याला जबाबदार कोण? 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

संपादकीय
नायलॉनचा - चिनी मांजा हाताने तुटत नाही. त्याचा फास जीवघेणाच असतो. महत्त्वाचे म्हणजे या मांजावर बंदी आहे. तरीही पतंग उडवण्यासाठी तो सर्रास वापरला जातो. बेफिकिरीमुळे एखाद्याचे आयुष्य कसे उद्‌ध्वस्त झाले आहे. सगळे कशामुळे होते? अपघात समजू शकतो, पण यात कोणाची तरी चूक असते. समोरच्याचा अनेकदा काहीही दोष नसतो. असे अपघात ज्यांच्याकडून बेपर्वाईने होतात, त्यांनी अपघातग्रस्तांच्या घरी जाऊन एकदा पाहावे.

या जगात मरणाइतके शाश्‍वत दुसरे काहीही नाही, हे खरे असले तरी ते स्वस्तही असता कामा नये. ते अटळ असले तरी काहीही चूक नसताना, कोणाच्या हलगर्जीपणामुळे जर कोणाला त्याने अवचित गाठले तर हळहळ वाटणारच. अशा अपघातांमुळे अनेक गोष्टी चर्चेला येणारच. 

‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांना असेच काळाने बेसावध गाठले. त्यात त्यांची अक्षरशः काहीही चूक नव्हती. एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसला जाताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला आणि त्यांची मृत्यूशी झुंज सुरू झाली. अखेर रविवारी (ता. ११) सकाळी सातच्या सुमारास ही झुंज अपेशी ठरली. वरवर बघता कोणाला हा अपघात वाटेल. पण यातील मेख अशी, की हा मांजा साधा नव्हता. नायलॉनचा - चिनी मांजा होता. तो हाताने तुटत नाही. त्याचा फास जीवघेणाच असतो. महत्त्वाचे म्हणजे या मांजावर बंदी आहे. तरीही पतंग उडवण्यासाठी तो सर्रास वापरला जातो, हे या घटनेने सिद्ध केले. 

या घटनेमुळे खूप गोष्टी उघडकीस आल्या. या मांजावर बंदी असूनही अनेकांकडे त्याचे साठे असण्याची शक्‍यता आहे. या मांजाची अजूनही काही दुकानांत सर्रास विक्री होते. बहुतांश वेळा लहान मुले पतंग उडवतात, तोही रहदारीच्या रस्त्यांवर.. आणि याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. असे का व्हावे? लहान मुलांना समजत नाही, पण त्यांच्या पालकांना तर समजते. त्यांनाही समजत नसेल तर पोलिस - इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तर समजते. कशावर बंदी आहे, याची कल्पना संबंधित सर्व घटकांना असते. मग जिवावर बेतू शकणाऱ्या या गोष्टींवरील बंदीबाबत अंमलबजावणी का होऊ शकत नाही? बंदी असताना मुळात हा मांजा येतो कुठून आणि का? वास्तविक, पतंग, मांजा हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. त्यातील काटाकटीही रंजकपणे चालते. असे असताना हा जीवघेणा नायलॉनचा मांजा आला कुठून? न तुटणाऱ्या या मांजाने पतंग उडवण्यात कसली आली मजा? पतंग नेहमी गच्चीवरून किंवा मोकळ्या मैदानातून उडवावा असा अलिखित संकेत आहे. पण अलीकडे एकतर मोकळे मैदानच उरलेले नाही. सगळीकडे इमारतीच इमारती झाल्या आहेत आणि दुसरे म्हणजे कमालीची बेपर्वाई वाढली आहे. संकट घरापर्यंत आल्याशिवाय त्याचे गांभीर्यच कळत नाही. कोणी तक्रार घेऊन गेलेच तर, ‘मग लेकराने कुठे खेळायला जावे?’ असा सवाल ऐकू येतो. पण त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो वगैरे संवेदनाच अनेकदा गोठून गेल्यासारख्या वाटतात. दोष मांजा, पतंगापेक्षाही त्याचा वापर करणाऱ्यांचा आहे. बंदी झुगारून मनमानी करणाऱ्यांचा आहे. 

