सततची असुरक्षितता... 

ऋता बावडेकर 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

संपादकीय

वाढते वय ही अनेकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. इतरांसाठी असेल, पण खुद्द काही ज्येष्ठांसाठीच हे सगळे चिंतेचे, भयावह झाले आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्येष्ठांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातील निष्कर्षांवरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे... आणि ही परिस्थिती केवळ एका गावात, एका शहरात, एका राज्यात नाही; तर संपूर्ण देशात आहे. 

या सगळ्याला पुष्टी देणारी एक ताजी घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी पुण्यात घडली. घटस्फोटित आहोत असे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाशी विवाह करून एका महिलेने त्याला महिनाभरात त्याच्याच घरातून बाहेर काढल्याची ही घटना आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, सत्तरीच्या आसपासचे एक ज्येष्ठ नागरिक एकटेच राहात होते. विरंगुळा म्हणून ते काही कार्यक्रमांना जात. तिथे एका गृहस्थांबरोबर त्यांची ओळख झाली. काही दिवसांनी या गृहस्थांनी एका महिलेची माहिती त्यांना दिली. तिला तिचा नवरा कसा त्रास देतो, ती कशी कंटाळली आहे आणि घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे.. वगैरे त्यांनी सांगितले. त्या गृहस्थांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ नागरिक त्या महिलेला भेटले. काही दिवसांनी त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या महिलेने घटस्फोट झाल्याची कागदपत्रे दाखवली आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याबरोबर विवाह केला. महिनाभराच्या कालावधीत या महिलेने खरे रंग दाखवण्यास सुरवात केली. हा सगळा बनाव असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. स्वतःचा नवरा, झेरॉक्‍स दुकानदार, वगैरे सहा-सात जणांच्या मदतीने हा प्लॅन आखला गेला होता आणि ज्येष्ठ नागरिक त्यात अलगद अडकले. या सगळ्यांनी त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर ते पोलिसांत गेले. आता या सात-आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा कितीतरी घटना सांगता येतील. 

या सगळ्या घटनांवरूनच एक सर्वेक्षण करण्यत आले. हे सरकारी सर्वेक्षण आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘देशात २०१४ ते २०१६ या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांपैकी ४० टक्के गुन्हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झाले आहेत. या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीचा - दिल्लीचा आघाडीच्या सात राज्यांमध्ये समावेश आहे. २०१६ मध्ये मात्र अशा प्रकरणांत घट झाल्याचे आढळले. या तीन वर्षांत उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश तसेच नागालॅंड यासारख्या ईशान्येकडील राज्यामध्ये अशा प्रकरणांची संख्या दहापेक्षाही कमी आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात २०१४ मध्ये सात हजार ४१९ गुन्ह्यांची नोंद झालेली होती. ही आकडेवारी देशात नोंद झालेल्या एकूण १८ हजार ७१४ प्रकरणांच्या ३९.६४ टक्के आहे. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये ज्येष्ठांविरुद्ध संपूर्ण देशात एकूण २० हजार ५३२ प्रकरणे झाली आहेत. त्यापैकी ३९.०४ टक्के देशाच्या या दोन मोठ्या राज्यांत नोंदली गेली आहेत. २०१६ मध्ये ही आकडेवारी आणखी वाढली. २०१६ मध्ये देशात नोंद झालेल्या एकूण २१ हजार ४१० प्रकरणांपैकी ४०.०३ टक्के प्रकरणे  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात नोंदविली गेली. २०१६ मध्ये दोन्ही राज्यांत ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध एकूण ८ हजार ५७१, तर २०१५ मध्ये ८ हजार १७ गुन्हेगारीची प्रकरणे नोंदविण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदविली गेली आहेत.’ 

केवळ ज्येष्ठांसाठीच नव्हे तर एकूणच ही सगळी परिस्थिती भयावह आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हे दोन घटक टार्गेट करण्यासाठी खूप सोपे असतात. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीची माणसे त्याचा फायदा घेतात. मात्र, ज्येष्ठांना केवळ गुन्हेगारच ठकवतात किंवा त्रास देतात असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. कारण या ज्येष्ठांना अनेक घरांत प्रचंड त्रास असतो. बरेचदा ही ज्येष्ठ मंडळी गलितगात्र झालेली असतात. हालचाल करायलाही त्यांना कोणाची तरी मदत लागते. अशावेळी त्यांच्याबरोबर सहानुभूतीने प्रेमाने वागणे अपेक्षित असते. पण ही अपेक्षा प्रत्येकवेळी पूर्ण होतेच असे नाही. काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाने आपल्या म्हाताऱ्या आजारी आईला गच्चीवरून ढकलून दिल्याची घटना घडली होती. अंथरुणाला खिळलेल्या सासूला, सून लाथाबुक्‍क्‍यांनी, विटेने मारत असल्याचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामुळे केवळ समाजातच नाही, तर अनेकदा घरांतही हे वृद्ध लोक सुरक्षित नसतात. त्याचप्रमाणे केवळ गलितगात्र वृद्धांनाच असे अनुभव येतात असे नाही, तर चांगल्या चालत्या-फिरत्या ज्येष्ठांचाही मानसिक, शारीरिक छळ केला जातो. कधी पैशासाठी, कधी घरासाठी तर कधी इतर कोणत्या कारणासाठी हा छळ होत असतो. 

याचा अर्थ प्रत्येक घरात असेच चित्र दिसते असे अजिबात नाही. आपल्या आईवडिलांना, सासूसासऱ्यांना, इतर कोणत्या नातेवाइकांना प्रेमाने सांभाळणारीही अनेक कुटुंबे आहेत. त्यांची दखल घ्यायलाच हवी. 

मात्र रस्त्याने एकट्या-दुकट्याने जाणारे हे ज्येष्ठ नागरिक समाजकंटकांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. दोन ज्येष्ठ महिला लिफ्टजवळ जात असताना चोरट्यांनी तेथे येऊन एकीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली, असा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्या महिलांना आरडा ओरडा करण्याशिवाय काहीच करता आले नाही. त्या त्याच्या मागे पळू शकत नव्हत्या, हतबल होत्या. 

याचा अर्थ ज्येष्ठांनी जगणे सोडून द्यावे का? अजिबात नाही. उलट ज्येष्ठ नागरिक ही केवळ त्या त्या कुटुंबाची जबाबदारी नसून सगळ्यांची आहे असे समजून समाजाने त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्येष्ठांच्या मनातील असुरक्षिततेची भावना नष्ट नाही, किमान कमी तरी होईल.

संबंधित बातम्या