चिऊताई चिऊताई... 

ऋता बावडेकर
गुरुवार, 22 मार्च 2018

संपादकीय

एकेकाळी प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असलेला एक पक्षी म्हणजे चिमणी! ‘एकेकाळी’च म्हणावे लागेल अशी या पक्ष्याची आज स्थिती आहे. आपल्या काँक्रिटच्या जंगलात हा चिमुकला जीव कुठे गेला हे लक्षात यायलाच खूप काळ गेला. लक्षात आले तेव्हा वीस मार्च रोजी ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा होऊ लागला. त्यानिमित्ताने चिमणीला परत बोलावण्याचेही प्रयत्न होऊ लागले. या प्रयत्नांना थोड्या प्रमाणात का होईना यश येऊ लागल्याचे आता दिसत आहे. 

इवलुशी असली तरी चिमणीही आपल्या जीवनसाखळीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे तिची गैरहजेरी कालांतराने का असेना जाणवलीच.. आणि तिला परत बोलावण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातील एक प्रयत्न वनविभाग आणि ईला फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. काँक्रिटच्या जंगलात चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास जवळ जवळ नष्ट झाला. त्यामुळे त्यांना कृत्रिम घरट्यांचा पर्याय वरील संस्थांनी दिला. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश येऊ लागल्याचे दिसते. कारण प्रजननासाठी चिमण्या या कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्या आहेत. त्यांच्या प्रजननाचे प्रमाण ७२.६ टक्के आहे. ‘वर्षभर केलेल्या अभ्यासातून चिमण्यांनी कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करणे, अंडी घालणे, घरट्यात अंडी फुटून पिलू जन्माला येणे, ते पिलू घरट्यातून उडून जाणे इत्यादी निरीक्षणे नोंदवली आहेत,’ अशी माहिती ईला फाउंडेशनचे प्रमुख डॉ. सतीश पांडे यांनी दिली. 

हे चित्र नक्कीच आशादायक आहे. चिमणीला परत बोलावण्याचे आपण, म्हणजे माणूस करत असलेले विविध प्रयत्नही स्तुत्यच आहेत. पण चिमणी गायब होण्याचे कारणही दुर्दैवाने आपणच आहोत. आपल्याच अति हव्यासामुळे चिमणी गायब झाली.. ‘एक घास चिऊचा..’ म्हणताना आपल्या बाळाला दाखवण्यासाठीही चिमणी शिल्लक राहिली नाही. आज जसे ए एडक्‍याचा किंवा ई ईडलिंबूचा शिकवताना म्हणजे काय? असे भाव मुलांच्या चेहऱ्यावर दिसतात, तसेच चिमणीच्या बाबतीतही झाले. 

ही चिमणी गायब का आणि कशी झाली? शहरातील वाडे हळूहळू पाडले जाऊ लागले. त्याजागी मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. काँक्रिटचे हे जंगल कधी फोफावले हे लक्षातच आले नाही. या सगळ्याबरोबर वाड्यातील अनेक गोष्टीही कमी झाल्या; चिमण्या त्यापैकीच होत! वाढते मोबाईल टॉवर्स, डिश अँटेना हे चिमण्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. त्यातून निघणाऱ्या किरणांचा त्यांना त्रास होतो असे म्हटले जाते. पण तसे सिद्ध झालेले नाही. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका निरीक्षणानुसार मातीचे कमी झालेले प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. मातीचा ‘मडबाथ’ चिमण्यांना उपयुक्त असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरावरचे जीवजिवाणू जातात. अपचनासाठी मातीतील खडे त्यांना उपयुक्त असतात. पण वाढत्या सिमेंट-काँक्रिटीकरणामुळे मातीच नष्ट 

झाली. तसेच मीलनकाळात चिमण्या मातीत लोळतात. पण मातीच नसल्याने त्यांच्या मीलनात अडथळे येऊ लागले. परिणामी चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली. याशिवाय चिमण्या आपल्या पंखांत मुंग्यांना चिरडतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नाही. पण जंतुनाशक फवारणीमुळे मुंग्यांचे प्रमाण कमी झाले. तसेच पिकांवरील फवारणीमुळे ते औषध चिमण्यांच्या पोटात जाऊ लागले. याशिवायही अनेक गोष्टींचा परिणाम चिमण्यांचे प्रमाण कमी होण्यावर झाला. 

हे असे अनेक वर्षे झाले.. आणि अचानक कोणाला तरी जाणवले, अरे आपल्या जुन्या घराच्या वळचणीला, गॅलरीत, छताच्या खोबणीत... दिसेल तिथे घरटे करणारी चिऊताई गेली कुठे? मग सगळ्यांच्या लक्षात आले, की चिमणीच गायब आहे. तिचा चिवचिवाट नाही, आपल्या घरात हक्काने मारणाऱ्या तिच्या घिरट्या नाहीत, गोंधळ नाही; काही काहीच नाही. ही गेली कुठे? गेली हे तर लक्षात आले; मग ती गेली कुठे? कशामुळे? हा शोध सुरू झाला. कालांतराने ही उत्तरे प्रत्येकाने आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याला आता कुठे हळूहळू यश मिळताना दिसत आहे. तरीही पूर्वी दिसायची इतक्‍या सहजपणे अजूनही चिमणी दिसतच नाही. त्यासाठी संघटितपणे प्रयत्न व्हायला हवेत. 

कोणी म्हणेल चिमणी नसेल तर काय आकाश कोसळते का? अजिबातच नाही. पण ती आपल्या जीवनसाखळीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या साखळीत तिचे म्हणून एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. तसे ते प्रत्येक घटकाचेच असते. पण जगण्याच्या लढाईत आपण हे घटक हळूहळू नष्ट तर करत नाही ना, याचा विचार करायला हवा. अगदी साधी गोष्ट म्हणजे, चिमण्यांमुळे किडे-मुंग्या कमी होत. यावर जंतुनाशकांचा पर्याय आला. पण त्याचे रासायनिक परिणाम आपण लक्षात घेतो का? त्याचा खर्च आला, तोही एकवेळ ठीक; पण त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात याचा कोणी विचार करत नाही. जे काम पूर्वी आपल्याही नकळत बिनबोभाट होत होते. त्यासाठी आपल्याला आता विशेष परिश्रम करायला लागतात. 

जीवनसाखळीतील प्रत्येक घटकाचे असे आहे. हे घटक कमी किंवा नष्ट झाल्याने फार अडत नसेलही कदाचित; पण दूरगामी त्याचे परिणाम जाणवतातच. वाघाचे उदाहरण घेतले तरी जाणवेल. तो तर सगळ्यात महत्त्वाचा घटक. जंगलाचे स्वास्थ्य त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. तो जर नष्ट झाला, कमी झाला तर जंगलाचा समतोलच बिघडणार आहे आणि ते कोणाच्याही फायद्याचे नाही. त्यामुळे माणूस म्हणून आपली जबाबदारी फार वाढते. कारण आपल्याला या गोष्टी समजतात. पण आता केवळ ‘समजतात’ असे म्हणून उपयोग नाही, तर ही सगळी साखळीच वाचवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या हव्यासाला आवर घालायला हवा आणि घटक लहान असो वा मोठा; प्रत्येकाचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे.  

संबंधित बातम्या