परस्परसंवाद आवश्‍यक 

ऋता बावडेकर
बुधवार, 21 मार्च 2018

संपादकीय

अनेकदा आपल्या आजूबाजूला अनपेक्षित अशा काही घटना घडतात की त्याबद्दल काय बोलावे कळत नाही. मुळात त्यात काही अर्थ आहे का आणि हे असे का व्हावे असे अचंबित व्हायला होते. 
च्या आठवड्यात एक प्रकरण न्यायालयात दाखल झाले. पत्नीला रुचकर स्वयंपाक येत नाही, त्यामुळे घटस्फोट द्यावा, अशी पतीची मागणी होती. पत्नीला रुचकर स्वयंपाक करता येत नाही. दमून घरी आल्यावर ती साधे पाणीही विचारीत नाही. झोपून राहते. नंतर तिला हवे तेव्हा उठून स्वयंपाक करते, तोही बेचव असतो. काही सांगायला गेले की माझ्यावर, माझ्या आईवडिलांवर ती ओरडते. ती अजिबात गृहकृत्यदक्ष नाही, असे पतीचे म्हणणे होते. मात्र पत्नीचे बरोबर याउलट म्हणणे होते. तिच्या म्हणण्यानुसार, ती सकाळी उठून स्वयंपाक करून कामाला जाते. आल्यावरही घरातील सगळी कामे करते. पण पती आणि सासूसासरेच माझा छळ करतात. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर ‘पत्नीला स्वयंपाक येत नाही, या कारणावरून घटस्फोट मंजूर करता येणार नाही,’ असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. 
या बातमीपाठोपाठ आणखी एक बातमी आली आहे. पत्नी वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी पतीने केली होती. हे प्रकरण असे - दिल्लीत राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न २००८ मध्ये झाले. २०१० मध्ये या जोडप्याला एक मुलगाही झाला. मात्र त्यानंतर पत्नी पतीला सतत त्रास देऊ लागली. अनैतिक संबंध असल्याचे आरोप ती पतीवर करू लागली. वारंवार आत्महत्येची धमकी देऊ लागली. या पद्धतीने माझा व माझ्या कुटुंबीयांचा मानसिक छळ होत असून घटस्फोटासाठी परवानगी द्यावी, अशी या तरुणाची मागणी होती. त्यानुसार कुटुंब न्यायालयाने त्याची मागणी मान्य केली. पण त्या विरोधात पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र ‘अनैतिक संबंधांचे खोटे आरोप सतत करणे मानसिक त्रासाचे आणि वेदनेचे ठरते. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. आत्महत्येची सतत धमकी देणाऱ्या पत्नीबरोबर राहणे हेही धोक्‍याचेच असते,’ असे सांगून न्यायालयाने पतीला घटस्फोटाची परवानगी दिली. मोठ्या दिराच्याच पत्नीबरोबर आपल्या पतीचे संबंध असल्याचा या महिलेचा आरोप होता. त्यामुळे त्या महिलेच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडाले. ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असेही न्यायालयाने या संबंधीच्या निकालात नमूद केले आहे. 
