स्त्रियांची अस्मिता जपायलाच हवी

ऋता बावडेकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

संपादकीय

आपल्या समाजात महिला विषय तसा पूर्वीपासूनच दुर्लक्षित आहे. मग त्यांचे आरोग्य किंवा इतर समस्यांचा प्रश्‍नच येत नाही. मात्र, महिलांनी आपल्या पातळीवर आपले काही प्रश्‍न सोडविण्याचा नक्की प्रयत्न केला. उदा. शिक्षण. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न सुटला. अर्थात त्यामागे महात्मा जोतिबा फुले यांचे सक्रिय प्रयत्न होते, हे विसरता येणार नाही. असे बरेच प्रश्‍न सोडविण्याचा महिलांनी प्रयत्न केला. अलीकडच्या काळातील त्यांच्या मूलभूत हक्काचा विषय म्हणजे ‘राइट टू पी’ अर्थात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्‍न. हा प्रश्‍न पूर्णपणे सुटला असे नाही. पण किमान महिलांसाठी ही समस्या असू शकते - आहे, ही जाणीव समाजाला - सरकारला झाली. राज्यातील इतर भागापेक्षा मुंबईत बऱ्याच ठिकाणी ही स्वच्छतागृहे दिसतात. पण एरवी स्वच्छतागृहे आणि त्यातील स्वच्छता हा केवळ चर्चेचा मुद्दा उरला आहे. 

वास्तविक, या सगळ्या महिलांच्या खऱ्याखुऱ्या समस्या आहेत. पण त्याची वाच्यता करण्याचे महिलाच टाळतात. कारण त्याबद्दलचा कमालीचा संकोच! यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मासिक पाळी होय. लघवी लागणे, मासिक पाळी या खरेतर नैसर्गिक गोष्टी आहेत. त्याबद्दल संकोच असण्याचे काहीच कारण नाही. पण आपल्या समाजात अनेक विषय ‘टाबू किंवा निषिद्ध’ मानले गेले आहेत किंबहुना आपणच ते तसे बनवले आहेत. त्यामुळे त्याची जाहीर वाच्यता करणे टाळले जाते. जाहीर सोडा, घरांतही त्याबद्दल बोलले जात नाही. सगळा गुपचूप मामला. पूर्वी तर महिलांना पाळीच्या दिवसांत वेगळे बसवले जात असे. त्यांचा स्पर्श विटाळ मानला जाई. ‘रोजच्या कामातून पाच दिवस तरी तिची सुटका’ असे गोंडस कारण देऊन त्याची अजूनही भलामण केली जाते. पण त्यासाठी वेगळे बसवणे, विटाळ मानणे या गोष्टी कशाला? तशीही तिला कामातून सुटका देताच आली असती. पण तसे झाले नाही. पण अलीकडेपर्यंत काही घरांत ही प्रथा होती. ती पूर्णपणे नाहीशी झाली असेल असे म्हणणे कदाचित धार्ष्ट्याचे ठरेल. पण कमी नक्कीच झाली आहे. 

तरीही या पाळीबद्दल अजूनही कुजबुजीच्याच स्वरूपात बोलले जाते. हे जर सगळे नैसर्गिक आहे तर त्याबाबत अजूनही इतकी गुप्तता का? पाळी येणे हा एवढाच विषय नाही, तर त्याबरोबर महिलांच्या आरोग्याचा, स्वच्छतेचाही प्रश्‍न येतो. आज एकविसाव्या शतकातही आपल्याकडे हा प्रश्‍न सुटलेला नाही. किंबहुना त्याची वाच्यताही अलीकडे अलीकडेपर्यंत कोणी केली नाही. 

तमिळनाडूतील पापनायकन पुदुर या गावातील अरुणाचल मुरुगनाथम या व्यक्तीमुळे या सगळ्या समस्या सामोऱ्या आल्या. मुरुगनाथम हे व्यवसायाने वेल्डर आहेत. आपली आई, बहिणी आणि पत्नी यांच्यामुळे त्यांची या प्रश्‍नाशी ओळख झाली. कारण या दिवसांत त्यांच्या घरातील या महिला कापड वापरत. तेच धुऊन, नंतर परत परत त्याच कापडाचा उपयोग होत असे आणि असे करणाऱ्या त्या एकमेव स्त्रिया नव्हत्या तर गावातील बहुतेक स्त्रियांची हीच स्थिती होती. बाजारात मिळणारी पॅड्‌स या महिलांना एकतर माहीत नव्हती किंवा परवडणारी नव्हती. मात्र कापडाच्या सततच्या वापरामुळे या महिलांच्या स्वच्छतेचा, आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो आहे याची जाणीव मुरुगनाथम यांना झाली. या आणि देशातील अशा सर्वच महिलांसाठी स्वस्तात मिळणारी पॅड्‌स तयार करावीत असे त्यांच्या मनाने घेतले. तसे प्रयत्नही त्यांनी सुरू केले. यावरून गावात त्यांची टिंगल टवाळी होऊ लागली. एवढेच कशाला, स्वतःच्या घरातही असहकार पुकारला गेला. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि एक दिवस या प्रयत्नांत त्यांना यश आले. जगभर त्यांचे नाव झाले. पुढे प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याने त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्याला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

मुरुगनाथम यांनी या समस्येला वाचा तर फोडली, त्याबद्दलची जाणीवही बऱ्यापैकी निर्माण केली. मात्र अजूनही प्रत्येक महिलेपर्यंत स्वस्तातील पॅड पोचलेले नाही. त्यासाठी आता त्यांनी आणि अक्षयकुमार यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात काही सामाजिक, सेवाभावी संस्थाही त्यांना मदत करत आहेत. त्याचे एक यश म्हणजे, ‘महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यावेत’ असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. हे योग्यच आहे, कारण मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यासाठी लागणारे नॅपकिन्स ही त्यांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे महिलांची वैयक्तिक स्वच्छता व आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हायला हवेत. मात्र या नॅपकिन्सच्या किमती अनेक महिलांच्या आवाक्‍यातील नाहीत, त्यामुळे ते रास्त दरात उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. त्यातही बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक पॅड्‌समुळे इन्फेक्‍शनचाही धोका असतो. त्यामुळे पर्यावरणपूरक पॅड्‌सची निर्मिती आवश्‍यक आहे. 

या सगळ्याला प्रतिसाद म्हणून की काय, ‘राज्यातील किशोरवयीन मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर १७ टक्‍क्‍यांवरून ७० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी व तशी कायमस्वरूपी योजना सुरू करण्यासाठी; तसेच महिला बचत गटांच्या व्यवसायाला वाव मिळवून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शाळेतील मुलींना सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,’ असे ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्याचे स्वागत करायला हवे. 

अर्थात हे प्रयत्न म्हणजे सर्व काही नव्हे. या बाबतीत अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी संपूर्ण समाजाचेच सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वप्रथम या विषयांवर चर्चाच करायची नाही ही मानसिकता बदलायला हवी. याचा अर्थ फॅशन म्हणूनही या विषयांवर चर्चा करायची नाही. कारण हा विषय महिलांच्या खूप जिव्हाळ्याचा आणि वैयक्तिक आहे. त्याची उथळ चर्चा होणे अपेक्षित नाही. विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन, स्त्रीची अस्मिता जपली जाईल अशी चर्चा व्हावी. पण चर्चा का, तसे प्रयत्न व्हावेत आणि सर्वच स्त्रियांना त्याचा फायदा व्हावा, ही अपेक्षा फार मोठी नाही ना?

संबंधित बातम्या