अजून किती सोसायचे?

ऋता बावडेकर    
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

संपादकीय    
 

महिलांवरील अत्याचाराची बातमी नाही असा एकही दिवस अलीकडे नसतो. मात्र त्यातही गेला आठवडा अतिशय भयानक होता. महिला-मुलींवरील  अत्याचारांच्या बातम्यांनी या काळात क्रौर्याची परिसीमा गाठली. या लेकींचा दोष तरी काय होता? त्या मुलीला तर काहीच कळत नव्हते? त्यांच्या वाट्याला हे क्रौर्य का यावे?.. असे सगळेच प्रश्‍न निरर्थक ठरले.. कारण ते विचारणार कोणाला? आणि त्याची उत्तरे काय येणार? ती ऐकण्याची ताकद अजून आपल्यात आहे का? सुन्न करणारी ही परिस्थिती आहे. 

उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर मागच्या वर्षी भाजपच्या एका आमदाराने अत्याचार केला. त्याचा जाब तिने आत्ता विचारला. त्यानंतर तिच्या वडिलांना पोलिसांनी पकडून नेले आणि कारागृहातच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे, असा या मुलीचा व तिच्या नातेवाइकांचा आरोप आहे. पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. मात्र अखेर सगळीकडून दबाव येऊन या आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारागृह बघताच त्याला रडू कोसळले; तोपर्यंत त्याची भाषा अतिशय मस्तवालीची आणि जातिवाचक होती. त्यातूनच ‘या लोकांवर कसला विश्‍वास ठेवता?’ असे म्हणण्यापर्यंत त्याने मजल मारली. मात्र दबावामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

दुसरे प्रकरण जम्मू काश्‍मीरमधील कथुआ भागातील आहे. प्रामुख्याने मेंढपाळीचे काम करणाऱ्या या समाजातील आठ वर्षांची एक मुलगी गुरे चरायला घेऊन गेलेली असताना तिचे अपहरण झाले. जवळ जवळ आठवड्यानंतर या मुलीचा मृतदेह अतिशय विद्रूप अवस्थेत सापडला. ही घटना जानेवारीत घडली. हे सगळे प्रकरण एका मंदिरात घडले. या प्रकरणातील जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. भाजपच्या दोन मंत्र्यांचाही याला पाठिंबा होता. तसेच वकिलांनीही मोर्चे काढले आणि हे प्रकरण चिघळत गेले. 

या प्रकरणातील मुलीवर अनन्वित अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पाच-सहा जणांनी अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यानंतर आठ दिवसांनी तिचा निर्घृण खून करून तिला बाहेर फेकून देण्यात आले. वेदनादायक भाग म्हणजे, त्याबद्दल काहीच न वाटता अतिशय संवेदनशून्य पद्धतीने आरोपींच्या बाजूने मोर्चे काढण्यात आले, त्यांना पाठिंबा देण्यात आला. कोणत्याही महिलेवर अत्याचार होणे नींदनीयच; पण ही मुलगी तर केवळ आठ वर्षांची होती. या सगळ्या नरकयातना तिने कशा सहन केल्या असतील, याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. संबंधितांना हे कृत्य करवले कसे? 

अशाच प्रकारची एक घटना सूरत येथेही घडली आहे. ही मुलगी साधारण अकरा वर्षांची असून दहा दिवसांपूर्वी तिचा मृतदेह सापडला असून तिच्यावरही अत्याचार झाले आहेत, तिचा भयंकर छळ करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या शरीरावर जवळजवळ ८६ जखमा आहेत. त्या मुलीची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात सध्या पोलिस आहेत. 

हे सगळे अतिशय भयानक आहे. माणूस इतका विकृत कसा असू शकतो? जंगलचे राज्य बरे त्यापेक्षा! गरज असेल तरच तिथे शिकार होते. विनाकारण खोडी काढणारा माणूस हा एकमेव प्राणी असेल. पण इतका अमानुषपणा येतो कुठून? या अत्याचारांमागे प्रत्येकवेळी लैंगिक वासनाच असेल असे नाही. कित्येकदा कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. समोरच्याला कमी लेखणे, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणे, कुठलातरी सूड घेणे, राजकीय हेतू असणे.. असे काहीही कारण असू शकते; पण हे सगळे भोगणारी स्त्रीच असते. कारण ते सोपे असते ना! स्त्री बरोबर चारित्र्याची सांगड आपल्या समाजाने घालून ठेवली आहे. असे काही अघोरी प्रकार झाले, की स्त्री भ्रष्ट होते असे अजूनही सर्वत्र मानले जाते. सूड घेण्याचा हा प्रकार आहे. पण बळी स्त्रीने का जावे. पुरुषांना आपापसांत त्यांची घेणी-देणी चुकती करता येत नाहीत का? 

अत्याचाराचे प्रकार घडले की प्रथम बोट उठते ते स्त्रीच्या वागण्या-बोलण्या-पेहरावाकडे. त्यामुळे भावना उद्दिपित होतात असे या मंडळींचे म्हणणे असते. त्याची री मग अनेकदा स्त्रियाही ओढतात. पण आपल्या भावना काबूत ठेवता येत नाहीत का? असा उलटा प्रश्‍न या महाभागांना कोणी विचारत नाही.. आणि अशा किती मुलींवर या प्रकारामुळे अत्याचार झाले आहेत? वरील प्रकरणांतील मुलींना तर या गोष्टींची कल्पनाही नसेल; नव्हे नव्हतीच. कारण कथुआ प्रकरणातील मुलीचे वडील म्हणतात, ‘माझ्या मुलीला तर डावा हात कोणता, उजवा पाय कोणता हेदेखील माहिती नव्हते..’ अतिशय सूचक शब्दांत त्यांनी यासंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत. पण त्या अगदी जिव्हारी लागतात. 

एखाद्या पुरुषाला, एखाद्या कुटुंबाला कमीपणा आणण्यासाठी स्त्रीचा होणारा असा वापर अगदी पुरातनकाळापासून सुरू आहे. यातून कोणता विकृत आनंद मिळतो हे तो घेणाऱ्यालाच माहिती. पण अशी वेळ आपल्या घरातील महिलांवर आली तर? याचा विचार मात्र होत नाही. मुळात महिलांचा असा वापर करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. पूर्वी महिला अशिक्षित होत्या, घरातील चार भिंतींपुरतेच त्यांचे आयुष्य होते. पण आता त्या बाहेर पडल्यात बरोबरीने, अनेकदा तर जास्त कमवू लागल्या आहेत. तरी त्यांचे हे भोग संपलेले नाहीत. निर्भयासारखी मुलगी रात्री एकटी फिरू कशी शकते यामुळे राग येऊन एकाने या दुष्कृत्यात भाग घेतला. लहान कपडे घालून या मुली-महिला आमची संस्कृती भ्रष्ट करतात म्हणून त्यांची छेड काढली जाते. त्यावेळी छेड काढून आपण कोणती संस्कृती जपतोय हे या मंडळींना आठवत नाही का? बरे वर उल्लेखिलेल्या मुली तर इतक्‍या लहान आहेत त्याचे काय? 

समस्या कोणतीही असो.. योग्य असो - अयोग्य असो; त्यावर चर्चेने मार्ग काढता येऊ शकतो. त्यासाठी महिलांचा असा वापर करून त्यांच्या संवेदनांबरोबर का खेळता? त्यांना आयुष्यातून का उठवता? होईल का यावर विचार?

संबंधित बातम्या