वंशवाद चीतपट!
संपादकीय
फ्रान्सचा जिगरबाज संघ चिवट क्रोएशियाला हरवून फुटबॉलमधील विश्वविजेता बनला. रशियातील मॉस्को शहरातील लुझनिकी स्टेडियमवर ‘ले ब्ल्यू’ फ्रेंच क्रांती जगाने अनुभवली. दुसऱ्या जगज्जेतेपदासाठी फ्रान्सला दोन दशके वाट पाहावी लागली. १९९८ ते २०१८... पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरचे आयुष्यमानही वाढले. एक फ्रेंच नाव कायम राहिले. दिदियर देशाँप. फ्रान्सने पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला तेव्हा ते कर्णधार होते, आता विश्वविजयी प्रशिक्षक आहेत.
फ्रान्सचा संघ यंदा विश्वकरंडक जिंकेल याबाबत जास्त भाकिते नव्हती. स्पर्धापूर्व अनुमानानुसार जर्मनीला जास्त पसंती होती, परंतु ज्योकिम लोव यांच्या मार्गदर्शनाखालील गतविजेत्यांना प्राथमिक फेरी पार करता आली नाही. ते शापित गतविजेते ठरले. पाच वेळेचा विजेता ब्राझील, तसेच त्यांचा दक्षिण अमेरिकन शेजारी अर्जेंटिना हे फुटबॉलमधील ‘दादा’ देश ‘राउंड ऑफ १६’चा अडथळा ओलांडू शकले नाही. तीच गोष्ट बार्सिलोना एफसी, रियाल माद्रिद या जगातील श्रीमंत फुटबॉल क्लब असलेल्या स्पेनची आहे. इटली, नेदरलॅंड्स हे युरोपातील मातब्बर संघ यंदा विश्वकरंडकासाठी पात्रही ठरू शकले नाहीत. अमेरिका ही जगातील महासत्ता, परंतु त्यांच्या संघाला पात्रतेअभावी फुटबॉल महोत्सवात सहभागी होता आले नाही. आशिया खंडाचे आव्हान जपानने उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेले एवढेच समाधान, तर फुटबॉलची अफाट गुणवत्ता असलेल्या आफ्रिकेतील एकाही संघाला साखळी फेरी ओलांडून पुढे जाता आले नाही. रशियाने यजमान या नात्याने खेळाचा दर्जा उंचावल्यामुळे रशियन कमालीचे सुखावले, त्याचवेळी आईसलॅंड या दूरवरच्या आणि अतिशय थंड वातावरणातील युरोपीय देशाने तेथील फुटबॉलचा उच्च दर्जा सिद्ध केला.
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, फुटबॉलच्या मैदानावर वंशवाद चीतपट झाला. रशियाचे आयोजन देदीप्यमान ठरले, त्यांची वाहव्वा झाली. रशियन भूमीत फ्रान्सचा बहुवांशिक प्रतिभेचा संघ विजेता ठरला. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ हे ब्रीद जपत फ्रेंच संघाने आगेकूच राखली. या गुणवान संघात कृष्णवर्णीय, गोरे युरोपियन, मुस्लीम आणि उत्तर आफ्रिकी खेळाडू होते. त्यांच्यात हेवेदावे नव्हतेच मुळी. फक्त जिंकण्याचे ध्येय होते. कृष्णवर्णीय किलियन एम्बापेच्या गोल जल्लोषाला गौरवर्णीय अँतोईन ग्रीझमन तेवढ्याच उत्स्फूर्तपणे दाद देत होता. विश्वकरंडकासाठी निवडलेल्या २३ सदस्यांच्या संघात पंधराहून जास्त खेळाडू हे भिन्न वंशाचे होते. फक्त ते ‘फ्रेंच’ होते हीच समानता. वीस वर्षांपूर्वी फ्रान्सच्या जगज्जेतेपदात झिनेदिन झिदान ‘स्टार’ ठरला होता. तो अल्जेरियन होता. आताचा नवा ‘स्टार’ चेहरा एम्बापे याचे वडील कॅमेरूनचे, तर आई अल्जेरियाची. एम्बापेचे बालपण पॅरिसजवळील बाँडी येथील स्थलांतरितांच्या साथीत झाले. फ्रान्समध्ये स्थलांतरित मोठ्या संख्येने आहेत, मात्र आता ते फ्रेंच संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत. फ्रान्समधील कट्टर उजव्या विचारणीच्या लोकांना वंशवादाची ‘ओकारी’ येते, पण बहुवांशिक स्थलांतरित नागरिकसुद्धा ‘फ्रेंच’ आहेत ही बाब ते जाणीवपूर्वक विसरतात. जागतिक फुटबॉल मैदानावर बहुवर्णीय खेळाडूंच्या अपूर्व संगमात फुटबॉलच्या गुणवत्तेला धुमारे फुटले, प्रतिभा बहरली, या समागमातून फ्रान्सचे जगज्जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा साकारले.
केवळ फ्रान्सच नव्हे, तर विश्वकरंडकात खेळलेल्या बहुतांश युरोपीय संघांत बहुवांशिक खेळाडू होते. फुटबॉल मैदानावर गुणवत्तेला वाट मोकळी करून देणे हेच या साऱ्यांचे समान लक्ष्य होते. फ्रान्सचा नावाजलेला कृष्णवर्णीय माजी फुटबॉलपटू लिलयन थुरम उजव्या विचारसरणीच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मागे म्हणाला होता, ‘‘आम्हाला फ्रेंच असल्याचा खूप अभिमान आहे. फ्रान्स चिरायू होवो!’’ याच भावनेतून देशाँप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गौरवर्णीय ह्युगो लोरिस यांच्या नेतृत्वाखालील फ्रान्स संघाने विश्वविजय साजरा केला. बहुवांशिक स्थलांतरितांच्या गुणवत्तेमुळेच फ्रान्स विश्वविजेता बनला हे सत्य दुर्लक्षिता येणार नाही. वांशिक टिप्पणी करणारे याकडे सोईस्करपणे काणाडोळा करतील.
अंतिम लढतीतील पराभवानंतरही क्रोएशियन संघाचे मायदेशी उत्स्फूर्त स्वागत झाले. झाब्रेगमधील रस्त्यावर अलोट गर्दी उसळली होती. क्रोएशियाने जागतिक फुटबॉलला आपली ताकद दाखवून दिली. युगोस्लावियाच्या विघटनानंतर क्रोएशिया हा देश २५ जून १९९१ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर सात वर्षांत त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना झुंजार खेळ केला होता. त्यानंतर यंदा या लढवय्या संघाने चुणूक दाखविली. रशियातील विश्वकरंडकातील उपांत्य फेरीत चारही संघ युरोपियन होते. एकाअर्थी, युरोपातील फुटबॉलचाच दबदबा पाहायला मिळाला.