हा प्रकार थांबायला हवा...

ऋता बावडेकर
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

गेल्या काही दिवसांपासून कलामाध्यमांत अतिशय अस्वस्थतेचे, चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार चर्चेला येतो आहे. प्राण पणाला लागल्यासारखी मंडळी व्यक्त होत आहेत. हे जे चालले आहे ते खरे आहे की प्रसिद्धीसाठी अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला जोर धरू लागली आहे. यातून कोणता मार्ग निघेल याबद्दल आत्ताच काही सांगता येत नसले, तरी ही चर्चा लवकर थांबणे शक्‍य दिसत नाही. ‘पद्मावती’, ‘न्यूड’, ‘दशक्रिया’ या चित्रपटांवरील वाद सगळीकडे पेटला आहे. त्यातील ‘न्यूड’ आणि ‘दशक्रिया’चे वाद सध्या तरी ऐकू येत नसले तरी ‘पद्मावती’वरील वाद अधिकच उग्र झाला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कलामाध्यमांत अतिशय अस्वस्थतेचे, चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार चर्चेला येतो आहे. प्राण पणाला लागल्यासारखी मंडळी व्यक्त होत आहेत. हे जे चालले आहे ते खरे आहे की प्रसिद्धीसाठी अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला जोर धरू लागली आहे. यातून कोणता मार्ग निघेल याबद्दल आत्ताच काही सांगता येत नसले, तरी ही चर्चा लवकर थांबणे शक्‍य दिसत नाही. ‘पद्मावती’, ‘न्यूड’, ‘दशक्रिया’ या चित्रपटांवरील वाद सगळीकडे पेटला आहे. त्यातील ‘न्यूड’ आणि ‘दशक्रिया’चे वाद सध्या तरी ऐकू येत नसले तरी ‘पद्मावती’वरील वाद अधिकच उग्र झाला आहे. 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ज्युरींनी चित्रपटाची नावे जाहीर केली. ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाची उद्‌घाटनाचा चित्रपट म्हणून घोषणा झाली आणि काही वेळातच ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार नाहीत, असे माहिती ल प्रसारण मंत्रालयाने सांगितले. त्याची काहीही कारणे देण्यात आली नाहीत. त्यामुळे केवळ ‘न्यूड’ या नावामुळे चित्रपटाला एंट्री नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हा चित्रपट अजून पूर्ण झालेला नाही. सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही त्याला मिळालेले नाही, अशी माहिती पुढे आली. दरम्यान, या चित्रपटाला एंट्री नाकारल्याने मराठी चित्रपटांनी महोत्सवावर बहिष्कार घालावा असा मतप्रवाह पुढे आला. मात्र, योगेश सोमण यांनी त्याला विरोध केला. ‘ज्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे, त्या दिग्दर्शकांचे अनेक चित्रपट आतापर्यंत महोत्सवात दाखवण्यात आले आहेत. माझ्यासारख्या नवीन दिग्दर्शकांना आता संधी मिळते आहे. आम्ही ती का गमवावी? आमच्याबाबत असे घडले असते, तर असा प्रस्ताव आला असता का?’ असा रास्त सवाल त्यांनी विचारला. नंतर मात्र सगळेच बारगळले आणि या घटनेचा महोत्सवात निषेध करावा, असे ठरले. आता तर महोत्सवही सुरू झाला आहे. मात्र, हे दोन चित्रपट महोत्सवात न दाखविण्याचे कारण मंत्रालयाने अद्याप दिलेले नाही. आपल्या भूमिकेबाबत स्पष्टता दाखवली असती तर एवढा गदारोळच झाला नसता. 

दुसरा मराठी चित्रपट म्हणजे ‘दशक्रिया’! पुरोहितांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. इतर संघटनांनी या विरोधाला विरोध केला. एका चित्रपटगृहाने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने प्रदर्शनावर बंदी आणण्यास नकार दिला आणि चित्रपट प्रदर्शित झाला. 

