‘कास्टिंग काऊच’ आहे? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 26 एप्रिल 2018

संपादकीय

चित्रपट आवडत नाहीत अशी व्यक्ती विरळाच म्हणायला हवी. कदाचित प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेल, पण चित्रपटच आवडत नाहीत असे लोक दुर्मिळच असावेत. या आवडीमुळे साहजिकच या क्षेत्राबद्दल प्रचंड चर्चा होत असते. गॉसिप बोलले-लिहिले जाते. सामान्य माणूसही या तारे-तारकांबद्दल - त्यांना कधीही न भेटता-बोलता - मोठ्या अधिकारवाणीने बोलत असतो. त्यातील एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे - कास्टिंग काऊच! हे प्रकरण अस्तित्वात आहे की नाही याबद्दल अनेकदा चर्चा रंगते. पूर्वी ‘मला अनुभव आला नाही, पण ‘कास्टिंग काऊच’ आहे असे म्हणतात,’ अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त होत असे. पण अलीकडे त्याबद्दल उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. मात्र असे बोलतानाही ‘मला अनुभव आला, पण मी त्याला चांगलाच धडा शिकवला’ अशी प्रतिक्रिया दिली जाते. काही दिवसांपूर्वी ‘# me too’ अशा टॅगलाईनने हॉलिवूडमधील काही अभिनेत्रीही या प्रकाराबद्दल उघड बोलू लागल्या. 

ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी या ‘कास्टिंग काऊच’बद्दल नुकतीच टिपण्णी केली आहे. ‘बॉलिवूडमध्ये बलात्कार किंवा कास्टिंग काऊचद्वारे शोषण झाले तरी त्या व्यक्तीला हे क्षेत्र रोजीरोटीही देते. वाऱ्यावर सोडत नाही.. आणि हे प्रकार आज नाही, बाबा आदमच्या जमान्यापासून घडत आहेत.. केवळ बॉलिवूडमध्ये नाही, तर अनेक क्षेत्रात हे प्रकार घडत असतात..’ असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या धाडसी वक्तव्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितली. मात्र त्यानंतर काही क्षणांतच ‘कास्टिंग काऊच’ केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर संसदेतही आहेत,’ असे विधान काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केले. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीरेड्डी हिनेही ‘कास्टिंग काऊच’विरुद्ध टॉपलेस होऊन आवाज उठवला होता. दर काही अंतराने ‘कास्टिंग काऊच’चा मुद्दा असा ऐरणीवर येतो. त्याबद्दल उघडपणे मात्र कोणीच बोलत नाही. मधुर भांडारकर यांच्या ‘पेज ३’ या चित्रपटांत केवळ हा मुद्दाच नाही, तर महिलांसह, पुरुष, लहान मुलांचेही कसे शोषण केले जाते हे दाखवले होते. 

रेणुका चौधरी म्हणतात, तसे इतरही काही क्षेत्रांत असे प्रकार होत असतीलही; मात्र प्रसिद्धी माध्यमांतील - विशेषतः नाटक, चित्रपट, आता मालिका वगैरे - अशा प्रकारांना प्रसिद्धी लवकर मिळते. त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. ज्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, अशा व्यक्तीही अशा चर्चांमध्ये हिरिरीने भाग घेतात - अधिकारवाणीने बोलतात. त्यामुळे या क्षेत्राबद्दल समज-गैरसमज अधिक वाढतात. 

असे असले तरी हे प्रकार अजून तरी कोणी पूर्णपण थांबवू शकलेले नाही. यात काही निष्पाप लोक भरडले जात असले, तरी अनेक जण याकडे ‘स्टेपिंग स्टोन’ म्हणूनही बघतात, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अर्थात असे म्हणणे म्हणजे या प्रकाराचे समर्थन अजिबात नव्हे. 

