लक्षवेधी पर्यटन क्षमता... 

Ruta Bawadekar
बुधवार, 28 मार्च 2018

पर्यटन ही आजकाल केवळ हौस राहिली नसून, विकासाच्या वाटचालीतील ते एक महत्त्वाचे अंग बनले आहे. देशाची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून असणारी जगात अनेक उदाहरणे आहेत. भारतात पर्यटन विकासाला ‘स्काय इज द लिमिट’ एवढ्या भरपूर संधी असल्या; तरी त्यासाठी नियोजनपूर्वक आणि भरीव प्रयत्न ज्या प्रमाणात व्हायला पाहिजेत, ते झालेले दिसत नाहीत. गोवा, काश्‍मीर, केरळ, राजस्थान यांसारख्या आपल्या देशातील राज्यांनी पर्यटनाबाबतीत पुढचे पाऊल केव्हाच टाकले असले; तरी महाराष्ट्रासारखे राज्यही पर्यटनाच्या नकाशावर अलीकडच्या काळात वेगाने पुढे येते आहे. 

पर्यटन ही आजकाल केवळ हौस राहिली नसून, विकासाच्या वाटचालीतील ते एक महत्त्वाचे अंग बनले आहे. देशाची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून असणारी जगात अनेक उदाहरणे आहेत. भारतात पर्यटन विकासाला ‘स्काय इज द लिमिट’ एवढ्या भरपूर संधी असल्या; तरी त्यासाठी नियोजनपूर्वक आणि भरीव प्रयत्न ज्या प्रमाणात व्हायला पाहिजेत, ते झालेले दिसत नाहीत. गोवा, काश्‍मीर, केरळ, राजस्थान यांसारख्या आपल्या देशातील राज्यांनी पर्यटनाबाबतीत पुढचे पाऊल केव्हाच टाकले असले; तरी महाराष्ट्रासारखे राज्यही पर्यटनाच्या नकाशावर अलीकडच्या काळात वेगाने पुढे येते आहे. 

महाराष्ट्रात पर्यटनदृष्ट्या क्षमता असलेली जी ठिकाणे आहेत, त्यांमध्ये कोकण किनारपट्टीचा परिसर सर्वाधिक लक्षवेधी म्हणून गणला जातो. विशेषतः सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणावे लागतील. त्याचबरोबरीने या दोन्ही जिल्ह्यांना सीमावर्ती असणारा कोल्हापूर जिल्हाही अलीकडच्या काळात पर्यटकांचे ‘फेव्हरिट डेस्टिनेशन’ ठरला आहे. पश्‍चिम घाटातील संपन्न जैवविविधता आणि निसर्गाचे अनोखे रूप या तिन्ही जिल्ह्यांच्या भेटीत वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनिशी अनुभवता येते. प्राचीन शिल्पकलेचा अद्‌भुत आविष्कार असलेले कोल्हापुरातील करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर म्हणजे केवळ राज्यातीलच नव्हे, देश-विदेशांतील पर्यटकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. दक्षिण काशी असाही या क्षेत्राचा महिमा आहे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मंदिर परिसराच्या विकासासाठी व येणाऱ्या भाविक, पर्यटकांसाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. सिंधुदुर्ग हा जिल्हा तर पर्यटन जिल्हा म्हणून राज्य शासनाने बऱ्याच वर्षांपूर्वी घोषित केला असून तेथेही विकासाचे नियोजन आहे. गोव्यासारखे शेजारचे छोटे राज्य तिथल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे जगातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असताना तुलनेने महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाला म्हणावे तेवढे ‘अच्छे दिन’ अजून तरी आलेले नाहीत, हे वास्तव नाकारता येणार नाही. वास्तविक सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील अनेक समुद्रकिनारे गोव्याच्या तोडीचे आहेत; पण पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता व योग्य प्रकारे मार्केटिंग ही काळाची गरज आहे. 

