मुलेही निर्णय घेऊ शकतात! 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

संपादकीय

प्रत्येक पालकाला आपल्या मुलीचे किंवा मुलाचे भलेच झालेले बघायचे असते. त्यामुळेच अनेकदा या मुलांची नको इतकी काळजी घेतली जाते. प्रत्येक निर्णय अनेकदा पालकांनाच घ्यायचे असतात. पण अशावेळी एक मूलभूत गोष्ट ते विसरतात, की काळ बदलला आहे. त्या बदललेल्या काळाशी सुसंगत आपल्या मुलांना राहायचे आहे अन्यथा ते कालबाह्य ठरतील.. आणि या काळाची पावले आपल्यापेक्षा जास्त चांगली हीच मुले ओळखू शकतात....

खरे तर महिलाही निर्णय घेऊ शकतात, असे सांगण्याची गरज नाही. पण आपल्याकडे हे सांगण्याची नक्कीच गरज आहे. कारण बायकांना काय विचारायचे? त्यांना काय मत असते? घरातील पुरुष मंडळी सांगतील तसे त्यांनी वागायचे. स्वतःची (नसलेली) अक्कल चालवायची नाही.. असे बहुतांश लोकांच्या मते ठरलेले असते. अनेक बायकांनाही ते मान्य असते किंवा करावे लागते. पण प्रकरण थोडे वेगळे असले, तरी प्रौढ, सज्ञान मुलीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. 

तिरुअनंतपुरममधील एका महिलेने, आपल्या मुलीचा ताबा आपल्याला मिळावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही संबंधित मुलगी १९ वर्षांची असून सध्या कुवेत येथे आपल्या वडिलांबरोबर राहते. ही मुलगी दिल्लीतील मुक्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम करते आहे. कुवेतला ती एका आयटी कंपनीत इंटर्नशिप करते आहे. ‘मुलगी सज्ञान असून तिला घटनेने स्वातंत्र्य दिले आहे. भावनिक कारण देऊन आईवडिलांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. मुलगी तिचे निर्णय स्वतः घेऊ शकते,’ असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील एका विवाहितेने आपल्या पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच ही मंडळी या मुलीकडे पैशाची मागणी करू लागले. मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आईवडिलांनीही वेळोवेळी तब्बल दोन कोटी ४० लाख रुपये त्यांना दिले. पण त्यांची मागणी थांबेचना आणि मुलीचा त्रासही थांबेना. पैसे आण नाहीतर सोडून देईन आणि सोडून दिले तरी दर महिन्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतील, अशी अजब धमकी तो तिला देत असे. अखेर या सगळ्या जाचाला कंटाळून तिने पोलिस ठाणे गाठले आणि या लोकांची तक्रार केली. आता तपास होऊन गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकेल. यात तिच्या आईवडिलांची चूक आहे, असे कोणी म्हणेल. ते कदाचित बरोबरही असेल. पण मुलीच्या मायेने, तिचा संसार नीट व्हावा आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीने अनेक पालक गप्प बसतात. मुकाट सगळे सहन करतात. पण आता हेही बंद व्हायला. या प्रकरणात या मुलीने उशिराने का होईना या मुलीने दाखवलेली हिंमत सगळ्यांनी दाखवायला हवी. मुख्य म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत. 

