविद्यालयांच्या पातळीवरही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ही आव्हाने लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातली अनेक मंडळी शिकणे आणि शिकवणे या दोन्हींमध्ये होणाऱ्या स्थित्यंतराचा विचार करताना दिसत आहेत. बदललेल्या परिस्थितीत आता सुरू होत असलेला शालेय शिक्षणाचा नवा अध्याय हा नव्या आव्हानांचा, पर्यायाने नव्या कल्पनांचा, नव्या प्रयोगांचा असणार आहे, याबद्दल जाणत्यांच्या मनात शंका नसल्याचे विविध पातळ्यांवर केलेल्या चर्चांमध्ये जाणवले.

गेल्या अठरा महिन्यांत शिक्षकांनी तंत्रज्ञान स्वीकारले. ऑनलाइन शिक्षणाचे केवळ व्याख्यानांच्या पलीकडे जाणारे प्रयोग केले, इंटरनेटवर उपलब्ध असणारे शैक्षणिक साहित्य शोधून मुलांपर्यंत पोचवले, कम्युनिटी रेडिओचा वापर केला. लांबवर कुठेतरी बसून एखाद्या तज्ज्ञाने त्याच्या विषयावर व्याख्यान द्यावे आणि त्या विषयात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून ऐकावे, ही फक्त उच्च शिक्षणात, तेही फक्त विशिष्ट विशेष विषयांच्या बाबतीतच होऊ शकेल अशी कल्पना असणारी घटना रोज घराघरात घडू लागली. अडखळत का होईना पण शाळेतलं शिकणं सुरू राहिलं. पण या सगळ्या काळात अन्य काही बाबीही सामोऱ्या आल्या. शैक्षणिक मूल्यमापनातील त्रुटी लक्षात आल्या, तंत्रज्ञानाचे वापरकर्ते म्हणून, बदलांचा स्वीकार करणारे म्हणून आणि जीवनपद्धती म्हणून आपण नेमके कुठे उभे आहोत याचा अंदाज आला. ‘डिजिटल डिव्हाईड’ची संकल्पना तंत्रज्ञान वापरकर्त्यांमधल्या ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’च्या रूपाने नव्याने पुढे आली. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही उपलब्ध असणाऱ्या सुविधांमधली दरी पुन्हापुन्हा स्पष्ट होत गेली. ही दरी भरून काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी पुन्हा समजून घ्यावी लागेल, असेही काही शिक्षकांना वाटते. 

हे सगळे अनुभव, विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्येही झालेले बदल समोर ठेवून आता शालेय शिक्षणाचा नव्याने श्रीगणेशा करावा लागणार आहे. मार्च २०१९मधले शिक्षक व विद्यार्थी आणि ऑक्टोबर २०२१मधले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात काही बदल घडून गेले आहेत, हे मान्य करूनच आता पुढे जावे लागेल. मुलांशी खूप बोलत राहावे लागेल, शिकविण्याच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतींचा सुयोग्य वापर करावा लागेल. हे करताना त्यांना मोबाइलच्या स्क्रीनकडून पुन्हा पुस्तकांच्या पानांकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मुलांनी शाळेचं वातावरण, मित्रमंडळी हे ‘मिस’ केलंय, हे खरं असलं तरी शाळेत जाण्याची म्हणून एक शिस्त असते ती पुन्हा परत आणावी लागेल.
शाळा पुन्हा सुरू होत आहेत, ह्या घटनेचे हे फक्त काही पदर आहेत. प्रत्यक्ष अनुभवातून याचे आणखी पैलू सामोरे येतीलही. त्याचे भान आता या बदललेल्या परिस्थितीत शिक्षण व्यवस्थेला, शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही ठेवावे लागणार आहे.

संबंधित बातम्या