काही दिवसांपूर्वी हॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी ‘me too’ या नावाने एक चळवळ सुरू केली. आपल्या उमेदवारीच्या काळात किंवा त्यानंतरही आपले कसे शोषण झाले असे त्यांनी त्याअंतर्गत लिहिले. त्यांच्या या चळवळीमुळे हार्वे वाईन्स्टीन या निर्मात्याला आपले काम थांबवावे लागले. त्याच्यावर अँबर अँडरसन, सलमा हाएक, अँजेलिना जोली, ग्वेनेथ पाल्ट्रो आदींसह तब्बल ८५ कलावतींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. केवळ तोच नाही, तर केविन स्पेसी, मायकेल डग्लस, डस्टिन हॉफमन, सिल्व्हेस्टर स्टॅलन आदींवरही शोषणाचे आरोप झाले. हॉलिवूड ही इंग्रजी चित्रपटसृष्टी आपण मोकळी, पुढारलेली मानतो. तिथे स्पष्टपणे सगळे बोलले जाते असा आपला समज आहे. पण तेथील अभिनेत्रींनाही आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतका वेळ लागला. तरीही हे हिमनगाचे टोकच असणार! असे असताना आपल्या अभिनेत्रींनी उघडपणे बोलावे अशी अपेक्षा धरणे योग्य नाही. आपला समाज अजूनही हे सत्य पचवण्याइतका परिपक्व झालेला नाही. उलट खिल्ली उडवण्यात आपण आघाडीवर असतो. त्यामुळे ‘मला अनुभव नाही, पण असे प्रकार होतात असे म्हणतात’ किंवा ‘मी त्या माणसाला चांगलाच धडा शिकवला’ असे मोघमपणे बोलले जाते. तरीही अशा अभिनेत्री अनेकदा ट्रोल होतात. एरवीही ज्या महिलेवर - मुलीवर बलात्कार होतो तिलाच समाजाच्या टीकेला सामोरे जावे लागते. अत्याचार करणारा बिनधास्तपणे फिरत असतो. मुलगी मात्र चेहरा लपवून राहात असते. समाजाच्या या वागण्यामुळेच सत्य बाहेर येत नाही. आले तरी त्यावर मोघमच चर्चा होते. एखाद्या मुलीला - महिलेला आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तिला अशा प्रकारांना सामोरे का जावे लागावे? हा खरा प्रश्‍न आहे. 

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी ‘कास्टिंग काऊच’बद्दल विधान केले होते. त्या ५-६ वर्षांच्या असताना त्यांच्या तथाकथित काकाने त्यांचे शोषण केल्याचे त्यांनी इतक्‍या वर्षांनी सांगितले. या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून हा काका त्यांना धमक्‍या देत असे, पट्ट्याने मारहाण करत असे. त्यांनी आपल्या आईला सांगूनही त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले होते. 

इंग्रजी असो वा हिंदी चित्रपटसृष्टीचे वास्तव हे आहे. इथे अनेक सुशिक्षित - अशिक्षित तरुण-तरुणी ग्लॅमरच्या मागे लागून घरदार सोडून येतात. टपलेली श्‍वापदे त्यांचा बरोबर घास घेतात. त्यातून काही सावरतात, पुढे मार्ग चालू लागतात. काही मात्र आयुष्यातून उठतात.. आणि केवळ चित्रसृष्टीच का? असा अनुभव कुठेही येऊ शकतो-येतो; तोदेखील केवळ महिलांनाच नव्हे तर अनेक पुरुषही या दिव्यातून जातात. प्रसिद्धी माध्यमांतील हे प्रकार उजेडात येतात-त्यावर चर्चा होते, इतकेच! अर्थात प्रत्येकालाच असे अनुभव येतात असे नाही. पण म्हणून ते येतच नाहीत असे मानणेही डोळ्यावर कातडे ओढून घेतल्यासारखे होईल. मात्र, म्हणून ते सहन करावेत असे नाही. त्यावर आवाज उठवायलाच हवा. त्यासाठी संघटित व्हायला हवे. तरच हे शक्‍य आहे.

संबंधित बातम्या