नवं कॅलेंडर

-
सोमवार, 20 डिसेंबर 2021

संपादकीय

नव्या वर्षाचं नवं कॅलेंडर यायची वेळ आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. खरंतर कशाचाही नव्यानं किंवा पुन्हा नव्यानं प्रारंभ होणं हीच भावना सुखावणारी असते. नवं वर्षही असंच असंख्य वेगवेगळ्या गोष्टी (नव्यानं) आणत असतं. 

गेल्या दशकांमध्ये आपण असंख्य बदलांना सामोरे गेलो. तसं पाहिलं तर बदल आणि मनुष्यप्राण्याचं नातं माणसाच्या जन्मापासूनचं आहे. आपल्या राहणीमानापासून ते खाण्यापिण्याच्या सवयींपर्यंत आपण बदलत गेलो. पण बदलांच्या या सगळ्या प्रवासात काही गोष्टी मात्र टिकून राहतात. त्यापैकीच एक म्हणजे नव्या वर्षाबरोबर येऊन घराघरांत भिंतींवर लटकणारी कॅलेंडरं. बदलांच्या रेट्यात कॅलेंडरंही अंतर्बाह्य बदलली! आता काय हातातल्या मोबाईल फोनपासून ते रोजच्या वापरातल्या डेस्कटॉप, लॅपटॉप आणि पामटॉपपर्यंतच्या सर्व पडद्यांवर चालू दिवसापासून ते गत शतकातल्या एखाद्या दिवसापर्यंतची हवी ती माहिती क्षणार्धात पुरवणारी कॅलेंडरं आणि पंचांगं उपलब्ध असतात त्यामुळे त्यांच्या येण्याचं आता फारसं कौतुक फारसं राहिलं नाही, असंही कोणाकोणाचं मत पडेल. पण तरीही घराघरातल्या भिंतींवरचं त्याचं येणं फारसं बदलेलं नाही. अजूनही नव्या वर्षाबरोबर नव्या वर्षाचं कॅलेंडरही घरात येतं आणि जुन्याची जागा घेतं.

कधी काळी एखादं कॅलेंडर घरात असणं हा ‘स्टेटस’चाही भाग असायचा. घराच्या बसाउठायच्या खोलीत, हॉल किंवा दिवाणखान्यात म्हणूया हवंतर, कोणतं कॅलेंडर लटकतं आहे, यावरूनही घरधन्याच्या ओळखीपाळखींचा आणि क्वचित अभिरुचीचाही अंदाज येत असे. काही कंपन्यांचा आणि आपला अन्य काही कारणांनी संबंध येण्याची सुतराम शक्यता नसली तरी त्या कंपन्यांची दरवर्षी प्रसिद्ध होणारी अशी खास कॅलेंडर मिळवण्याची धडपडही असायची. सहज आठवायला बसलं तरी आपल्यापैकी प्रत्येकालाच असं धडपडून, अगदी ओळखीपाळखी पणाला लावून मिळवलेली कॅलेंडरं आठवतील. (काही कंपन्यांची कॅलेंडरं तर त्यासाठी होणाऱ्या फोटोशूटच्या ‘सुरस आणि चमत्कारिक या सदरात मोडणाऱ्या चर्चांमुळेच अधिक कुतूहलाचा विषय ठरत असत. आणि त्या फोटोशूटसाठी निवड होणे हादेखील मॉडेलिंगच्या जगातला एक मैलाचा दगड असायचा.) असं एखादं कॅलेंडर आपल्या घरी येतं आणि घराची शोभा वाढवतं हादेखील (निदान वर्ष आणि कॅलेंडर नवीन असेपर्यंत तरी) ‘ओनर्स प्राइड अॅण्ड नेबर्स एन्व्ही’चा भाग असायचा. 