या सगळ्यात प्रचंड गाडला आणि अद्यापही गाजतो आहे, तो संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट होय. चित्तोडच्या या राणीची कथा सर्वांनाच माहिती आहे. अल्लाउद्दिन खिलजी नजरेस पडू नये म्हणून या राणीने आणि तिच्यासारख्या अनेकींनी किल्ल्यातच जोहार केला. अशी ही साधारण कथा सगळ्यांना माहिती आहे. पण काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार अशी राणी पद्मिनी कोणी नव्हतीच, हे काल्पनिक पात्र आहे. मात्र रजपूत समाजाने या चित्रपटालाच विरोध केला आहे. अगदी चित्रपट निर्माण होत होता तेव्हापासून त्यांचा हा विरोध आहे. कल्पनेतील दृश्‍य दाखवताना राणी आणि त्याची काही दृश्‍ये घेतल्याचा त्यांचा संशय आहे. त्यामुळे दोन वेळा त्यांनी चित्रीकरणात अडथळा आणला होता. आता तर हा चित्रपट प्रदर्शितच होऊ द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले आहे. दिग्दर्शक, नायिका यांच्यावर त्यांनी काही इनामही घोषित केले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, भन्साळी यांनी मीडियातील काही लोकांना चित्रपट दाखवला. पण अजून सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला नाही, यामुळे बोर्डाचे सदस्य नाराज झाले आहेत. याच कारणामुळे कोणतेही दृश्‍य कापण्यासाठी न्यायालय तयार नाही. सेन्सॉरच न झालेल्या चित्रपटातले दृश्‍य आधीच कसे कापायचे, असा त्यांचा रास्त सवाल आहे. 

या वादात रोज कोणीतरी भर घालते आहे. त्यामुळे वाद शमण्याऐवजी चिघळतच चालला आहे. उत्तराला प्रत्त्युत्तर, त्याला परत उत्तर असे किती दिवस चालणार? यातून मध्यममार्ग निघायलाच हवा, नाही तर हे असेच चालत राहणार... सरकार यामध्ये काही करत नाही, असाही एक सूर निघाला आहे. हे सगळे वाद बघता मूळ मुद्दा काय हेही कोणाच्या फारसे लक्षात नसणार. कोणीतरी येते, आपली एकजूट हवी म्हणते, एखाद्या समाजाबद्दल अनुदार उद्‌गार काढते, वाद परत चिघळतो. हे लक्षात घेऊन हा वाद संपवायचा आहे की नाही हेच कळत नाही. त्यामुळे हे सगळे प्रसिद्धीसाठी चालले आहे, असे कोणाला वाटले तर त्याला पूर्णपणे चूक तरी कसे म्हणता येईल? 

मात्र असे असले तरी हा किंवा यासारखे वाद थांबायला हवेत. किंबहुना ते निर्माणच व्हायला नकोत. हकनाक कोणाला तरी वेठीला धरले जाते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य जरूर आहे, पण म्हणून कोणाच्या भावना विनाकारण का दुखवायच्या? जे घटले ते दाखवणे याबाबत काही समर्थन तरी करता येते, पण जे घडलेच नाही ते दाखवण्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य कसे म्हणता येईल? ‘बाजीराव’ चित्रपटात पेशवीणबाई, पेशवे नृत्य करताना दाखवले आहेत. हे शक्‍यच नाही, तरी लोकांनी तेही बघितले, आता रजपूत समाज हे मान्यच करायला तयार नाही. विशाल जनसमुदायासमोर राणी घूमर करेलच कशी हा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही उथळ दाखवण्यापेक्षा त्यावेळची परिस्थिती दाखवून, त्या घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायला हवा. पण हे अवघड असते, मग अशा पळवाटा शोधल्या जातात. लोकप्रियताही लवकर मिळते. लोकांनीही आपल्या भावना अशा भडकू देऊ नयेत. आपल्या अस्मिता इतक्‍या टोकदार करू नयेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रेक्षकांनी प्रगल्भ व्हावे. चित्रपट-नाटकांत कल्पनेला वाव दिला जातो, हे मान्य करून दाखवतात ते सगळे खरेच असते असे समजू नये. खरे काय ते समजून घ्यावे. म्हणजे असे वाद होणारच नाहीत...

संबंधित बातम्या