भय इथले संपत नाही... 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

संपादकीय

काही गोष्टी, काही विषय असे असतात ज्यावर वारंवार लिहिले तरी ते कमी पडावे. या विषयांबद्दल सतत जागरूकता निर्माण करत राहायला हवे. असा विषयांपैकी एक विषय म्हणजे ज्येष्ठ नागरिक! समाजातील या सदस्यांचे असंख्य प्रश्‍न आहेत. काही प्रश्‍नांची उत्तरे आहेत, तर काही प्रश्‍नांची उत्तरे मिळून शोधण्याची आवश्‍यकता आहे. 

म्हातारपणाची सोय म्हणून प्रत्येकजणच काही ना काही तरतूद करून ठेवत असतो. यातील महत्त्वाची तरतूद म्हणजे पैसा जमवणे - ते जपणे होय. हे योग्यच आहे कारण पैसा असेल तर सर्व काही आहे. मात्र जशा संध्याछाया जवळ येऊ लागतात, तसे जाणवू लागते पैसा महत्त्वाचा आहेच पण त्याबरोबर इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आवश्‍यक आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसे, नातेवाईक... रक्ताची असो किंवा इतर; माणसे जोडायलाच हवीत! असे असले तरी हा प्रत्येक माणूस वेळेला उपयोगी पडेलच असे नाही. त्यामुळे एका प्रश्‍नाचे उत्तर मिळाले की दुसरा प्रश्‍न उभा राहतो हे ज्येष्ठांच्या समस्येचे मूळ आहे.. खूप प्रश्‍न आहेत. मात्र केवळ असे म्हणून उपयोग नाही, तर ही उत्तरे शोधायला लागणारच आहेत. कारण आज तरुण असलेली पिढी उद्या ‘ज्येष्ठ नागरिक’ होणारच आहे. त्यामुळे सध्याच्या ज्येष्ठ नागरिकांवर आपण काही उपकार करत आहोत अशी भावना न बाळगता उद्याच्या आपल्यासाठी आज उत्तरे शोधायला हवीत. 

पुण्यात नुकतीच एक घटना घडली. एका सोसायटीतील सदनिकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेचा मृत्यू त्याआधी दोन-चार दिवसांपूर्वीच झालेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पुण्यातील एका सोसायटीतील ही घटना. एका बंद सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागली म्हणून एकाने पोलिसांना कळवले. पोलिस आल्यावर सर्व उलगडा झाला. या सदनिकेत अरुणा धुरू (वय ८६) या एकट्या राहात असत. त्यांची बहीण बरोबर राहात असे, पण काही दिवसांपूर्वी बहिणीचे निधन झाले. तेव्हापासून श्रीमती धुरू एकट्याच राहात. त्यांचे कोणाकडे फारसे येणे-जाणेही नव्हते. त्यामुळे त्या गेल्याची माहिती कळवण्यासाठी त्यांच्या कोणत्याच नातेवाइकांचा संपर्क सोसायटीतील लोकांकडे नव्हता. घराची पाहणी करताना पोलिसांना, त्यांच्या मालमत्तेचे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलाचा संपर्क मिळाला व त्यानंतर धुरू यांच्या नातेवाइकांना कळवण्यात आले. दृष्टी अधू झाल्यामुळे धुरी घरातून बाहेरच पडत नसत. इतर कोणीही त्यांच्याकडे येत नसत. त्यामुळे त्या गेल्याचे कोणाला कळलेच नाही. त्यांची वर्तमानपत्रेही दाराशीच पडलेली आढळली. 

काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना मुंबईत घडली. एका बंगल्यात एकट्याच राहणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सहा महिन्यांनंतर लक्षात आले. आपल्या आईला भेटायला त्यांचा मुलगा अमेरिकेहून आला तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. स्वतंत्र बंगला असल्यामुळे या बाई गेल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही, दुर्गंधीही आली नाही. कोणाचे येणे-जाणेच नसल्यानेही फरक पडला. या घटनेतील सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे, मुलगा अमेरिकेत असला तरी या सहा महिन्यांत त्याने आईबरोबर संपर्क साधला नसेल? तसे असेल तर ही फारच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 

समाजात अशा काही घटना घडतात आणि पुन्हा पुन्हा हे प्रश्‍न समोर येतात. या प्रश्‍नांचे गांभीर्य लक्षात येते. पण दुर्दैवाने तेवढ्यापुरती चर्चा होते आणि विषय तसाच राहतो.. 

आधुनिक संशोधनामुळे, शोधामुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. सुदैवाने काही अपवाद वगळता बरेच जण चांगला पैसाही राखून आहेत. मात्र आयुर्मर्यादा वाढली तरी त्यापैकी प्रत्येक जण धडधाकट आहेच असे नाही. वाढत्या वयाप्रमाणे व्याधीही वाढल्या आहेत. पण त्यावर उपचार करणारे डॉक्‍टर्स, आधुनिक उपचारपद्धती यांमुळे त्यातून मार्ग निघू शकतात. पण या ज्येष्ठांची देखभाल करायला माणसे कुठून आणायची? कारण आज केवळ पुणे हे शहर घेतले तरी घरटी एक मूल परदेशात असण्याचा हा काळ आहे. त्यामुळे घरात नवरा-बायको असे दोघेच! ही गरज ओळखून केअरटेकर किंवा मदतनीस पुरवणाऱ्या संस्थाही वाढल्या आहेत. पण सेवा विकत घेता येत असली तरी करवून कशी घेणार? सेवा करणाऱ्या या लोकांपैकी खूप कमी लोक सेवाभावी वृत्तीने काम करतात. या ज्येष्ठांखेरीज घरात कोणी असेल तर या लोकांवर दबाव तरी असतो अन्यथा ते म्हणतील तसे होते. त्यातही ज्येष्ठ अंथरुणाला खिळून असेल आणि तो सुदैवी असेल तर त्याला सेवा चांगली मिळेल अन्यथा त्याचे हाल पाहावत नाहीत. ओळखीचे, नातेवाईक ही मंडळी येऊन जाऊन असतात. जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नसते. त्यामुळे पैसा असला तरी सगळे काही सुरळीत होतेच असे नाही. त्यामुळे पैशाबरोबरच माणसाने धडधाकट राहण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. अर्थात या गोष्टी कोणाच्या हातात नसतात. पण प्रयत्न तर करायलाच हवेत. त्यासाठी जीवनशैली नियमित हवी. व्यायाम, योग्य आहार, नियमित आरोग्य तपासण्या वगैरे गोष्टी करायला हव्यात. 

या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आसपास माणसे हवीत. बदलत्या जीवनशैलीत एकत्र कुटुंबाचे विभक्त कुटुंब झाले. साहजिकच कुटुंबातीलच माणसांची संख्या कमी झाली. मोठी घरे जाऊन लहान घरे आली. त्यांची दारेही बंद बंद राहू लागली. साहजिकच शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या सहवासावरही मर्यादा आल्या. शिक्षण, नोकऱ्यांनिमित्त घरातील माणसेही दूर गेली. माणसांचा सहवासच कमी झाला. नाही म्हणायला आज वेगवेगळे ग्रुप दिसतात. लोक एकत्र येतात हेही कमी नाही. पण परस्परांच्या सहवासातूनच या एकाकी समस्येतून मार्ग निघणार आहे...

संबंधित बातम्या