या बातम्या किंवा घटनांमध्ये तसे काही नवीन नाही. नेहमीच आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टी आहेत. याचा अर्थ त्या योग्य आहेत किंवा त्यावर काही बोलायला नको असे अजिबात नाही. त्या चूकच आहेत.. आणि त्या योग्य - अयोग्य यापलीकडेही एक गोष्ट आहे ती म्हणजे यातून दिसणारी वृत्ती. किती मागास वृत्ती आहे ही! आपल्याच जोडीदाराबद्दल असे बोलणे योग्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे या इतक्‍या खासगी गोष्टी आहेत त्या परस्परांशी बोलून सोडवता येतात. त्यातून मार्ग काढता येतो. पण तसे न करता आपल्या घरची लक्तरे घराबाहेर टांगण्यात कसले भूषण आहे तेच कळत नाही. एका प्रकरणातील अपेक्षाही पोरकट म्हणावी अशीच आहे. स्त्री म्हटली की गृहकृत्यदक्षच कशाला हवी? तिलाही तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ती कमावती आहे. तिच्या मर्जीप्रमाणे ती राहू - वागू शकते. पण तिने नोकरीही करायची आणि घरातले सगळे कामही करायचे ही अपेक्षा किती चुकीची आहे. अनेक ठिकाणी स्त्रिया आपल्या नवऱ्यांपेक्षा जास्त कमावतात. पण तरीही वरचष्मा नवऱ्याचाच असतो. चार घरी धुणी-भांडी करणाऱ्या महिला बघितल्या तरी लक्षात येईल अनेकींचे नवरे काहीही कामधंदा करत नाहीत. पत्नीच्या जिवावर बसून खातात. पण तिने कुठे काम करावे, किती पगार घ्यावा वगैरे गोष्टी ते तिला सांगत असतात. ते ऐकण्यावाचून तिच्याकडे अनेकदा पर्यायही नसतो. हा ‘नवरेपणा’ ‘पुरुषीपणा’ गाजवण्याची हौस कशासाठी? 
याउलटही घटना घटत असतात. वर उल्लेख केलेली दुसरी घटना त्याच प्रकारातील. अनेक महिला आपल्या ‘स्त्री’ असण्याचा गैरफायदा घेत असतात. नवऱ्यावर खोटेनाटे आरोप करून त्याला हैराण करतात. त्याच्या आईवडिलांना सांभाळायला - नातेवाइकांना भेटायला नकार देतात. त्यांना मदत करण्याचीही नवऱ्याला परवानगी नसते. हे वर्तनदेखील क्रूरच म्हणायला हवे. 
स्त्री-पुरुष ही एका रथाची दोन चाके आहेत, असे आपल्याकडे पूर्वीपासून म्हणत आले आहेत. यातील अतिशयोक्ती सोडली, तरी हे म्हणणे खरेच आहे. नेटका संसार करायचा असेल तर या दोन्ही बाजू समजूतदार - परस्परांना समजून घेणाऱ्या हव्यात. एक वेळ पैशाबाबतीत इकडे तिकडे झाले तरी चालेल पण परस्परांना मानसिक - भावनिकदृष्ट्या त्यांनी समजून घेतले पाहिजेत. एकमेकांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, हे समजून घेतले पाहिजे. दोन व्यक्ती एकत्र आल्या की कधीतरी वाद होणारच. पण ते विकोपाला जाऊ न देता, परस्परसामंजस्याने त्यातून मार्ग काढला गेला पाहिजे. एकाचे बिनसले तर त्या क्षणी शांत राहून दुसऱ्याने परिस्थिती समजून घेतली पाहिजे.. आणि हे दोन्ही बाजूंनी व्हायला पाहिजे. केवळ बाई म्हणून तुझी जबाबदारी असे म्हणून आपली जबाबदारी झटकता कामा नये. असे केले तरच संसार सुखाचा होऊ शकतो. 
मात्र आताच्या घाई-गडबडीच्या काळात हेच नाहीसे होत चालले आहे. पुरेसा संवाद होत नाही, त्यामुळे कोणाच्या काय अपेक्षा हे कळतच नाहीत. त्यातून गैरसमजांना खतपाणी घातले जाते. ते वाढत विकोपाला जातात. त्यातून वेळीच सावरले तर ठीक पण अन्यथा वेगळे होणे अपरिहार्य ठरते. यात दोघांचे नुकसान होतेच पण मुलांचे आणि एका कुटुंबाचे नुकसान होते. ते फार मोठे असते. खरे तर ते थांबवता येऊ शकते. त्यासाठी थोडा समंजसपणा आणि संवादाची तयारी लागते. ते असेल तर कुटुंबे तुटणार नाहीत.

संबंधित बातम्या