घरातल्या खोल्यांप्रमाणे कॅलेंडरांचं रूपडंही बदलत जातं. हॉलमध्ये असं एखादं ‘विशेष’ आकर्षक कॅलेंडर, स्वयंपाकघरात प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणारं. सुट्या, उपास-तापास, जत्रा-यात्रा या सगळ्यांची माहिती देणारं कॅलेंडर, घरातल्या मंडळींना वेगवेगळ्या खोल्या असण्याची चैन करू देणारं घर असेल तर त्या खोलीच्या भिंतींवरची कॅलेंडरं खोलीच्या मालकाच्या मूडला साजेशी.

अशी भिंतींवर लटकणारी कॅलेंडरं घरात यायला कधी सुरुवात झाली त्याचे तपशील मात्र नक्की सापडत नाहीत. पण फारतर शतकभरापूर्वीचा मामला असणार. काही दशकांपूर्वीच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये नायक-नायिका कॅलेंडरवर खुणाबिणा करून ठेवायचे, असे उल्लेख वाचायला मिळतात. चित्रपटात दोन घटनांच्यामध्ये किती काळ लोटला हे सूचित करण्यासाठी भिंतीवरच्या कॅलेंडरची फडफडणारी पानं किंवा पडद्यावर वेगाने बदलणाऱ्या तारखा हा अजूनही हातखंडा प्रयोग आहे.

जनसंपर्कासाठी कॅलेंडर वापरण्याची कल्पना मार्केटिंगच्या असंख्य कल्पनांप्रमाणे बाजाराची गरज म्हणून आलेली असणार. त्यातही असंख्य बदल होत गेले. भिंतीवरची कॅलेंडरं टेबलावरही आली. वर्षातले बाराही महिने दाखवणाऱ्या कॅलेंडरांपासून ते जो तो दिवस दाखवणाऱ्या कॅलेडरांपर्यंत प्रकार आले. कधीकाळी कोणत्यातरी छोट्यामोठ्या खरेदीवर भेट म्हणून मिळणाऱ्या कॅलेंडरांभोवती गेल्या पाचएक दशकांमध्ये महिना-दोन महिनेच भरात असणारा पण मोठी उलाढाल असणारा उद्योग उभा राहिला आहे. आजही ई-कॉमर्स साइट्‍सवर सहज चक्कर मारली तर चाळीस रुपयांपासून काहीशे रुपयांपर्यंतच्या कॅलेंडरं पाहायला मिळतात. 

देवादिकांच्या, समाजाचे आदर्श असणाऱ्या स्त्री-पुरूषांच्या, चाहत्यांच्या गळ्यातले ताईत असणाऱ्या अभिनेत्यांच्या आकर्षक चित्रांच्या, छायाचित्रांपलीकडे जात कॅलेंडर माहितीबरोबरच रंजनाचे माध्यमही ठरले आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांनी, संघटनांनी लोकांपर्यंत पोचण्यासाठी कॅलेंडरांचा वापर केला आहे. कॅलेंडरच्या मागच्या पानावर नामवंतांच्या लिखाणापासून ते रेल्वे, एसटीची वेळापत्रकं, रेसिपीज्, घरातल्या छोट्या छोट्या कामांसाठी लागणारे सल्ले इथंपासून ते विविध कलापरंपरा, जग बदलणारे वैज्ञानिक शोध, त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांची छोटेखानी चरित्रांपर्यंत नानाविध विषय मांडणारी कॅलेंडर आजही तेवढीच ताजी वाटतात.

भिंतींवर लटकणारी कॅलेंडरं वर्षातल्या जाणाऱ्या प्रत्येक दिवसांबरोबर जुनी होत जात असली तरी थेट नियोजनाशी संबंध असल्याने, आपल्या नित्यक्रमातलं कॅलेंडर या संकल्पनेचं महत्त्व मात्र अबाधित असतं. प्रत्येक गोष्टींचं आपलं आपलं एक कॅलेंडर असायला हवं, आणि ते आपणच बनवायला हवं, याला कधीच पर्याय नव्हता, आजही तो नाही.  काळ-काम-वेगाशी नातं ठेवण्याची आठवण सतत करून देत राहणारं हे कॅलेंडर फॉलो करणं मात्र जमलं पाहिजे.

संबंधित बातम्या