नवे वर्ष, नवे रूप...

-
सोमवार, 3 जानेवारी 2022

संपादकीय

आज नववर्षदिनी ‘सकाळ साप्ताहिक’चा नवा अंक, नव्या रूपात, काही नव्या लेखकांच्या नव्या विषयांसह आपल्या हातात येतो आहे. गेल्या साडेतीन दशकांमध्ये ‘सकाळ साप्ताहिक’ने मराठी वाचणाऱ्या जगभरातल्या वाचकांवर आपली एक छाप उमटवली आहे. जगभरात घडणाऱ्या घटनांचा अर्थवाही मागोवा घेण्यापासून ते विज्ञान, तंत्रज्ञान, शारीरिक-मानसिक आरोग्य, फॅशन, इतिहास, साहित्य व्यवहार-चित्रपट-नाटक-कला, करिअर, पर्यटन, खाद्यसंस्कृती, विविध क्षेत्रांमध्ये होणारे नवे प्रयोग अशा कुटुंबातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडींना स्पर्श करणारे विषय हे ‘सकाळ साप्ताहिक’चे वैशिष्ट्य. ‘सकाळ साप्ताहिक’ने वेगळे, चाकोरीबाहेरचे विषय जसे हाताळले तसेच या पस्तीस वर्षांमध्ये अनेक नव्या लेखकांना लिहितेही केले. 

एकविसाव्या शतकातलं हे बाविसावं वर्ष सगळ्या जगाच्या दृष्टीनेच अनेक आशा घेऊन येतं आहे. अजूनही अनिश्चिततेच्या सावटाखाली असताना आपण सगळेच आता त्या अनिश्चिततेतूनच पुन्हा नवे मार्ग शोधण्याच्या खटपटीत आहोत. खरंतर उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचा पहिला किरण एक नवा प्रकाश घेऊन येत असतो. पण आजच्या या नव्या दिवसाला आणखी एक विशेष अर्थ आहे, अनिश्चिततेच्या हातात हात घालून वेगाने बदलत्या जगाशी जुळवून घेताना पुन्हा स्वतःचा शोध घेण्याच्या प्रयत्नांचा.

या प्रवासात आपल्याबरोबर राहण्याचा ‘सकाळ साप्ताहिक’चा प्रयत्न आहेच. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आरोग्यापासून ते उत्तम राहणीपर्यंत आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांबद्दलची योग्य ती माहिती, तज्ज्ञांची मते आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी, जोडीला ताणतणाव थोडे हलके करून आपल्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी ‘सकाळ साप्ताहिक’ या अंकापासून आपल्यासाठी काही नवीन सदरे घेऊन येत आहे.

जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचे रसग्रहण करणारी ‘...मौसम है क्लासिकाना’ ही मालिका अजूनही ‘सकाळ’च्या वाचकांच्या स्मरणात आहे. प्रवीण टोकेकर यांच्या या मालिकेने अल्पविराम घेतल्याला आता काही वर्षे होऊन गेल्यानंतरही ‘सकाळ’चे वाचक या लेखमालेची चौकशी करीत असतात. वाचकांच्या आग्रहावरून या वाचकप्रिय मालिकेचा आणखी एक भाग ‘..मौसम है क्लासिकाना 2.0’ या वर्षी आपल्या भेटीला येत आहे. 

जगाच्या इतिहासाकडे एका चिकित्सक नजरेने पाहताना इतिहासाचा आंतरविद्याशाखीय वेध घेणारी लेखमाला लिहिताहेत ज्येष्ठ संशोधक-लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे. इतिहासक्रमात आजचे जग कसे घडले? आजचे जग कसे आहे व ते तसेच का आहे? त्याचे भवितव्य काय असू शकते? अशा मुद्द्यांची चर्चा करताना ही मालिका इतिहासाच्या नजरेतून वर्तमानाचा एक विस्तृत पट उलगडत नेईल.

मेंदू, मज्जारज्जू आणि मणका हे माणसाच्या शरीराचे महत्त्वाचे भाग. मानवी मज्जासंस्थेच्या संशोधनाचा इतिहास हा एखाद्या सस्पेन्स सिनेमापेक्षासुद्धा अधिक रोमांचक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही शतकांमध्ये झालेल्या संशोधनामुळे मानवी मज्जा संस्थेविषयीच्या ज्ञानामध्ये अत्यंत मोलाची भर पडली आहे. या संशोधनामागच्या अतर्क्य वाटू शकणाऱ्या घटना आणि त्या घटनांची उकल करण्यासाठी विविध व्यक्तींनी घेतलेले परिश्रम याबद्दल लिहिणार आहेत  तज्ज्ञ न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ.

कथा हा ‘सकाळ साप्ताहिक’च्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर पुन्हा येताना योगिनी वेंगुर्लेकर यांची एक दीर्घकथा ‘पावसाचा काही नेम नाही’ या अंकापासून  क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. ‘सकाळ साप्ताहिक’चं वैशिष्ट्य असणारी कथा स्पर्धाही यावर्षीपासून पुन्हा सुरू करण्याचा मानस आहे. 

या शिवाय नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांचे जगातल्या महत्त्वाच्या राजधान्यांविषयीची नगररचनेच्या मुद्द्यांवर चर्चा करणारे सदर; अरण्यवाचनातले  थ्रील उलगडणारी विश्वास भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची लेखमाला,  विज्ञान संशोधनात अग्रेसर असणाऱ्या देशातील संशोधन संस्थांची ओळख करून देणारी सुधीर फाकटकर यांची मालिका ही या नव्या वर्षातील ‘सकाळ साप्ताहिक’ची आणखी काही वैशिष्ट्ये.

अर्थातच ही यादी पूर्ण नाही. आणखीही काही नवी सदरे, नवे विषय आपल्या भेटीला येणार आहेतच. त्याबद्दल वेळोवेळी बोलूच.

आरोग्य, अर्थकारण, फॅशन, मनोरंजन, रेसिपीज्, भटकंती या विषयांवरील ‘सकाळ साप्ताहिक’ची वाचकप्रिय सदरे या वर्षीही सुरू राहणार आहेतच.  

‘सकाळ साप्ताहिक’चे नवे स्वरूप, त्यातील नवे विषय, नवे प्रयोग आपल्याला कसे वाटले ते आम्हाला आवर्जून कळवा. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

‘सकाळ साप्ताहिक’चे सर्व वाचक, विक्रेते आणि जाहिरातदारांना नव्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संबंधित बातम्या