बाई निर्णय घेते - घेऊ शकते, हेच आपल्याकडे अनेकदा अप्रूप वाटण्यासारखी परिस्थिती आजही अनेक ठिकाणी आहे. (तसे बघितले तर अनेक मुलग्यांनाही खूप काळ स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची ‘परवानगी’ नसते.) खरे तर एकविसाव्या शतकात खरे तर ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. पण अजूनही बाईला निर्णय घेण्याची परवानगी अनेक घरांत नाही. तिची एखादी मैत्रीण अशी काहीशी ‘स्वतंत्र’ असेल तर लगेचच ‘तिची संगत सोड’ असा आग्रह आपल्या मुलीला करणारे लोक खूप आहेत. आपली मुलगी, पत्नी, अगदी आईही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, हे त्यांना माहिती नसते असे नाही. पण तसे ती निर्णय घेऊ लागली, तर आपले महत्त्व कमी होईल ही भीती त्यामागे प्रामुख्याने असते. त्यामुळे सुरवातीपासूनच तिला निर्णय घेऊ दिले नाही, तिला स्वतःवर अवलंबून ठेवले की प्रश्‍नच सुटतो.. महत्त्वाचे म्हणजे अशा पद्धतीने मुलींना ‘पांगळे’ करणाऱ्यांत केवळ पुरुषच नसतात; तर त्या वृत्तीच्या महिलाही असतात. आपल्या मुलीचे नुकसान होऊ नये, अशी भावना त्यामागे असेलही. पण ते पूर्ण बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. कारण मुलगा असो वा मुलगी त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजेत. तशी सवय घरांतील वडिलधाऱ्यांनी त्यांना लावली पाहिजे. कारण प्रत्येक प्रसंगात ही मंडळी त्यांच्याबरोबर नसणार, अशावेळी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असली पाहिजे. सुरवातीला त्यांचा निर्णय कदाचित चुकेलही, पण सावरायला आपण मंडळी त्यांच्याबरोबर असतो. मग विचार करण्याची सवय त्यांना लागते. दोन्ही बाजूंनी ते विचार करू लागतात. त्यांना गरज असेल तर आपण असतोच. मात्र असे ‘मोकळे’ सोडले तरच ही मुले स्वतःच्या पायांवर आत्मविश्‍वासाने उभी राहू शकतील. म्हणून आईवडिलांनी, वडिलधाऱ्यांनी त्यांना स्पून फीडिंग अर्थात स्वतःच्या ओंजळीने पाणी पाजण्याचे थांबवायला हवे. तुम्ही जरी काळजीपोटी हे करत असलात तरी पुढे जगण्याच्या रेटारेटीत तुम्ही आपल्याच मुलाला किंवा मुलीला पांगळे करत आहात हे कधीही विसरता कामा नये. 

प्रत्येक पालकाला आपल्या मुलीचे किंवा मुलाचे भलेच झालेले बघायचे असते. त्यामुळेच अनेकदा या मुलांची नको इतकी काळजी घेतली जाते. त्याने कोणते कपडे घालावेत, काय खावे, काय प्यावे इथपासून कोणता अभ्यासक्रम निवडावा, नोकरी करावी की व्यवसाय करावा, लग्न कोणाबरोबर करावे असे प्रत्येक निर्णय अनेकदा पालकांनाच घ्यायचे असतात. पण अशावेळी एक मूलभूत गोष्ट ते विसरतात, की काळ बदलला आहे. त्या बदललेल्या काळाशी सुसंगत आपल्या मुलांना राहायचे आहे अन्यथा ते कालबाह्य ठरतील.. आणि या काळाची पावले आपल्यापेक्षा जास्त चांगली हीच मुले ओळखू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. अशावेळी पालकांची, वडिलधाऱ्यांची एकच जबाबदारी असते, ती म्हणजे मुलांना जास्तीत जास्त निर्णयक्षम करणे. मात्र हे निर्णय घेण्याची सवय लावतानाच त्याची जबाबदारी घेण्याची सवयही या मुलांना लागायला हवी. अन्यथा निर्णय आपले आणि चुकले तर दोष आईवडिलांना किंवा इतर कुणाला हेही बरोबर नाही. पूर्ण बरोबर कोणीच नसते. आपणही अनेक चुका केलेल्या असतात. पण त्यातून शिकूनच पुढची वाटचाल करत असतो. मुलांनाही ते स्वातंत्र्य दिले पाहिजे. कारण हे त्यांचे आयुष्य आहे. ते कसे जगायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. तो आपण त्यांना द्यायला हवा.

संबंधित बातम्या