पर्यटनातही आजकाल नवनवे ट्रेंड निर्माण होत आहेत. धार्मिक पर्यटन त्यांपैकी एक. त्या दृष्टीने कोल्हापूरचे जसे महत्त्व आहे, तसेच रत्नागिरीबाबतीत गणपतीपुळे या स्थानाचे आहे. येणाऱ्या काळात पर्यटनदृष्ट्या कोकण आणि कोल्हापूर असा एकत्रित आराखडा राबविण्याचा विचार झाला पाहिजे. करूळ, भुईबावडा, आंबोली आणि आंबा हे चार घाट म्हणजे या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारे सेतू आहेत. या घाटांतून निव्वळ प्रवास हासुद्धा पर्यटकांसाठी रोमांचक आणि तितकाच आनंददायी अनुभव असतो. ज्यांनी हा आनंद अद्याप घेतलेला नाही, त्यांनी त्यासाठी जरूर वेळ काढलाच पाहिजे. कोल्हापूर करून कोकणाला जाता येते किंवा कोकणाला भेट देऊन परतीच्या प्रवासातही कोल्हापूर भेटीचा आनंद घेता येऊ शकतो. दळणवळणाच्या सुविधांचे जाळे आता व्यापक झाले आहे. मुंबईपासून बंगळूरपर्यंतच्या पर्यटकांसाठी चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा कोल्हापूरला येण्याचा उत्तम पर्याय आहे. विदर्भ, मराठवाड्यातील पर्यटक रेल्वेचा पर्याय निवडू शकतात. कोल्हापूरला विमानसेवा सध्या सुरू नाही; परंतु केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत लवकरच नियमित विमानसेवाही प्रस्तावित आहे. कोकण रेल्वेचा प्रवासही जरूर अनुभवला पाहिजे. कोकण रेल्वे हे दीर्घकाळ स्वप्न होते. ते आता प्रत्यक्षात साकारले असून दऱ्याखोऱ्यांतून आणि बोगदे; तसेच उंच पुलावरून निसर्गाची विविध रूपे पाहण्यातील आनंद काय असतो, याचे खरे तर वर्णन ऐकण्यापेक्षा तो प्रत्यक्ष अनुभव घेणेच महत्त्वाचे. 

विविध लोकप्रिय स्थळांना भेटी देणे म्हणजे पर्यटन हा पारंपरिक कल आता बदलतो आहे. स्कुबा डायव्हिंग तसेच अन्य विविध प्रकारचे वॉटर स्पोर्टस हे प्रकार कोकण भेटीवर येणाऱ्या तरुणाईला आकर्षित करत आहेत. आता तर पर्यटकांसाठी पाणबुडीतून फेरफटक्‍याची सोयही प्रस्तावित आहे. पर्यटनातही आता इनोव्हेशन्स येत आहेत. कोकण-कोल्हापूर त्यांमध्ये अग्रेसर आहे. कोल्हापुरात गेल्या डिसेंबरमध्ये फ्लॉवर फेस्टिव्हल झाला. महाराष्ट्रात अशा प्रकारचा झालेला हा पहिलाच उपक्रम होय. लाखो पर्यटकांनी त्याचा आनंद घेतला. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कोल्हापूर आणि कोकणाला शिवकालीन ऐतिहासिक महत्त्वही आहे. पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारख्या किल्ल्यांना भेट देताना शिवकालीन शौर्याचे रोमांच आजही अनुभवता येतात. राजर्षी शाहू महाराजांसारख्या लोकराजाने संस्थानकाळात कोल्हापुरात विविध क्षेत्रांत ज्या दूरदृष्टीने राज्य केले, त्याची फळे आजही राज्यातच नव्हे, तर देशभर दिशादर्शक मानली जातात. या परिसराची वैशिष्ट्ये खूप सांगता येण्यासारखी आहेत; पण ती केवळ वाचण्या-ऐकण्यापेक्षा एकदा प्रत्यक्ष भेट देण्याचेच नियोजन करायला हवे.

संबंधित बातम्या