एरवी रात्री - अपरात्री गाड्या काढून देशाचा जोरजोरात जयजयकार करत फिरणाऱ्यांनी चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करावा. चांगले नागरिक होणे म्हणजे काय, ते प्रथम समजून घ्यावे. आपण तसे नाही हे लक्षात आल्यावर तसे होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय करायचे, तर सर्वप्रथम स्वयंशिस्त बाणवावी. समाजात वावरताना इतरांना आपली मदत झाली नाही, तरी त्रास तर होत नाही ना याचे भान ठेवावे. वाईट - चुकीच्या गोष्टींना विरोध करावा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी संवेदनशील असावे. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.. अशा अनेक गोष्टी आहेत. बेसिक गोष्टी पाळल्या तरी इतरांचे जीवन खूप सुसह्य होऊ शकेल. असे आपल्यामुळे होऊ शकणारे जीवघेणे अपघात टळू शकतील. हे दुसरे कोणी येऊन आपल्यासाठी करणार नाही आपणच करणार आहोत आणि हीदेखील देशभक्तीच असते. आपला देश चांगला ठेवणे हे आपलेच कर्तव्य असते. 

पुण्यातीलच दुसऱ्या एका घटनेत ज्येष्ठ महिलेचा खून करून तो अपघात दाखवण्यात आला. नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. घरात हे दोघे पती-पत्नी आणि वयस्कर आई. पण त्यांचा सांभाळ करणारा माणूस गायब होता. पोलिसांनी काही तासात त्याच्याकडून माहिती काढली. बदली म्हणून आलेल्या या १९ वर्षांच्या मुलाने चहा देत नाही म्हणून बाईंची हत्या केली, असे निष्पन्न झाले आहे. 

काही दिवसांपूर्वी अशाच रस्ता ओलांडायला थांबलेल्या आई आणि दोन मुलींना भरधाव गाडीने उडवले होते. स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या नवऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू होतो. बसचालकाचा अंदाज चुकतो आणि संपूर्ण बसच पंचगंगेत पडते.. अशा किती घटना सांगाव्यात. हे सगळे कशामुळे होते? अपघात समजू शकतो, पण यात कोणाची तरी चूक असते. समोरच्याचा अनेकदा काहीही दोष नसतो. असे अपघात ज्यांच्याकडून बेपर्वाईने होतात, त्यांनी अपघातग्रस्तांच्या घरी जाऊन एकदा पाहावे. त्यांच्या बेफिकिरीमुळे एखाद्याचे आयुष्य कसे उद्‌ध्वस्त झाले आहे. घरातील कमावती, काळजी घेणारीच व्यक्तीच गेली तर ते घर उद्‌ध्वस्तच होणार आणि याला आपण जबाबदार आहोत, याची जाणीव व्हायला हवी. अनेकदा ही बोचही एखाद्याला पुरेशी असते. पण अलीकडे समाजात आलेला भावनांचा बोथटपणा, असंवेदनशीलता बघितली तर हे खरे आहे का याबद्दल शंका येऊ लागते. तसे असते तर इतके जीवघेणे अपघात झालेच नसते. पण असे होत नाही म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा हे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. समाजात जागरूकता निर्माण करायला हवी. हे काम एका दिवसात होणारे नक्कीच नाही. तशी अपेक्षाही नाही. पण आज ते सुरू केले तर पुढे कधीतरी पूर्णत्वास येऊ शकेल. अशा अपघातांबाबत हळहळ व्यक्त होणे स्वाभाविक आहे. पण तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर लोकांत जागरूकता निर्माण करायला हवी. जो प्रतिसाद मिळेल त्याने खचून न जाता किंवा शेफारून न जाता, प्रबोधनाचे काम सुरूच ठेवले पाहिजे तरच समाजात काही सकारात्मक बदल होताना दिसू शकेल. समाजाचा आपण घटक असल्याने हे आपण करायलाच हवे तरच हकनाक जाणाऱ्या बळींची संख्या कमी होऊ शकेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या