मला काय त्याचे...? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 10 मे 2018

संपादकीय

सार्वजनिक ठिकाणी - भरगर्दीत-रस्त्यात अपघात, मारामारी, विनयभंग, मारहाण.. असे काही घडत असते. खूप जण ते बघत असतात. पण सोडवायला किंवा हस्तक्षेप करायला कोणी पुढे येत नाही. बघत बसतात.. हल्ली तर मोबाईलवर त्याचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करतात. प्रसंग - घटना चांगली असो वा वाईट, व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे. क्वचित कधी त्याचा फायदाही होतो, पण एरवी संबंधितांना मनःस्तापापलीकडे फारसे हाती लागत नाही. तरीही हे प्रमाण वाढतेच आहे. 

अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट म्हणजे इंदूर येथे एक मुलगी स्कूटरवरून चालली होती. भर रहदारीची वेळ. तेवढ्यात मागून एका बाईकवर दोघे आले आणि त्यांनी तिच्या स्कर्टला हात घातला. त्यावर अगदी अश्‍लील भाषेत टिप्पणीही केली. तिचा स्कर्ट खेचताना तिचा तोल गेला आणि ती पडली. ते बघून ते दोघे हसत हसत निघून गेले. गर्दीने ना त्यांना रोखले ना त्या मुलीला सावरले. गर्दी फक्त बघतच राहिली. एका मध्यमवयीन गृहस्थांनी त्या मुलीला सावरायला मदत केली. पण ‘तोकडे कपडे घालू नयेत,’ असा सल्लाही ते तिला देऊन गेले. त्यांच्या जागी ते कदाचित बरोबरही असतील. पण मुलींचा पेहराव हा विषय त्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला. दरम्यान, त्या मुलीने समाज माध्यमावर आपला अनुभव शेअर केला. जखमांचे फोटो टाकले, आपली मनःस्थिती सांगितली. या गडबडीत तिने त्या मुलांच्या बाईकचा नंबर बघितला नव्हता. तेही लिहिले. तिच्या या पोस्टला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिसाद दिला आणि त्या मुलांना शोधून शिक्षा करण्याचे आश्‍वासन दिले. पुढे काय होईल माहीत नाही. पण आज त्या मुलीच्या मदतीला गर्दीतील कोणीही आले नाही ही वस्तुस्थितीच राहते. कदाचित काही दिवसांत तो व्हिडिओही व्हायरल होईल. पण तिला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचे काय? आतापर्यंत उल्लेख केला नाही, पण ही मुलगी मॉडेलिंग करते. तिचा व्यवसाय, तिचे कपडे तपासाच्या आड येऊ नयेत एवढीच इच्छा; अन्यथा मूळ मुद्दा बाजूला राहून त्यावरच चर्चा होत राहील. 

 मात्र अलीकडे असे प्रकार सर्रास होताना आढळतात. गर्दीची ही मानसिकता कुप्रवृत्तीच्या व्यक्तींनी ओळखली आहे. आपण काहीही केले तरी कोणी आपल्याला काही करू शकत नाही, ही मग्रुरी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. त्यातून ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणजे मुलींना त्रास देणे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढणे, तिने किंवा तिच्या घरच्यांनी केलेल्या विरोधाला न जुमानणे, प्रसंगी पोलिसांकडे तक्रार केली म्हणून तिच्या घरात घुसून तिचे आईवडील, नातेवाइकांना मारहाण करणे, धमकावणे असे प्रकारही घडताना दिसतात. तिच्या जिवलगांना जिवे मारण्याची धमकीही हे महाभाग देताना आढळतात. असे कितीतरी प्रकार आतापर्यंत झाले आहेत.. होतही असतील. या मानसिक छळाला - त्रासाला कंटाळून अनेक मुलींनी आपले आयुष्य संपवले आहे. यात त्यांचा खरे तर काय दोष असतो? शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला आधार देणे असे अनेकींचे स्वप्न असते. पण अशा त्रासामुळे अर्ध्यावरच त्या डाव सोडून निघून जातात. त्यांची काहीही चूक नसताना. या सगळ्या प्रकारांतील वाईट गोष्ट म्हणजे, कोणी या उनाड मुलांना आवरत नाही; अगदी त्यांचे कुटुंबीयही नाही. त्यांचे काय चुकते हे त्यांना कोणी सांगत नाही. त्यांना चार खडे बोल सुनवत नाही. उलट मुलींनाच चार शहाणपणाच्या गोष्टी सांगून त्यांना घरात डांबून ठेवले जाते. 

केवळ घरातलेच नाही, तर अनेक राजकीय पुढाऱ्यांचेही या तरुणांना अभय असते. त्यामुळे बरेचदा पोलिसही काही करू शकत नाहीत आणि या तरुणांची भीड चेपते. 

या सगळ्या प्रकारांत मुलींचे वागणे, बोलणे, राहणे यावर उलट सुलट खूप चर्चा होते. पण मुलग्यांबद्दल क्वचित कोणी बोलताना दिसते. वास्तविक, मुलग्यांवर संस्कार करण्याचीही गरज आहे. पण अनेकदा घराचा ‘वंशाचा दिवा’ वगैरे म्हणून त्याचे नको इतके लाड होताना दिसतात. दोन बहिणींनी त्रास देतात म्हणून आपल्या आई आणि मोठ्या बहिणीचा खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यात तिसराही खून होता तो त्यांच्या भावाचा! तो त्यांना सतत काम सांगे, लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करी आणि एवढे करूनही त्याचेच लाड होत. मुलग्यांच्या अति लाडाची प्रतिक्रिया अशी उलट येण्याचीही शक्‍यता असते. खून करणे हा नक्कीच उपाय नाही, पण त्या मुलींकडून ते कृत्य घडले. अनेक घरांत मुलग्यांचे असे अवाजवी लाड होताना दिसतात. आजच्या काळात खरेतर मुलगा-मुलगी असा भेदभाव करणेच चुकीचे आहे. पण तसे होते. 

हे सगळे प्रकार बघता, माणसावर किमान समाजाचा तरी दबाव असावा असे वाटू लागले आहे. कारण आजूबाजूला बघितले, नेहमीच्या बातम्या वाचल्या तर कोणावर कोणाच वचक आहे का असा प्रश्‍न पडतो. परिस्थिती अगदी हातातून निसटली आहे, असे नाही; पण कधीही टोकाला जाऊ शकते. अशावेळी किमान समाजाचा तरी नैतिक दबाव असावा असे वाटते. त्यामुळे गुन्हा करताना ती व्यक्ती दोनदा तरी विचार करेल. पण दुर्दैवाने आज ‘आम्हा काय त्याचे’ अशी वृत्ती वाढताना दिसते. त्यामुळे कोणी अपघातात तळमळत असेल तर त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी तिचा सेल्फी काढण्यातच आपण समाधान मानू लागलो आहोत. आपल्या मदतीमुळे तिचा जीव वाचेल हा विचार खरेच मनातही येत नाही? ‘कोण पोलिसांचे झंझट मागे लावून घेईल?’ असाही विचार असेल, पण एका माणसाचा प्राण वाचविल्याचे समाधानही मिळते हे लक्षात ठेवायला हवे. पोलिसांनीही चौकशीचा ससेमिरा मदत करणाऱ्याच्या मागे लावू नये. अशा सगळ्यांच्या सकारात्मक प्रयत्नांतून नक्कीच समाजाचा दबावगट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गुन्हे कमी होऊन केवळ मुलींनाच नव्हे, समाजातील प्रत्येक घटकालाच सुरक्षित वाटेल.

संबंधित बातम्या