बापू-बुवांचे प्रस्थ 

ऋता बावडेकर
गुरुवार, 3 मे 2018

संपादकीय

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तथाकथित ‘बाबा’ आसारामला जोधपूरच्या न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याबरोबरच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली. तेच काय योग्य न्याय झाल्याची प्रत्येक नागरिकाचीच भावना आहे. अपवाद, या बाबाचे काही भक्त असतील, पण त्यांचा विचार करण्याची आवश्‍यकता नाही. न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय दिला आहे. सर्वप्रथम या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने जे धैर्य दाखवले ते वाखाणण्याजोगे आहे. तसेच तिचे कुटुंबीय, साक्षीदार, तपास अधिकारी, न्यायाधीश या सगळ्यांचेच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळेच या ‘बाबा’ला ही शिक्षा होऊ शकली.. आणि अजूनही सगळे काही संपलेले नाही, ही आशाही या निर्णयामुळे जागती राहिली. 

मात्र, त्याचवेळी या बाबाच्या विविध आश्रमांत त्याच्या सुटकेसाठी पूजापाठ सुरू होते. मंत्र, जपजाप्य सुरू होते. आसारामवरील आरोप न्यायालयात सिद्ध होऊन त्याला शिक्षा झाली, तरीही त्याच्या तथाकथित भक्तांचे डोळे अजून उघडायला तयार नाहीत. ते अजूनही त्याच्यासाठी अश्रू ढाळताहेत, त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करताहेत. खरे तर या भक्तांनी त्याला फार वरचा, म्हणजे अगदी देवाचा दर्जा दिला आहे. मग तो स्वतः देव असेल तर अशा गुन्ह्यांत कसा अडकला? त्याला शिक्षा कशी झाली? असे साधे प्रश्‍नही त्यांना पडत नाहीत. इतकी आंधळी भक्ती काय उपयोगाची? 

या प्रकरणातील मुलगी आसारामच्या आश्रमात राहून शिकत होती. तिला कसली तरी बाधा झाली आहे, म्हणून आसारामच्या दोन सहकाऱ्यांनी तिला त्याच्या खोलीत नेले. एका महिला सहकाऱ्याने तिला तिथे डांबून ठेवले. आसारामने नंतर त्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मुलीने आपल्यावरील अन्याय निमूट सहन करणे नाकारले. तारुण्याच्या उंबरठ्यावरील या मुलीची सगळी स्वप्ने काही क्षणात चुरगळली गेली होती. तिने या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे ठरवले. तिचे वडील, कुटुंबीय तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. पोलिसांनीही त्यांना साथ दिली. तपास अधिकाऱ्याला तर भरपूर आमिषे दाखवण्यात आली. ११६ वगैरे धमक्‍यांची पत्रे, फोनकॉल्स आले. पण तो डगमगला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनाही कधी प्रेमाने, तर कधी धाक दाखवून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण कोणीच बधले नाही. एवढेच नाही, तर ही मुलगी सज्ञान आहे आणि जे झाले ते परस्परसंमतीने झाले, हे सिद्ध करण्यासाठी तिचे वय बदलण्याचाही प्रयत्न झाला. पण सुदैवाने प्रत्येक यंत्रणा सत्यावर ठाम राहिली. अशी तब्बल चार वर्षे या सर्व मंडळींनी दहशतीखाली काढली. न्यायालयाच्या निकालाने या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले. या मुलीचे वडील म्हणालेही, ‘आमचा न्यायालयावर पूर्ण विश्‍वास होता - आहे. आमच्या गावातील सर्व लोकांनी, पोलिसांनी, न्याययंत्रणेने आम्हाला साथ दिली. त्यामुळे हे यश मिळू शकले. अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढण्याचे आम्ही ठरवले होते. सगळ्यांचे प्रयत्न, शुभेच्छांमुळे आम्हाला हे यश मिळाले. आम्ही कृतज्ञ आहोत.’ 

खरेच, ही चार वर्षे किती भयाण असतील याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. या आसारामाचे साम्राज्य आहे. त्याचे हजारो, लाखो ‘भक्तगण’ आहे. या भक्तगणांत विविध स्तरांतील लोक आहेत. मुख्य म्हणजे काही राजकीय पुढारीही त्याच्या या ‘भक्तगणां’त आहेत. त्यामुळे त्याचे कोण काय वाकडे करू शकेल, अशीच सुरवातीला जनभावना होती. त्याचे भक्तही त्यातच मश्‍गूल होते. पण थोड्याच दिवसांत सगळ्यांचा भ्रमनिरास झाला. चार वर्षांपूर्वी त्याला पकडण्यात आले.. काही दिवसांपूर्वी या खटल्याचा निकाल लागून आसारामला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा झाली. त्याच्या दोन सहकाऱ्यांनाही वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. झाले ते चांगलेच झाले. पण आसारामचा हा केवळ एक अपराध नव्हे. लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी त्याच्याविरुद्ध दाखल झाल्या आहेत. इतरही अनेक तक्रारी त्याच्याविरुद्ध आहेत. पण राजकीय, प्रशासकीय पाठिंब्यामुळे तो आजवर तगला. पण कधी ना कधी प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशेब द्यावाच लागतो. यावेळी आसारामची पाळी आहे. 

असे असले, तरी अशा आसारामांचे प्रस्थ आपल्या समाजात वाढतेच कसे? हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या देशात प्रचंड गरिबी, बेरोजगारी आहे. सामान्य माणूस अनेक विवंचनांनी पिचला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अशा परिस्थितीत काय करावे, कोणाची मदत घ्यावी हे कळेनासे होते. मग यापैकी अनेक जण ‘देव देव’ करू लागतात. तर मोठा वर्ग या ‘बाबा’ ‘बुवां’च्या नादी लागतो. हे बाबा वगैरे लोक आपल्याला मार्ग दाखवतात, आपल्या विवंचनांतून आपली सुटका करतात, असा या भोळ्या लोकांचा समज होतो. पण ते आपल्याला लुबाडतात, आपल्या भावनांशी खेळतात, आपले शोषण करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. हा सगळे आपल्या भल्यासाठीच चालले आहे. त्यात अडथळा आणला तर आपल्यालाच त्रास, होईल असे त्यांना वाटते. बाबालोकांचे हस्तक त्यांचा तो समज दृढ करायला मदत करतात. या भक्तगणांच्या संख्येवर मग हे तथाकथित बाबा आपले हातपाय पसरू लागतात. जमिनी घेणे, पैसे जमा करणे असे त्यांचे सुरू होते. या प्रकरणातील आसारामची दहा हजार कोटींची इस्टेट आहे. स्थावर मालमत्ता, हॉटेलांतील मालकी वगैरे वेगळेच. ऐहिक सुखाचा त्याग करायला सांगणाऱ्या या मंडळींना इतक्‍या संपत्तीची आवश्‍यकता काय? हा प्रश्‍न कोणालाच पडत नाही. ज्याला पडेल त्याचे तोंड बंद केले जाते. पण ही सगळी फसवणूक कधीतरी थांबली पाहिजे. त्यांच्या नादी लागणाऱ्यांनीच ती थांबवली पाहिजे. असे कोणाच्या नादी लागून आपल्या परिस्थितीत कसा बदल होईल, हा प्रश्‍न पडायला पाहिजे. तसे व्हायला हवे असेल तर शिक्षणाचे प्रमाण, जागरुकतेचे प्रमाण वाढायला हवे. तरच हा बदल शक्‍य आहे.. पण तो करायला तर हवाच!

संबंधित बातम्या